For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्थसंगत २८ ऑक्टोबर २०२४

07:00 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अर्थसंगत २८ ऑक्टोबर २०२४
Advertisement

‘कमबॅक’ अन् विस्तार!

Advertisement

दूरसंचार सेवेच्या क्षेत्रात बऱ्याच काळापासून विलक्षण शर्यत रंगलीय ती ‘जिओ’, ‘एअरटेल’ नि ‘व्होडाफोन आयडिया’ या खासगी कंपन्यांत...त्यापुढं सरकारी ‘बीएसएनएल’ कुठल्या कुठं भिरकावली जाऊन त्यांच्यावर पाळी आली होती ती हताशपणे आपले ग्राहक दुसरीकडे वळत असल्याचं पाहण्याची. पण जुलै-ऑगस्ट महिन्यांत अचानक चक्र उलटं फिरलं असून ‘भारत संचार निगम लिमिटेड’ला सुखद धक्का दिलाय तो एकंरित 55 लाख ग्राहकांनी त्यांचा हात पकडून...दुसरीकडे, गौतम अदानीनी सिमेंट क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्याच्या आपल्या इराद्याला धरून नेहमीच्या थाटात आणखी एक कंपनी घशात घातलीय...

प्रत्येक व्यक्तीनं लहानपणी कासवानं जिंकलेल्या सशाबरोबरच्या शर्यतीची गोष्ट ऐकलीय...सध्याच्या जमान्यात देखील एक कासव पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा जीव तोडून प्रयत्न दिवसेंदिवस करतोय...नाव : ‘बीएसएनल’ म्हणजेच ‘भारत संचार निगम लिमिटेड’...शर्यतीत नेहमी शेवटच्या स्थानावर धावणाऱ्या त्या सरकारी आस्थापनानं जोरदार कामगिरीच्या जोरावर या क्षेत्रातील विश्लेषकांना देखील आश्चर्याचा अक्षरश: धक्का दिलाय...अनेक ग्राहकांनी बाजू बदललीय आणि ‘बीएसएनएल’चा हात पकडलाय तो खासगी टेलिकॉम आस्थापनांनी दरांत केलेल्या वृद्धीमुळं...‘ट्राय’नं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, गेल्या दोन महिन्यांत ‘भारत संचार निगम लिमिटेड’ची ग्राहक संख्या कमी दर अन् ‘4जी’ सेवेची सुरुवात यांच्यामुळं वाढलीय...

Advertisement

‘बीएसएनएल’नं जुलै महिन्यात सुमारे 30 लाख नवीन ग्राहकांना खिशात घातलं, तर ‘रिलायन्स जिओ’, ‘भारती एअरटेल’ नि ‘व्होडाफोन आयडिया’ यांना दर्शन घडलं ते ग्राहकांना गमावण्याचं. ‘एअरटेल’पासून 17 लाख, ‘व्होडाफोन आयडिया’पासून 14 लाख आणि ‘जिओ’पासून 80 हजार ग्राहक दूर गेले...ऑगस्ट उजाडला व ‘भारतीय संचार निगम लिमिटेड’ पुन्हा फॉर्मात आली. तिनं 25 लाख नवीन ग्राहकांना मुठीत पकडलं, तर ‘जिओ’नं तब्बल 40 लाखांना गमावलं. ‘एअरटेल’नं 24 लाख, तर ‘व्होडाफोन आयडियान’नं 19 लाख ग्राहक दवडले...‘बीएसएनएल’चा बाजारपेठेतील हिस्सा मात्र अजूनही त्यांच्या खासगी प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमीच...

‘जिओ’ 40.5 टक्क्यांसह ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मार्केटमध्ये पहिल्या स्थानावर, ‘एअरटेल’ 33 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर अन् ‘व्होडाफोन आयडिया’ 18 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर विसावलाय. ‘बीएसएनएल’चा वाटा 7.8 टक्के असून त्यात ‘एमटीएनएल’च्या 0.2 हिश्श्याची भर घातल्यास तो एकूण 8 टक्क्यांवर पोहोचतो. ‘भारत संचार निगम लिमिटेड’ला ग्राहकांना खेचणं प्रामुख्यानं शक्य झालंय ते या क्षेत्रातील सर्वांत कमी ‘एआरपीयू’ म्हणजे ‘अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर’ असल्यानं. ‘बीएसएनएल’चा ‘एआरपीयू’ हा 90 रुपयांच्या आसपास फिरतोय, तर ‘एअरटेल’चा सर्वांत जास्त 211 रुपये, ‘जिओ’चा 195 रुपये अन् ‘व्होडाफोन आयडिया’चा 146 रुपयांवर पोहोचलाय. दर कमी असण्याचं आणखी एक कारण लपलंय ते अधिकृतरीत्या ‘हायस्पीड 4जी’च्या सुरुवातीची घोषणा ‘भारत संचार निगम लिमिटेड’नं न केल्यानं...

शिवाय खासगी ऑपरेटर्सनी त्यांच्या ग्राहकांना ‘5जी’च्या दिशेनं वळविलंय. फक्त ‘व्होडाफोन आयडिया’नं मात्र अजूनही ‘4जी’वर समाधान मानलेलं असलं, तरी त्यांचीही निधी उभारणी केल्यानंतर ‘5जी’च्या दिशेनं वाटचाल सुरू होईल. ‘बीएसएनएल’च्या यशासाठी निश्चितच श्रेय द्यावं लागेल ते मोदी प्रशासनानं घेतलेल्या भक्कम निर्णयाला. सरकारनं ‘टाटा समूहा’च्या ‘टीसीएस’ व ‘तेजस नेटवर्क्स’वर ‘भारत संचार निगम’ला 360 अंशांत फिरविण्याची जबाबदारी सोपविली. त्यांना साहाय्य केलंय ते सरकारच्या ‘सी-डॉट’नं...प्रशासनानं ‘नोकिया’, ‘एरिक्सन’ नि ‘सॅमसंग’ यांना कामाची ऑर्डर न देता 100 टक्के विश्वास ठेवला तो ‘टाटा समूहा’वर अन् पुन्हा एकदा दर्शन घडलंय ते स्व. रतन टाटांच्या समूहावर लोकांच्या असलेल्या विश्वासाचं...

‘अंबुजा’च्या ताफ्यात ‘ओरिएंट’...

गेल्या आठवड्यातील दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे अब्जाधीश गौतम अदानी यांच्या ‘अंबुजा सिमेंट’नं गिळंकृत केलेला चंद्रकांत बिर्ला आणि त्यांच्या कुटुंबाच्या ‘ओरिएंट सिमेंट’चा हिस्सा...कुमारमंगलम बिर्ला यांच्या सर्वांत जास्त खपणाऱ्या ‘अल्ट्राटेक सिमेंट’ला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अदानीनी 3 हजार 791 कोटी रुपयांना हा हिस्सा विकत घेतलाय. नियमांनुसार, भारतात दुसऱ्या क्रमांकावर असलेली ‘अंबुजा’ येऊ घातलेल्या दिवसांत 26 टक्क्यांसाठी ‘ओपन ऑफर’ जाहीर करेल. गौतम अदानींनी सप्टेंबर, 2022 मध्ये ‘अंबुजा’ची खरेदी केल्यानंतर त्यांनी अधिग्रहण केलेली ही पाचवी सिमेंट कंपनी. जून महिन्यात हैदराबादच्या ‘पेन्ना सिमेंट’ला त्यांनी घशात घातलं होतं...

‘ओरिएंट’साठी ‘अल्ट्राटेक’ व सज्जन जिंदाल यांची ‘जेएसडब्ल्यू सिमेंट’ यांनीही जोरदार प्रयत्न केले होते. पण तेलंगण आणि कर्नाटक इथं प्रत्येकी दोन, तर महाराष्ट्रात एक प्लांट असलेल्या ‘ओरिएंट’नं हिरवा कंदील दाखविला तो गौतम अदानींनाच. या अधिग्रहणामुळं ‘अंबुजा सिमेंट’ची क्षमता 85 लाख टनांनी वाढेल व ती पोहोचेल 9.7 कोटी टनांवर. गौतम अदानींना 2028 पर्यंत वार्षिक 14 कोटी टनांच्या टप्प्याला स्पर्श करायचाय. जर तुलना केली, तर सध्या ‘अल्ट्राटेक’ची वार्षिक क्षमता 18 कोटी टन सिमेंटची निर्मिती करण्याची असून कुमारमंगलम बिर्ला यांनाही 2027 पर्यंत 20 कोटी टनांवर झेप घ्यायचीय...

‘चंद्रकांत बिर्ला ग्रुप’नं ‘ओरिएंट सिमेंट’ची विक्री केलीय ती अन्य काही उद्योगांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी. 3 अब्ज डॉलर्सच्या या समूहानं आरोग्य निगा क्षेत्रावर जास्तीत जास्त भर देण्याचं ठरविलंय अन् ‘बेबी सायन्स’ व ‘एआरएमसी’ या दोन ‘फर्टिलिटी चेन्स’ची खरेदी केलीय. त्यामुळं त्यांच्या क्लिनिक्सची संख्या पोहोचलीय ती 50 वर. खेरीज चंद्रकांत बिर्ला यांच्या समूहानं मार्च महिन्यात पाईप्स व घराच्या बांधकामांसाठी निर्मिती करणाऱ्या ‘टॉपलाईन’लाही ताब्यात आणलं होतं. सध्या ‘ग्रुप’नं ग्राहक, माहिती तंत्रज्ञान, घरबांधणीसाठी लागणारं साहित्य नि ‘आरोग्य निगा’ वगैरे क्षेत्रांना प्राधान्य दिलंय. येऊ घातलेल्या पाच वर्षांत महसूल 6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याचं समूहानं ध्येय ठेवलंय...

‘सी. के. बिर्ला समूहा’चे अध्यक्ष चंद्रकांत बिर्ला म्हणजे कुमारमंगलम बिर्ला यांच्या आजोबांचे भाऊ. त्यांना अदानी समूहाबद्दल पूर्ण विश्वास असून गौतम अदानी यांच्यातच ‘ओरिएंट सिमेंट’ला योग्य स्थानी पोहोचविण्याची ताकद असल्याचं त्यांना वाटतंय...‘अंबुजा’ला आशा आहे ती बाजारपेठेतील हिस्सा ‘ओरिएंट’च्या अधिग्रहणामुळं दोन टक्क्यांनी वाढण्याचा. ‘ओरिएंट सिमेंट’साठी अदानींनी प्रति शेअर 395 रुपये 40 पैसे दिलेत. ‘ओरिएंट’चं वैशिष्ट्या म्हणजे सिमेंटची कमी किंमत अन् डोक्यावर नसलेला कर्जाचा मोठा बोजा!

भारतातील नामवंत सिमेंट कंपन्यांची क्षमता

कंपनीचं नाव             वार्षिक क्षमता

  • अल्ट्राटेक                181 दशलक्ष टन
  • अंबुजा-एसीसी          97 दशलक्ष टन
  • श्री सिमेंट                 60 दशलक्ष टन
  • दालमिया भारत         47 दशलक्ष टन
  • न्युवोको                   25 दशलक्ष टन

- राजू प्रभू(raju.prabhu6@gmail.com)

मागील महिन्यांमध्ये सरकारने मिशन मौसम कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. तसेच देन वर्षांसाठी 2,000 कोटींचा निधी दिला.

-मृत्युंजय महापात्रा, आयएमडी, महासंचालक

केंद्र सरकार बिहारसह तीन राज्यात रेल्वेचा विस्तार करणार असून, अवकाश क्षेत्रासाठीही 1 हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

-अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री

सौर ऊर्जेतील आत्मनिर्भरता

आगामी सहा वर्षांत, म्हणजे 2030 पर्यंत भारतात 500 गिगावॅट एवढी रिन्यूएबल किंवा नवीकरणीय ऊर्जाक्षमता निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य भारत सरकारने निश्चित केले आहे. महाराष्ट्र शासनाने ’मुख्यमंत्री सौ कृषी वाहिनी योजने’च्या माध्यमातून ठिकठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. उदाहरणार्थ, पीक उत्पादक शेतक्रयांना रात्रीऐवजी दिवसभरात पूर्ण क्षमतेने अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील भादली व धोंदलगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमधून 40 हजार युनिट वीजनिर्मिती होत असून, याद्वारे शेतक्रयांना मोठाच फायदा होत आहे. जवळपास 20 गावांतील कृषीपंपधारक ग्राहकांना या प्रकल्पाचा उल्लेखनीय लाभ झाला आहे. भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे मिळत नसल्यामुळे, शेतक्रयांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच सौरऊर्जा प्रकल्पाचे महत्त्व मोठे आहे.

