कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षक
बदलत्या शिक्षण व्यवस्थेतील मानवी स्पर्श जपणारा नवा सहप्रवासी‘यंत्रे माहिती देऊ शकतात. पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्ने, आत्मविश्वास आणि माणुसकी जागवण्याचे सामर्थ्य आजही शिक्षकांकडेच आहे.’ एखाद्या ग्रामीण शाळेत फेरफटका मारला, तर वेगळेच चित्र दिसते. एका वर्गात शिक्षक स्मार्ट बोर्डवर विज्ञानाचा प्रयोग दाखवत आहेत. दुसऱ्या वर्गात काही विद्यार्थी टॅब्लेटवर गणित सोडवत आहेत. एखादा शिक्षक मोबाईलवरून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच तयार करत आहे, तर दुसरीकडे एका मुलाच्या वहित शिक्षक स्वत:च्या हस्ताक्षरात लिहित आहेत. ‘छान प्रयत्न... पुढच्या वेळी अजून चांगलं होईल.’
हीदोन चित्रे पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते- शिक्षणात तंत्रज्ञान आले आहे; पण शिक्षणातील माणुसकी अजूनही शिक्षकांमुळेच जिवंत आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) हा शब्द केवळ तंत्रज्ञानाच्या चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही. उद्योग, आरोग्य, शेती, न्यायव्यवस्था आणि आता शिक्षण प्रत्येक क्षेत्रात एआयने आपली उपस्थिती दर्शवली आहे. कर्नाटकातील शाळाही या बदलापासून दूर नाहीत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी 2020), डिजिटल इंडिया अभियान आणि राज्य शासनाच्या विविध उपक्रमांमुळे शिक्षण अधिक आधुनिक, संवादात्मक आणि विद्यार्थीकेंद्रित होत आहे.
मात्र या बदलामध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातो. एआयमुळे शिक्षकांची गरज कमी होणार का?
उत्तर : ठामपणे ‘नाही’ असेच आहे.
कारण एआय माहिती देऊ शकते, पण विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करू शकत नाही. एआय प्रश्नांची उत्तरे शोधून देऊ शकते, पण अपयशानंतर खचलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवू शकत नाही. एआय सुंदर सादरीकरण तयार करू शकते, पण ‘तू नक्की यशस्वी होशील’ हे मनापासून सांगू शकत नाही. प्रत्येक वर्गात काही मुले शांत असतात... त्यांची भाषा शिक्षकच समजतो. काही विद्यार्थी अभ्यासात मागे असतात. काहींना वाचन कठीण वाटते. काहींना गणिताची भीती वाटते, तर काही विद्यार्थ्यांना वर्गासमोर बोलण्याचे धाडसच होत नाही. अनेकदा त्यांना एत्दै थही असा शिक्का लावला जातो. पण खरे पाहता ही मुले कमी बुद्धिमान नसतात. त्यांना फक्त शिकण्याचा वेगळा मार्ग हवा असतो. एखाद्या विद्यार्थ्यांला चित्रातून समजते, एखाद्याला व्हिडिओतून, तर एखाद्याला प्रत्यक्ष प्रयोगातून, काही विद्यार्थ्यांना एकच धडा तीन-चार वेळा वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगावा लागतो. इथेच एआय शिक्षकांचा हात मजबूत करते.
आज शिक्षक काही मिनिटात चित्रांसह नोट्स तयार करू शकतात. मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत एकाच धड्याचे वेगवेगळे स्वरुप तयार करू शकतात. विज्ञानातील प्रयोगांचे अॅनिमेशन दाखवू शकतात. गणिताची उदाहरणे टप्प्याटप्प्याने समजावू शकतात. वाचनात अडचण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ सामग्री तयार करू शकतात. अशा अनेक सुविधा पूर्वी वेळेअभावी शक्य नव्हत्या. एआय शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. एआयमुळे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात.
शिक्षकही माणूसच ...
समाज अनेकदा विद्यार्थ्यांच्या अडचणींबद्दल बोलतो; पण शिक्षकांच्या आयुष्याकडे फार कमी जण लक्ष देतात. सकाळी प्रार्थना, त्यानंतर सलग तासिका, प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, विविध शासकीय अहवाल, ऑनलाईन नोंदी, पालकसभा, प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक किंवा जनगणना यासारख्या अतिरिक्त जबाबदाऱ्या, या सर्वांमध्ये शिक्षक दिवसाचा मोठा भाग घालवत असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्याससाहित्य तयार करण्याची इच्छा असली तरी वेळ अपुरा पडतो.
एआयचे कार्य
प्रश्नसंच, कार्यपत्रिका, सादरीकरणे, भाषांतर, मूल्यांकन विश्लेषण, प्रगती अहवाल यासारखी पुनरावृत्तीची कामे एआय काही मिनिटात करू शकते. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधू शकतो. त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावनिक गरजा समजू शकतो आणि शिक्षणात हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पालकांनीही बदल स्वीकारण्याची वेळ आली आहे, आज अनेक पालक एआयकडे संशयाने पाहतात. ‘मोबाईलमुळे मुलं अभ्यास विसरतील का?’ ‘एआय मुळे विचार करण्याची सवय कमी होईल का?’ हे प्रश्न रास्त आहेत. परंतु नवीन तंत्रज्ञानाबरोबर असे प्रश्न निर्माण झाले आहेत. रेडिओ आला, दूरदर्शन आले, संगणक आले, इंटरनेट आले. प्रत्येकवेळी भीती व्यक्त झाली. पण योग्य वापर शिकवला गेला तेव्हा ती साधने शिक्षणासाठी वरदान ठरली.
एआय बाबतीतही हेच सत्य आहे
पालकांनी मुलांना एआय वापरण्यापासून रोखण्याऐवजी योग्य प्रश्न विचारायला शिकवले पाहिजे. माहिती मिळवण्याबरोबर तिची पडताळणी करणे, स्वत: विचार करणे, अनुभवातून शिकणे आणि नैतिकतेचे भान ठेवणे, ही मूल्ये घरातून आणि शाळेतूनच विकसित होतात. कर्नाटक हे शिक्षण आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रात देशातील अग्रगण्य राज्य आहे. बेंगळूरु जागतिक आयटी राजधानी म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांनी एआयचे केवळ ग्राहक न राहता भविष्यातील संशोधक, नवोन्मेषक आणि निर्माते व्हायला हवे. यासाठी प्रत्येक शाळेत डिजिटल सुविधा, शिक्षकांसाठी सातत्यपूर्ण एआय प्रशिक्षण, ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा, स्थानिक भाषांतील दर्जेदार शैक्षणिक सामग्री आणि विशेषत: एत्दै थहे व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण व्यवस्था विकसित करणे अत्यावश्यक आहे.
शिक्षणाचा खरा चेहरा मानवीच
कदाचित काही वर्षांनी प्रत्येक वर्गात एआय सहाय्यक असतील. व्हर्च्युअल प्रयोगशाळा असतील. डिजिटल पुस्तके आणि बुद्धिमान शिक्षण प्रणाली असतील. पण जेव्हा एखादा विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होऊन आपल्या शिक्षकांना भेटेल, त्यांच्या पायाला स्पर्श करून म्हणेल-‘सर, तुमच्यामुळे मी आज इथंपर्यंत पोहोचलो...’ त्या क्षणी कोणत्याही संगणकाचा, कोणत्याही अल्गोरिदमचा किंवा कोणत्याही कृत्रिम बुद्धिमतेचा उल्लेख नसेल. त्या क्षणी आठवेल ते शिक्षकांचे प्रोत्साहन, संयम, प्रेम आणि विश्वास. कारण एआय विद्यार्थ्यांला माहिती देऊ शकते; पण आयुष्य घडवू शकत नाही.
निष्कर्ष
कृत्रिम बुद्धिमत्ता ही शिक्षण क्षेत्रासाठी धोका नाही; ती योग्य हातात पडल्यास परिवर्तनाची मोठी संधी आहे. विशेषत: कर्नाटकासारख्या प्रगतीशील राज्यात एआय आणि शिक्षक यांची सांगड घातली, तर शिक्षण अधिक समावेशक, गुणवत्तापूर्वक आणि विद्यार्थी केंद्रित होऊ शकते. परंतु या संपूर्ण प्रवासात आपण एक गोष्ट कधीही विसरु नये, तंत्रज्ञान वर्गात येऊ शकते, परंतु विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण करण्याची ताकद फक्त शिक्षकांकडेच असते.
दिनेश खोरागडे
