बंद घर फोडून दागिने चोरणाऱ्यास अटक; सांगली, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल
भारत सूतगिरणीजवळील मंगलमूर्ती कॉलनी येथे झाली होती चोरी : संजयनगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
सांगली प्रतिनिधी
संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुपवाड रोडवरील मंगलमूर्ती कॉलनीमधील बंद घर फोडून चोरट्यांनी 23 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याची एकूण किंमत पाच लाख 31 हजार रूपये होते. ही घरफोडी आठ ते नऊ मार्च या कालावधीत घडली होती. याप्रकरणी संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने आकाश सतीश कवठेकर वय 26 रा. उमेदनगर, भारत सूतगिरणीजवळ कुपवाड, ता. मिरज या अट्टल गुन्हेगारास अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख 31 हजाराचा ऐवज जप्त केला. याबाबत सौ. वैजयंता महादेव बेरडे वय 50 रा. जुना रेल्वेमार्ग भारत सूतगिरणी समोर मंगलमूर्ती कॉलनी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सौ. वैजयंता बेरडे यांचे मुळगाव हे कर्नाटकात आहे. आठ मार्च रोजी त्या कुटुंबासहित कर्नाटक येथे गेल्या होत्या. त्यांनी घर व्यवस्थित बंद केले होते. पण नऊ मार्च रोजी त्या घरी परत आल्या त्यावेळी त्याच्या घराचे मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत तिजोरीचे दरवाजे उचकटून 23 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 20 हजार रूपये असा एकूण पाच लाख 31 हजार रूपयांची ऐवज चोरून नेला होता.
इतक्या मोठ्याप्रमाणात सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याचे समजताच संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच ही घरफोडी करणाऱ्याचे ठसे याची तपासणी केली असता त्यांना ही चोरी आकाश कवठेकरने केल्याचे समजले होते. त्यानुसार त्यानी त्याचा माग काढला होता. पण त्याच दरम्यान आपटा पोलीस चौकी परिसरात हा कवठेकर संशयास्पदरित्या पोलीस पथकास मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरीतील सोने घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या जागेत पुरून ठेवले होते. एका पेटीत असणारे सर्व दागिने त्याच्याकडे सापडले त्यानंतर त्याला अटक केली आहे. त्याने सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात घरफोडी केली आहे. त्याच्यावर या दोन्ही जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बयाजी कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पंकज पवार, निलेश माने, कुमार पाटील सागर लवटे, बिरोबा नरळे, संतोष पुजारी, कपिल साळुंखे या पथकाने केली.
चोरीचे सर्व सोने एका पेटीत बंद करून जमिनीखाली पुरले
कवठेकर याने हे सोने चोरी केल्यावर ते एका पेटीत घालून ही पेटी घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत ख•ा काढून त्यात पेटी पुरून ठेवली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने तात्काळ पेटी काढून दिली. त्यामध्ये हे सर्व सोन्याचे दागिने मिळून आले.