देशात विविध ठिकाणी सरकार वीजनिर्मितीसाठी पर्यायी स्रोतांनाही प्रोत्साहन देत असून, यामध्ये सौर ऊर्जा ही प्रमुख आहे. दीव या केंद्रशासित प्रदेशात दररोज 100ज्ञ् सौर ऊर्जेवर वीजपुरवठा सुरू आहे. दोन सौर उद्याने आणि 112 सरकारी संस्थांच्या छतावरील सौर प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज ही दीवची उर्जेची गरज भागवत आहे. दिवसभर वीज फक्त सौर ऊर्जेपासून निर्माण केली जाते आणि दीवमधील घरांची, इस्पितळांची, सरकारी कार्यालयांची गरज सौरऊर्जा उद्यानांमधून भागवली जात आहे. दीवमध्ये ऊर्जा विभागाने 13 आणि 10 मेगावॅट क्षमतेची दोन सौर ऊर्जा संयंत्रे बसवली आहेत. तर छतावरील यंत्रणेची क्षमता तीन मेगावॅट आहे. महाराष्ट्रातही 36 हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सध्याच्या अंगणवाडी केंद्रांना वीजसुविधा नाही. त्यांना एक किलोवॅट क्षमतेचे बॅटरीसह संच टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. यासाठी 564 कोटी ऊपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारचे हे धोरण योग्यच आहे.

परंतु नवीकरणीय ऊर्जेसाठी आणि खास करून, सौर उर्जेकरिता येत्या काही वर्षांत 30 अब्ज डॉलर्स इतक्या रकमेची सौर उपकरणे व सामग्री आयात करावी लागणार आहे. सध्या याबाबतीत भारत हा चीनवर अधिक अवलंबून आहे. जेव्हा आपण अन्य देशांवर अवलंबून असतो, तेव्हा ते त्याचा गैरफायदा घेऊन सोईप्रमाणे किमती ठेवू शकतात. म्हणूनच या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. चीनमधील उपकरणे खूप स्वस्तात येत आहेत. भारतीय कंपन्या आपल्या स्पर्धेत टिकूच नयेत, असे चीनचे धोरण आहे.

वास्तविक भारत सरकारने उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरू करून, देशांतर्गत उत्पादनास चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने या क्षेत्रात साडेचार अब्ज डॉलर्सची गुंतवणूकही केली आहे. 2023-24 मध्ये भारताने पंधरा गिगावॅट सौर उत्पादनक्षमता निर्माण केली आहे. आत्तापर्यंत त्यामुळे देशात 90 गिगावॅट क्षमता निर्माण झाली आहे. 2014 मध्ये देशात तीन गिगावॅट सौर ऊर्जादेखील निर्माण केली जात नव्हती. परंतु आता 500 गिगावॅट लक्ष्य साध्य करण्यासाठी दरवर्षी 65-70 जिगावॅट क्षमता नव्याने तयार करावी लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा उपकरणे आयात करावी लागणार आहेत. गेल्या पाच वर्षांत चीनमधील देशांतर्गत मागणी कमी झाली आहे आणि तेथील औद्योगिक क्षमता तर प्रचंड आहे. अशावेळी चीनमध्ये अतिरिक्त क्षमता निर्माण झाली असून, म्हणूनच चीन हा पडेल भावात आपला वेगवेगळा उत्पादित माल भारत व अन्य देशांना विकत आहे. त्यात सौर सामग्रीदेखील आली. 2023-24 मध्ये भारताने सात अब्ज डॉलर्स इतकी सौर सामग्री आयात केली. त्यामध्ये चीनचा वाटा 62ज्ञ् होता. सौर ऊर्जा बनवण्यासाठी लागण्राया पॉलिसिलिकॉन्सचे 97ज्ञ् आणि सोलर मॉड्यूल्सचे 80ज्ञ् उत्पादन चीनमध्ये होते. म्हणजे जगात याबाबतीत चीनची मत्तेदारीच आहे.

