पालखी उत्सवात अडथळा आणणाऱ्यास अटक
दुर्गावाडी-ताळगाव येथील घटना : पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने शांती
पणजी : दुर्गावाडी-ताळगाव येथील श्रीपांडुरंग देवस्थानच्या वार्षिक पालखी उत्सवात बुधवारी रात्री सुरु असलेल्या दिंडीत अडथळा आणून, शिव्या देऊन धार्मिक तणाव निर्माण करण्याची संतापजनक घटना घडली. याबाबत अॅड. सुदाम सातर्डेकर यांनी पणजी पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली असून पणजी पोलिसांनी उत्सवात अडथळा आणणाऱ्या, शिव्या देणाऱ्या एरेमिता झेवियर मार्टिन याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडथळा आणणाऱ्या आणि शिव्या देणाऱ्याचे नाव एरेमिता झेवियर मार्टिन (63 वर्षे, ताळगाव) असे आहे. भारतीय न्याय संहिता कलम 299, 300, 302, 352, 351(2) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. त्याला रिमांडसाठी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
उत्साहात सुरु होती पालखी
बुधवारी रात्री दुर्गावाडी पांडुरंग मंदिरात पालखी मिरवणुकीसाठी स्थानिक लोक जमले होते. पालखीबरोबर दिंडीही सुरु होती. त्यात लहान मुलं, तरुणी, महिला, तरुण, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्याने पांडुरंग, दत्तात्रयाचा गजर सुरु होता. त्याचवेळी एरेमिता झेवियर मार्टिन यांने तक्रारदार अॅड. सुदाम सातर्डेकर आणि जमलेल्या भाविकांना अश्लील शिवीगाळ केली. पालखी पुढे नेण्यास अडथळा निर्माण केला.
श्रीपांडुरंग देवाचा गैरउच्चार
श्रीपांडुरंग देवाचा गैरउच्चार करून सर्वांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि त्यामुळे तणाव निर्माण झाला. भाविकांनी, ग्रामस्थांनी तसेच गोव्याच्या विविध भागातून आलेल्या हिंदू कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्रीच पणजी पोलिसस्थानक गाठून त्याच्याविरोधात तक्रार केली. त्यांने आमच्या भावना दुखवल्या असून त्यांने येऊन आमच्या देवाची माफी मागावी, अशी मागणी धरुन लावली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली.