लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दागिने लुटणाऱ्यास अटक
सौंदत्ती पोलिसांची कारवाई : सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त
बेळगाव : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंगावरील दागिने पळविणाऱ्या हुनशीकट्टी, ता. जमखंडी येथील एका युवकाला सौंदत्ती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 2 लाख 64 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरलेली 50 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 3 लाख 14 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. कऱ्याप्पा कल्लाप्पा तळवार, रा. हुनशीकट्टी असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक डी. एस. धर्मट्टी, उपनिरीक्षक ए. सी. क्यारकट्टी, एल. आर. गौडी, बी. एम. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
12 ऑगस्ट रोजी जमनापूर गल्ली, नरगुंद येथील शंकरगौडा गंगनगौडा हुडेद यांनी आपल्या अंगावर घातलेले दागिने पाहून त्यांना ड्रॉप देण्याच्या निमित्ताने कऱ्याप्पा तळवारने आपल्या मोटारसायकलवर बसवून घेतले होते. हुलीकट्टीजवळील शेतजमिनीत नेऊन शंकरगौडा यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने पळविण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी अशोक मुरगोड, रा. बुदिगोप्प, ता. यरगट्टी यांना नविलतीर्थ डॅमजवळ लुटण्यात आले होते. सौंदत्ती पोलीस स्थानकात या दोन्ही घटनांची नोंद झाली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करून दोन चेन, तीन अंगठ्या, एक मोबाईल, मोटारसायकल जप्त केली आहे.