भारतातील सौर ऊर्जा .उपकरणांचे उत्पादन करणारा उद्योग बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारी बहुतेक सामग्री आपण आयात करतो. गेल्या आर्थिक वर्षात भारताने जवळपास साडेचार अब्ज डॉलर्स इतकी सोलर मॉड्यूल्स आयात केली होती. त्याचबरोबर सोलर सेल्स इन्हर्टर्स, केबल्स यांचीही लक्षणीय प्रमाणात आयात केली होती. आयात केल्या जाण्राया सोलर सेल्सपासूनच आपण यापैकी बहुतेक सर्व मॉड्यूल्स तयार करतो. केवळ 15 टक्के सोलर सेल्स हे देशात बनतात. फक्त देशांतर्गत कच्चा माल वापरून भारतात सोलर सेल्स बनवले जात नाहीत.  म्हणूनच सिलिका रिफायनिंगपासून ते सोलर सेल्सचे उत्पादन करण्यापर्यंत भारताने स्वावलंबी बनले पाहिजे. त्यासाठी पोलिसिलिकॉन उत्पादनासारख्या प्रचंड ऊर्जा लागण्राया प्रक्रियांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. तसेच ?ल्युमिनियम फ्रेम्स आणि ग्लास यासारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालात गुंतवणूक करणे जरूरीचे आहे. कच्च्या मालाचे उत्पादनही हाती घ्यावे लागेल. भारत हा व्हिएतनाम, मलेशिया आणि थायलंडकडूनही सौर ऊर्जेसाठी लागणारी सामग्री आयात करतो. भविष्यकाळात हे चित्र बदलण्यासाठी आपल्या धोरणात मूलभूत बदल करावे लागतील.

- हेमंत देसाई,hemant.desai001@gmail.com

साध्यस्तीत सोने भाव चडे का ?

गेली दोन वर्षे सोन्याचा भाव वाढतच चलला आहे. येत्या काळात तो अजून वाढण्याची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील जाणकरांचे मत आहे. भारतीयांना सोने नेहमीच मोहात पाडते. आर्थिक गरज निर्माण झाल्यास, सोने मोडून पैसेही उभे करता येतात. सध्या सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या सहा महिन्यात सोन्याने 30 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षाचा विचार केला तर सोन्याने ‘निफ्टी’पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

जेव्हा जगात अनिश्चितता असते अशा स्थितीत बहुधा सोन्याचे भाव वाढतात. फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. गाझा पट्टीतही चकमकी सुरु आहेत. युद्धाने जागतिक अनिश्चितता वाढते तेव्हा बहुतेक देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी वाढवितात. रशियाच्या मध्यवर्ती बँकेनेही अधिकाधिक सोने खरेदी करायला सुरुवात केली. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली. पण पुरवठा त्या प्रमाणात न वाढल्याने भाव वाढले. चीनबाबतही असेच घडले. चीन आणि तैवान यांच्यात थेट युद्ध झाले नसले तरी तणाव व युद्धजन्य परिस्थिती बऱ्याच काळापासून आहे. यामुळे पीपल्स बँक ऑफ चायना या चीनच्या मध्यवर्ती बँकेने नोव्हेंबर 2022 ते एप्रिल 2024 या काळात तब्बल 316 टन सोने विकत घेतले. मागणी वाढल्यामुळे सोन्याचे भाव वाढले.

दुसरे कारण म्हणेजे कच्चे तेल. कच्च्या तेलाचा संबंधही सोन्याच्या भावाशी येतो. पश्चिम आशियात सध्या जी तणावपूर्व स्थिती आहे म्हणजे इस्त्राईलच्या हमास, हिज्बुल्ला व इराणशी घडत असलेल्या क्षेपणास्त्र चकमकी, लाल समुद्रातील हल्ले आदी घटनांमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. आखाती देश आपले कच्चे तेल जगभर वितरीत करतात. पण युद्धस्थितीत त्याचा पुरवठा कमी होतो. मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्यामुळे किमती वाढतात. कच्च्या तेलाचा भाव वाढला की, त्यापासून बनणाऱ्या पेट्रोल, डिझेल, केरोसिन अशा इंधनांच्या किमतीही वाढतात. परिणामी महागाई वाढते आणि महागाई वाढली की, अनिश्चितता येते म्हणून सोन्याचा भावही वाढतो.

