शेख हसीना यांच्या विरोधात अटक वॉरंट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या भारतात वास्तव्य करीत असलेल्या बांगला देशच्या नेत्या शेख हसीना यांना त्या देशातील लवादाने अटक वॉरंट पाठविले आहे. हा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, असे तज्ञांचे मत आहे. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या कथित अत्याचारांच्या विरोधात तेथील नव्या सरकारने चौकशीला प्रारंभ केला असून त्यासंबंर्भात त्यांना समन्स पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शेख हसीना बांगला देशच्या नेतेपदी असताना, विरोधी पक्षांचे अनेक नेते गायब झाले होते. हसीना यांच्या सांगण्यावरुन त्यांचे अपहरण करण्यात आले होते, असा आरोप केला जात आहे. तसेच अनेकांच्या हत्यांचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हसीना यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, आपण बांगला देशात परत गेल्यास आपल्या जीवाला धोका पोहचू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी भारतातच वास्तव्य करण्याला प्राधान्य दिले आहे.
अटक करण्यासाठी वॉरंट
बांगला देश प्रशासनाने शेख हसीना यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी लवादाची स्थापना केली आहे. न्या. मोहम्मद गुलाम मूर्तझा हे आयोगाचे प्रमुख आहेत. या आयोगाने शेख हसीना आणि 11 जणांवर अटक वॉरंट लागू करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. अनेका समन्स पाठवूनही हसींना लवादासमोर उपस्थित न राहिल्याने त्यांना अटक करण्याचा आदेश देण्यात आला आहे.