‘शिवालिक’चे मुद्रा बंदरात आगमन
गॅसचा पुरवठा वाढणार, युद्ध अद्यापही भडकलेलेच : इराणवर पुन्हा इस्रायलचे हल्ले, इराणचेही क्लस्टर क्षेपणास्त्र सोडून प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इंधन वायू घेऊन येणाऱ्या ‘शिवालिक’ या नौकेचे गुजरात येथील मुंद्रा बंदरात आगमन झाले आहे. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला असून आणखी दोन नौका आज मंगळवारपर्यंत भारतापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून ‘शिवालिक’ या नौकेने विनासायास प्रवास पूर्ण केला. ही सामुद्रधुनी बंद करण्यात आलेली नसून केवळ ‘नियंत्रित’ करण्यात आलेली आहे. या सामुद्रधुनीतून इराणच्या मित्रदेशांच्या नौका वाहतूक करू शकतात, अशी स्पष्ट घोषणा इराणच्या प्रशासनाने केल्याने इंधनपुरवठ्याचा दबाव बराच कमी होत आहे.
इंधन वायू घेऊन येणारी आणखी एक नौका ‘नंदा देवी’नेही होर्मुझची सामुद्रधुनी सुरळीतपणे पार केली असून तिने खोल सागरात प्रवेश केला आहे. ही वायूवाहक नौका आज मंगळवारपर्यंत मुंबईत पोहचणार आहे. ‘शिवालिक’ या नौकेत 45 हजार टन इंधनवायू असून ‘नंदा देवी’ या नौकेतही 35 हजार टन वायू असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारताची इंधन वायूची दैनंदिन आवश्यकता जवळपास 1 लाख टन इतकी असल्याचे दिसून येते. सध्या देशात वायूची टंचाई नसून एकाही सिलिंडर वितरण केंद्राने सिलिंडर नसल्याची माहिती नोंदविलेली नाही, असे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम विभागाकडून स्पष्ट केले गेले.
दैनंदिन मागणीत घट
युद्धाचा प्रारंभ झाल्यानंतर देशभरात गॅस सिलिंडरच्या बुकींगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. देशात सध्या जवळपास 25 हजार सिलिंडर वितरण केंद्रे असून त्यांच्यामध्ये एकंदर प्रतिदिन 55 लाख सिलिंडर्सची मागणी नोंद होते. तथापि, युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर ही मागणी 85 ते 90 लाख प्रतिदिन इतकी वाढली होती. पण आता परिस्थिती निवळू लागली आहे. दैनंदिन बुकिंगमध्ये घट होत असून सध्या प्रतिदिन 70 लाख सिंलिंडर्सची मागणी नोंदली जात आहे.
आणखी 12 नौका प्रतीक्षेत
होमुझ सामुद्रधुनीच्या दोन्ही टोकांना भारताच्या 12 वायूवाहक नौका अनुमतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना इराणची अनुमती मिळावी, यासाठी भारताचा परराष्ट्र व्यवहार विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी इराणच्या प्रशासनाशी सातत्याने चर्चा करण्यात येत असून ही अनुमती मिळाल्यास भारताची अधिक मोठी सोय होणार आहे. आतापर्यंत भारताच्या चार वायूवाहक नौकांना अनुमती मिळाली आहे. भारताच्या नौकांवर बंदी घालण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट केले गेले.
इराणची भारताकडे मागणी
भारताने फेब्रुवारी 2026 मध्ये इराणच्या तीन मालवाहू नौका ताब्यात घेतल्या होत्या. त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी इराणकडून करण्यात आली आहे. तसेच भारताने इराणला औषधांचा, विशेषत: जीवबचाव औषधांचा पुरवठा करावा, अशीही मागणी इराणच्या प्रशासनाने केली आहे. औषधांसमवेत इराणला भारताकडून वैद्यकीय साधनसामग्रीचाही पुरवठा हवा आहे. भारतानेही आपल्या काही कैद्यांची इराणने मुक्तता करावी आणि भारतासाठीची ऊर्जा वाहतूक सुरक्षित होऊ द्यावी, अशी विनंती केली आहे. या युद्धाचा प्रारंभ झाल्यापासून भारत सातत्याने इराणच्या प्रशासनाच्या संपर्कात असून भारताच्या ऊर्जावाहक नौकांच्या सुरक्षित प्रवासासाठी चर्चा करीत आहे. सोमवारीही ही चर्चा करण्यात आली आहे.
युद्धाचा अंत कधी...
28 फेब्रुवारीला प्रारंभ झालेले हे युद्ध अद्यापही होत आहे. सोमवारी त्याने आणखी गंभीर वळण घेतले. इस्रायलने तेहरानवर प्रचंड वायुहल्ले केले आहेत. इराणनेही इस्रायलवर ‘क्लस्टर क्षेपणास्त्र’ सोडल्याचे वृत्त आहे. यामुळे इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे काही स्थानी हानी झाली आहे. अमेरिकेने सोमवारी इराणच्या चाबहार बंदराच्या लष्करी सुरक्षेवर हल्ला केला. खार्ग बेटावरही पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. याच बेटावरुन इराणची 95 टक्के तेलवाहतूक होत असते. अमेरिकेशी कोणतीही चर्चा करण्याची इच्छा नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणने सोमवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पुन्हा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. यामुळे या विमानतळावरुन आगीचे आणि धुराचे लोळ उठत असल्याचे दिसून येत होते. युद्ध लवकर थांबण्याची शक्यता सध्यातरी दिसत नसली, तर तसे प्रयत्न मात्र, मागच्या दरवाजाने होत असल्याचे दिसून येते.
भारताचा वायुदिलासा वाढणार...
ड भारताच्या आणखी नौकांना अनुमती मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार
ड भारताकडून इराणची औषधांसाठी मागणी, दोन्ही देशांमध्ये सातत्याने चर्चा