तिसरे कारण म्हणजे अमेरिकेसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्येही सध्या मंदीचे प्रवाह आहेत. सिलिकॉन व्हॅली नावाची अमेरिकेतील एक मोठी बँक काही महिन्यांपूर्वी बुडीत निघाली. यातून अनिश्चितता निर्माण होवून सोन्याचे भाव वाढतात. काही काळापूर्वी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने (फेड) त्यांच्या व्याजदरात कपात केली. अशी व्याजदर कपात होते तेव्हा नागरिकांना रोख्यांवरील व्याज कमी होणार याची काळजी वाढते. म्हणून ते सोने किंवा अन्य मालमत्तांत गुंतवणूक वाढवितात. त्यामुळे सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याचा भाव वाढतो.

आता दिवाळी येवून ठेपली आहे. लग्नांचा काळही सुरु होत आहे. यामुळे सोन्याची खरेदी वाढली आहे. खरेदी वाढली म्हणजे मागणी वाढली की सोन्याचा भाव वाढणारच. वरील कारणांमुळे गेली दोन वर्षे सोने वाढत आहे. ते भविष्यात आणखीन वाढण्याची शक्यता आहे. गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्या-चंदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरुन थेट 6 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. तेव्हा सोन्याचे भाव घसरले होते. पण ही घसरण अल्पजीवी ठरली. पुन्हा सोन्याचे भाव चढतच राहिले. सोने आता गुंतवणुकीसाठी आकर्षक बनत चालले आहे. सोन्याने गेल्या दोन वर्षात चांगला परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी 10 टक्के रक्कम सोन्यात गुंतवावी असे गुंतवणूक तज्ञांचे मत आहे.

सोन्याशी संबंधित शेअर

1) कल्याण ज्वेलर्स - भारत व पश्चिम आशियात मिळून या कंपनीची 150 ‘शोरुम’ आहेत. भारत व आखाती देशात यांची उत्पादने चांगली विकली जातात. परिणामी या कंपनीच्या महसुलात वार्षिक 26.5 टक्के वाढ झाली आहे. या कंपनीचा शेअर वर वर सरकत आहे. 2) टायटन - ही टाटा समुहाची कंपनी. टायटन म्हटले की, आपल्याला घड्याळे आठवतात. कारण टायटनचा घडाळ्यांचा ब्रँड फार लोकप्रिय आहे. पण या कंपनीला जास्त महसूल हा घड्याळांपेक्षाही दागिन्यांच्या विक्रीतून मिळतो. कंपनीचा ‘तनिष्का’ हा ब्रँड प्रसिद्ध आहे. टायटन कंपनीला महसूलात वार्षिक 11.5 टक्के वाढ झाली आहे. या कंपनीचा शेअर हळूहळू गतीने वधारत चांगला आहे. 3) थंगमाइल ज्वेलर्स - या कंपनीची दक्षिण भारतात 50 हून अधिक स्टोअर्स आहेत. या कंपनीच्या महसूलात चांगली वाढ असून, शेअरही वर वर चढत आहे. 4) सेन्को गोल्ड - ही कंपनी पूर्व भारतातील सर्वात मोठी रिटेल गोल्ड कंपनी आहे. या भागात कंपनीची 90 हून अधिक सेल्स सेंटर आहेत. नुकतेच या कंपनीने सेन्को गोल्ड बीन्स नावाने एक नवे उत्पादन सादर केले आहे. हे उत्पादन म्हणजे अर्धा ग्रॅम वजनाचा मणी (बीन). ज्या तरुण गुंतवणुकदारांना सोन्यात साधारणपणे चार हजार रुपये गुंवतणूक परवडते अशांसाठी हे ‘प्रॉडक्ट’ चांगले आहे. या कंपनीचा शेअर भविष्यात काय प्रगती करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 5) पीएनजी ज्वेलर्स - पु. ना. गाडगीळ (पी.एन.जी) ज्वेलर्स ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संघटित रिटेल गोल्ड कंपनी आहे. महाराष्ट्रातील सराफी दुकानांची संख्या बघितली तर पहिल्या क्रमांकावर तनिष्का आणि दुसऱ्या क्रमांकावर पी.एन.जी. ज्वेलर्स आहेत. या कंपनीकडे शेअर विक्रीतून जे निधी उपलब्ध झाला आहे त्याचा उपयोग ही कंपनी नवीन दालने उघडण्यासाठी करणार आहे. हा शेअर नवीन असल्यामुळे, हा भविष्यात कुठे असेल याबद्दल गुंतवणुकदारांना आकर्षण आहे.

