लाडक्या गणरायाचे आज आगमन
स्वागतासाठी शहर सज्ज : भाविकांकडून जोरदार तयारी : वातावरण भक्तिमय : आज घरोघरी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना
बेळगाव : अबालवृद्धांसह सर्वांचेच श्रद्धास्थान असणाऱ्या लाडक्या बाप्पांचे आगमन शनिवारी होत असून स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळांनीही गणरायाच्या स्वागताचे चोख नियोजन केले आहे. एकंदर चहुकडे उत्सवी वातावरण निर्माण झाले असून अनंत चतुर्दशीपर्यंत भाविकांचा उत्साह उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. गणेशोत्सवाचा हा सोहळा गुण्यागोविंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनानेही दक्षता घेत सुरक्षेची योग्य व्यवस्था केली आहे. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे. शुक्रवारी बाजारपेठेत कमालीची गर्दी झाली. उत्सवाच्या निमित्त पूजा साहित्य फळे, फुले, पाने, पत्री यांची आवक वाढली. सजावटी साहित्याने तर संपूर्ण शहरच सजले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकही खरेदीसाठी शहरात आल्याने गर्दीतही भर पडली.
तसेच महाराष्ट्र आणि गोवा या भागातील ग्राहकही खरेदीसाठी आल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दी दिसून येत होती. वाढत्या गर्दीमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दृश्य दिसत होते. घरोघरी श्रीमूर्ती स्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. शुक्रवारी रात्रभर जागून त्यांनी मंडळाच्या गणेश आगमनाची तयारी पूर्ण केली. दुसरीकडे भटजींचे बुकिंग जोरदार सुरू झाले आहे. मात्र सततच्या पूजा असल्यामुळे त्यांची धांदलही उडणार आहे. मंडप उभा करणाऱ्यांनी शुक्रवारी रात्र जागून काढली. दरवर्षी गणेशाच्या आगमनाचा उत्साह वाढता वाढतच आहे. आगमनासाठी आणि विसर्जनावेळीसुद्धा वाद्यांची साथ घेण्याचा प्रघात सुरू झाला आहे. त्यामुळे ढोल-ताशे पथकांना मागणी आहे. मोदकांच्या प्रसादासह मिठाईवाले विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. जेथे पहावे तेथे उत्सावाच्या तयारीची लगबग सुरू आहे.