जांबोटी-कणकुंबी भागात मान्सूनचे आगमन
सोमवारी पहाटेपासून हलक्या सरींचा शिडकावा : भातरोप तरुंना काही प्रमाणात दिलासा
वार्ताहर/जांबोटी
गेल्या पंधरा दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या मान्सून पावसाने सोमवारी पहाटेपासून जांबोटी-कणकुंबी भागात हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभर हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरींना प्रारंभ झाल्याने बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जून महिना संपायला आला तरी अद्याप मान्सूनला प्रारंभ झाला नसल्यामुळे या भागातील खरीप हंगामातील शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला असून ते चातकाप्रमाणे पावसाच्या प्रतीक्षेत होते. या भागात मोठ्या प्रमाणात भातरोप लागवड करतात. यासाठी आवश्यक तरुंची पेरणी जून महिन्याच्या प्रारंभी करतात. मान्सूनच्या पावसाने योग्य साथ दिल्यास या भागात जुलै महिन्याच्या प्रारंभी भातरोप लागवडीला प्रारंभ करण्यात येतो. मात्र यावर्षी जमिनीत आवश्यक ओलावा नसल्यामुळे पेरणी लांबणीवर पडली आहे.
भातरोप लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता
तसेच पेरणी केलेल्या भातरोपांच्या तरुंची पावसाअभावी उगवण झाली नाही. तसेच काही ठिकाणी उगवलेल्या भातरोपांचे तरू वाळून गेल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गावर दुबार तरू पेरणीचे संकट उद्भवले असून तरुअभावी भातरोप लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भातरोपांचे तरू वाळून जावू नये यासाठी काही ठिकाणी शेतकरी टँकरद्वारे पाणी देऊन भात रोप वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
गारवा निर्माण झाल्याने तरुंना पोषक
रविवारी दुपारी या भागात मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा वळीव पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा सोमवारी पहाटेपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस होत असल्याने भात रोपांच्या तरुना गारवा निर्माण झाल्यामुळे उष्म्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढल्यास या भागात रताळी वेल लागवडीच्या कामांना देखील प्रारंभ होण्याची शक्यता आहे. तसेच जनावरांना हिरवा चारादेखील उपलब्ध होणार आहे. सोमवारी दिवसभर या भागात पावसाचा शिडकावा सुरुच राहिल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.