कलाशिक्षकाने साकारले भवाळकर यांचे फलक रेखाटन
सांगली :
साहित्य आणि समाज यांचा काही संबंध राहिला आहे का? असा प्रश्न अलीकडच्या काळात प्रत्येक साहित्य संमेलनाच्या नंतर विचारला जातो. मात्र यंदाच्यावर्षी दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या संमेलनात अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या भाषेच्या भविष्याविषयक व्यक्त केलेल्या चिंतनाचा प्रभाव समाजात किती खोलवर निर्माण झाला आहे याचे प्रत्यंतर दूर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एका कलाशिक्षकाच्या कृतीतून समाजापुढे आले आहे.
गेली तीस वर्षे शिक्षण मंडळ भगूर संचलित आपल्या नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव (ता. चांदवड) या हायस्कूलमध्ये फलक रेखाटन करून संपूर्ण महाराष्ट्रात ख्यातकीर्त झालेल्या कलाशिक्षक देव हिरे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने रेखाटलेला फलक समाजमाध्यमावर खूपच चर्चेत आला आहे.
देव हिरे यांनी जागर स्त्री शक्तीचा या मथळ्यासह दिल्लीचं तख्त गाजविणारी रणरागिणी! मराठी अस्मितेचा तारा! असा गौरवपूर्ण उल्लेख करून त्या फलकावर डॉ. भवाळकर यांचे चित्र रेखाटले आहे.
शिवाय याबद्दल बनविलेल्या व्हिडिओला त्यांचे दिल्लीतील गाजलेल्या भाषणातील, भाषा बोलली तर ती जिवंत राहते. नुसती पुस्तकातून आणि ग्रंथातून ती जिवंत राहत नाही हे वक्तव्यही जोडले आहे.
गेली ३० वर्षे हिरे ही फलक रेखाटन करतात. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक व इतर सहकारी यांचे मोठे सहकार्य लाभते. शाळेच्या कले व्यतिरिक्त अधिकचा वेळ देऊन ते आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिनविशेष मुलांना समजावून सांगत असतात.
हिरे यांचे हे कार्य आता महाराष्ट्रभर पसरले असून अनेक शिक्षक त्यांच्या प्रमाणेच राज्यात असा उपक्रम राबवून मुलांचे ज्ञानविश्व समृद्ध करत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना भावलेल्या भाषणाचा त्यांनी महिला सन्मान आणि मराठी भाषा संवर्धन कार्यासाठी केलेला उपयोग राज्यभर कौतुकाचा विषय ठरला