कलाशिक्षक एल. के.सावंत यांचे कलाक्षेत्रातील योगदान अतुलनीय !
एल के सावंत यांचा सेवानिवृत्ती निमित्त हृदय सत्कार
ओटवणे प्रतिनिधी
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे कलाशिक्षक एल के सावंत यांची शिकवण्याची पद्धत व चित्रकलेचा अभ्यास आम्ही जवळून पाहत आम्ही ही कला आत्मसात केली. त्यानी आपल्या ३६ वर्षाच्या कला सेवेत कलात्मक विद्यार्थी घडविण्यासह या हायस्कूलच्या गुणवत्ता वाढीसह शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. असे गौरवोद्गार आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाचे सचिव राजन नाईक यांनी काढले.आरोस हायस्कूलचे कला शिक्षक एल्. के. सावंत हे आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या गौरव सोहळ्यात राजन नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सौ वेदीका सावंत, संथा पदाधिकारी तथा मळेवाड माजी उपसरपंच अर्जुन मुळीक, श्रीकृष्ण पुनाळेकर, उल्हास मुळीक, दादा नाईक, सूर्यकांत सावंत, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, कलाध्यापक जिल्हा संघटना उपाध्यक्ष संदीप साळसकर, माजी मुख्याध्यापक श्री आसोलकर, रमेश डामरेकर, सौ सुशिला खोत, माजगावच्या श्री भाईसाहेब माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आर के सावंत, डी. पी. सावंत, श्री राणे, श्री मालवणकर, आरोस हायस्कूल व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री धुपकर, माजी मुख्याध्यापक श्री मांजरेकर, बांदा खेमराज हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम. डी सावंत, सौ माधवी सावंत, पांडुरंग सावंत, शाळेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक तसेच शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, मित्र मंडळी, आप्तेष्ट आणि सावंत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी संदीप साळसकर म्हणाले, विद्यालयातील कला शिक्षक निवृत्त होणे म्हणजे शाळेसाठी एखादी फुलबागच कोमेजल्या सारखी आहे. कलाध्यापक संघातील एक उमद नेतृत्व म्हणून सावंत सरांकडे पाहिले जाते. त्यांनी कधीही जबाबदारी टाळली नाही. सुंदर स्वभावासह स्वच्छ हस्ताक्षर, लक्षवेधी फलकलेखन, मनाला भावणारी चित्रकला अशी त्यांची कारर्किद स्मरणात राहील. यावेळी शिरीष नाईक यांनी शाळेला एल के सावंत यांच्या रूपाने पर्फेक्टनिष्ठ शिक्षक लाभले होते. शाळेच्या उपक्रमासाठी त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले असून ते कायम राहणार आहे. त्यामुळे शाळेला ज्यावेळी त्यांची गरज भासेल त्यावेळी त्यांचे हक्काने मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एल के सावंत यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो यासाठी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आजी माजी विद्यार्थ्यांनीही त्यांच्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध संस्था आणि व्यक्ती यांच्यावतीने त्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.यावेळी एल के सावंत यांनी आपल्या कुटुंबीयांसह या हायस्कूलमधील आजपर्यंतच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संस्था पदाधिकारी पालक व आजी व माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपण या शाळेसह विविध क्षेत्रात योगदान देऊ शकलो असल्याचे सांगून या शाळेशी जुळलेले ऋणानुबंध यापुढेही कायम राहतील याची ग्वाही दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री वरक यांनी, उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक शिरीष नाईक तर आभार शिक्षक अनिल नाईक यांनी मानले.