उचगाव परिसरात मंगलमय वातावरणात गणरायांचे आगमन
11:03 AM Sep 09, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
बेळगाव-बाची मार्गावरील तसेच महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी, कार्वे, तुर्केवाडी या भागातून तसेच कोवाड याही भागातून चोहोबाजूंनी गणपती मूर्ती आणण्याची सर्वत्र धावपळ चालल्याचे दिसून येत होते. सकाळच्या सत्रात किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर दिवसभर उघडीप मिळाल्याने भाविकांची दुचाकी, चारचाकी वाहनांसह रिक्षातून बाप्पाला घरी नेले. मात्र सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असताना गणेशमूर्तींच्या प्रतिष्ठापनेच्या वेळीच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेला थोडी कुचंबणा झाल्याचेही चित्र अनेक ठिकाणी दिसून येत होते. सायंकाळी तीननंतर अनेक भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणेशमूर्ती आणण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर वाहनांचा वापर केला जात असल्याचे चित्र दिसून येत होते. रात्री उशिरापर्यंत मंडळांच्या गणेशमूर्ती नेल्या जात होत्या. एकंदरीत या परिसरात चैतन्यरूपी बाप्पाची दिमाखात सर्वत्र आगमन झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
Advertisement
वार्ताहर/उचगाव
Advertisement
उचगाव परिसरामध्ये शनिवारी सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यामध्ये भाविक मग्न असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. पावसाची उघडीप, भाविकांचा उत्साह, गणपती बाप्पाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर अशा मंगलमय वातावरणात सकाळी घरगुती आणि सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना जल्लोषात करण्यात आली. यावर्षीही बहुतांश मंडळांनी स्वागत मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पाडल्या. या भागातील उचगाव, सुळगा, बेकिनकेरे, अतिवाड, बेनकनहळ्ळी, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, कोनेवाडी अशा सर्व गावातून वाजतगाजत बाप्पांची मिरवणूक आणि त्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली.
Advertisement
Advertisement
Next Article