बाजारात जोरदार घुसळणीची शक्यता

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी यंदाच्या वर्षातील सर्वांत चिंतेचा महिना म्हणून चालू महिन्याचा उल्लेख करावा लागणार असे दिसत आहे. जानेवारी 2024 मध्ये 21,100 पासून निघालेला निफ्टी सप्टेंबरमध्ये 26,300 पर्यंत पोहोचला; अवघ्या 9 महिन्यांत पाच हजारांहून अधिक अंकांची वाढ झाली; पण ऑक्टोबरच्या एका महिन्यात 2300 अंकांची घसरण झाली आहे. याचे मुख्य कारण विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक विक्रीचा भडीमार. गेल्या आठवड्याच्या अगदी समाप्तीला बाजारात नीचांकी स्तरावरुन थोडीशी उसळी दिसून आली; पण ती टिकणार का हे चालू आठवड्यात पहावे लागेल. गेल्या दोन दिवसांत जाहीर झालेले तिमाही निकाल आणि या आठवड्यातील निकालांचे पडसाद बाजारात जाणवतील. याशिवाय, इस्रायल-इराण युद्ध, वधारलेला डॉलर आणि बाँडयिल्ड यांचाही प्रभाव जाणवेल.

कोरोना महामारीनंतर भारतीय शेअर बाजारात सुरू झालेला तेजीची एक्सप्रेस जवळपास चार वर्षे हेलकावे खात का असेना पण न अडखळता सुसाट सुरू राहिली. विशेषत: अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आणि चीनमधील घसरणीचे चक्र सुरू झाल्यानंतर भारतीय बाजारात डीआयआय आणि एफआयआय यांबरोबरच किरकोळ गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या जोरदार खरेदीमुळे निफ्टी, सेन्सेक्ससह सर्वच निर्देशांकांनी नवनवीन शिखरे गाठली. 2024 हे वर्ष यामध्ये सर्वांत शानदार ठरले. जानेवारी 2024 मध्ये 21,100 पासून निघालेला निफ्टी सप्टेंबरमध्ये 26,300 पर्यंत पोहोचला; अवघ्या 9 महिन्यांत पाच हजारांहून अधिक अंकांची वाढ झाली. साहजिकच शेअर बाजाराच्या या धवल कामगिरीमुळे देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांसह मोठे गुंतवणूकदारही या तेजीमुळे सुखावले. नव्याने बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी इच्छुकांच्या आशाही पल्लवित झाल्या; पण ऑक्टोबरच्या एका महिन्यात 2300 अंकांची घसरण झाली आहे. याचे मुख्य कारण विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विक्रीचा भडीमार. 2018 ते 2024 या वर्षातील एफआयआयकडून होणाऱ्या विक्रीची आकडेवारी पाहिल्यास ऑक्टोबर महिना हा उच्चांकी ठरला आहे. ज्या कोरोना महामारीच्या आगमनामुळे बाजारात ऐतिहासिक हाहाकार माजला, त्या मार्च 2020 मध्येही 61,972 कोटींच्या समभागांची विक्री एफआयआयनी भारतीय शेअर बाजारात केली होती. पण ऑक्टोबर महिन्यात हा आकडा एक लाख कोटींवर गेला आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारासाठी ऑक्टोबर महिना ‘ब्लॅक मंथ’ ठरला आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांसह बाजार विश्लेषकांच्यातही चिंतेचे वातावरण आहे.

