For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विवाहबाह्या संबंधातून जन्मली...लगेच नकोशी झाली!

11:28 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
विवाहबाह्या संबंधातून जन्मली   लगेच नकोशी झाली
Advertisement

महिनाभराच्या मुलीचा विक्रीचा प्रयत्न : डॉक्टरसह पाच जणांना अटक, जिल्हा बालसंरक्षण खात्याची कारवाई

Advertisement

बेळगाव : एक महिन्याच्या शिशुची विक्री करण्याचा प्रयत्न जिल्हा बालसंरक्षण विभाग व पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी पाच जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. शिशुविक्रीच्या या प्रकाराने बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निसर्ग ढाब्याजवळ रविवारी पहाटे एक महिन्याच्या स्त्राr जातीच्या शिशुची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा बालसंरक्षण विभागाचे सरकारी दत्तक केंद्रातील अधिकाऱ्यांनी अत्यंत चाणाक्षपणे या टोळीला जाळ्यात अडकविले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉक्टरांचाही समावेश आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक रामगौडा संकनाळ, के. बी. गौराणी, जास्मीन मुल्ला आदींनी शिशुविक्री प्रकरणातील पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे रविवारी सायंकाळी यासंबंधीची माहिती दिली आहे. जिल्हा बालसंरक्षण विभागातील सरकारी दत्तक केंद्राचे संयोजक राजकुमार सिंगाप्पा राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळमारुती पोलीस स्थानकात भादंवि 363, 370 व 80, 81 बालसंरक्षण कायदा 2015 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी महादेवी ऊर्फ प्रियांका बाहुबली जैनर (वय 37) रा. नेगिनाळ, ता. बैलहोंगल, डॉ. अब्दुल गफार हुसेनसाब लाडखान (वय 46) मूळचा रा. हंचिनाळ, ता. सौंदत्ती, सध्या रा. सोमवार पेठ, कित्तूर, चंदन गिरीमल्लाप्पा सुभेदार (वय 38) रा. तुरकर शिगीहळ्ळी, ता. बैलहोंगल, पवित्रा सोमप्पा मडिवाळर (वय 21) रा. संपगाव, ता. बैलहोंगल, प्रवीण मंजुनाथ मडिवाळर (वय 24) रा. होसट्टी, ता. धारवाड यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व पाच जणांना रविवारी रात्री येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. शिशुविक्रीच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अधिकाऱ्यांनी अत्यंत चाणाक्षपणे जाळ्यात अडकविले आहे.

Advertisement

60 हजारात खरेदी 1 लाख 40 हजारात विक्री

पोलीस सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 9 मे रोजी एका स्त्राr अर्भकाचा जन्म झाला होता. प्रसूतीनंतर काही दिवसांनी हे अर्भक नेगिनाळ येथील महादेवी जैनर हिने डॉ. अब्दुल गफार लाडखान याच्याकडून 60 हजार रुपयांना खरेदी केले होते. 60 हजारात खरेदी केलेल्या शिशुची 1 लाख 40 हजारात विक्री करण्यासाठी महादेवीची धडपड सुरू होती.

नियोजनबद्धपणे अडकविले जाळ्यात 

जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंबंधी माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी या टोळीशी संपर्क साधून शिशू खरेदी करण्याची तयारी दर्शविली. रविवारी सकाळी त्यांना बेळगावला बोलावून अत्यंत नियोजनबद्धपणे महादेवीला जाळ्यात अडकविण्यात आले. तिने दिलेल्या माहितीवरून डॉक्टर अब्दुल गफारसह आणखी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या एक महिन्याच्या शिशुला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रसूती कोठे झाली? या अर्भकाची विक्री सुरुवातीला कोणी कोणाला केली? या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का? आदी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.

दुप्पट किमतीचे आमिष

एका प्रेमीयुगुलाच्या विवाहबाह्या संबंधातून 9 मे 2024 रोजी स्त्राr अर्भकाचा जन्म झाला. पण लग्नाआधी मजा मारणाऱ्या या युगुलाला स्वत:च्या पोटी जन्मलेली ही मुलगी मात्र नको होती. त्यामुळे ज्या डॉक्टरकडे तिची प्रसूती झाली तेथेच तिला सोडून दिले. त्या डॉक्टराने सदर मुलीला महादेवी या महिलेला 60 हजारात अर्भकाची विक्री केली. त्यानंतर दुसऱ्यांना दुप्पट किंमत घेऊन अर्भक विकण्यासाठी या टोळीची धडपड सुरू झाली. याची कुणकुण लागताच जिल्हा बालसंरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांना बेळगावात बोलावले. शिशुच्या बदल्यात 1 लाख 40 हजार रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळेच हे पाच जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

यापूर्वी तीन अर्भकांची चोरी

अर्भकांची चोरी करून विक्री करण्याचा प्रकार बेळगावात नवा नाही. दहा वर्षांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटल व खासगी इस्पितळातून तीन अर्भकांची चोरी झाली आहे. या तिन्ही प्रकरणांची एपीएमसी पोलीस स्थानकात नोंदही झाली आहे. अर्भक चोरणाऱ्या महिलेची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. मात्र, या एकाही प्रकरणाचा आजतागायत छडा लागलेला नाही.

Advertisement
Tags :

.