गेल्या आठवड्याचा विचार करता दुसऱ्या तिमाहीतील काही कंपन्यांचे निराशाजनक तिमाही निकाल आणि सर्वच क्षेत्रात झालेल्या विक्रीच्या मार्यामुळे सेन्सेक्समध्ये 1822.46 अंकांची म्हणजेच 2.24 टक्क्यांची घट होऊन हा निर्देशांक 79402.29 अंकांवर बंद झाला आहे; तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक असणार्या निफ्टीमध्ये गतसप्ताहात 2.70 टक्क्यांची म्हणजेच 673.25  अंकांची भरभक्कम घसरण होऊन तो 24,180.80 वर बंद झाला. लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये अनुक्रमे 3.2, 5.2 आणि 7.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. निफ्टी मीडिया, मेटल आणि रियल्टी क्षेत्रात 7 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली; तर ऑईल अँड गॅस इंडेक्स आणि पीसएसयू बँक इंडेक्समध्ये 6 टक्क्यांची घसरण झाली. तथापि, आठवड्याच्या अगदी समाप्तीला बाजारात नीचांकी स्तरावरुन थोडीशी उसळी दिसून आली. त्यामुळे 24 हजारांची पातळी निफ्टी तोडणार असे वाटत असताना 24,200 पर्यंत तो झेपावला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत.  पण ती टिकणार का हे चालू आठवड्यात पहावे लागेल.

चालू आठवड्यात भारतातील  सर्वांत मोठा सण असणाऱ्या दिवाळीची आतषबाजी पार पडणार आहे. त्यादृष्टीने गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन कसा राहातो पहावे लागेल. गेल्या दोन दिवसांत जाहीर झालेल्या आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँकेसह काही तिमाही निकालांचे पडसादही बाजारात उमटणार आहेत. याखेरीज मारुती सुझुकी, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्टस्, कॅनरा बँक, सिप्ला, एसबीआय कार्डस्,  एल अँड टी, टाटा पॉवर, डाबर इंडिया, आदित्य बिर्ला कॅपिटल, बायोकॉन, भारती एअरटेल, सनफार्मा, अंबुजा सिमेंटर, पीएनबी, सुझलॉन, भेल, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, फेडरल बँक, टाटा टेक्नॉलाजीज, अंजटा फार्मा आदी कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. या निकालांचे पडसाद बाजारात जाणवतील.

याखेरीज इस्रायलने इराणवर केलेल्या सर्वांत मोठ्या हल्ल्यामुळे आखातातील चिंता वाढल्या आहेत. या अस्थिरतेचा परिणामही भारतीय बाजारात दिसून येणार आहे. तसेच वधारलेला डॉलर आणि बाँडयिल्ड यांमुळेही भारतीय बाजारावर दबाव राहील. टेक्निकल चार्टनुसार निफ्टीसाठी 24100 ते 24000 या पातळीवर तत्कालिक आधार दिसत असून 24350 ते 24500 या पातळीवर अडथळा दिसत आहे. तो तोडून बाजार स्थिरावल्यास 24700 पर्यंत झेपावू शकतो. परंतु सध्याची एकंदर परिस्थिती पाहता जोखीम प्रचंड वाढलेली असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेऊन संयम बाळगणे हिताचे ठरेल. सेबीकडून ऑप्शन आणि फ्यूचर ट्रेडिंग संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची अमलबजावणी पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याने त्याचेही पडसाद बाजारात उमटत आहेत. अशा वेळी ताकसुद्धा फुंकून पिणे चांगले. लक्षात ठेवा, शेअर बाजारात काहीही न करता संयम राखणे हेदेखील फायद्याचे ठरू शकते. जोखीम पत्करण्याची क्षमता असणार्यांना एसबीआय, रिलायन्स,  एसबीआय लाईफ, एचयुएल, टाटा पॉवर आदी दिग्गज कंपन्यांमध्ये खरेदीची संधी साधता येईल. परंतु जोरदार घुसळणीच्या शक्यता पाहता स्टॉपलॉसचा वापर करुन आपली जोखीम मर्यादित ठेवणे हिताचे ठरेल.

- संदीप पाटील,शेअर बाजार अभ्यासक

Advertisement
Tags :

.