हिंदूंच्या देवतांबद्दल अभद्र लिहिणाऱ्यांनाही अटक करा
हिंदू रक्षा महाआघाडीची मागणी, कुडचडे पोलिस स्थानकात तक्रार
कुडचडे : मीडिया माध्यमावर हिंदू देवतांविषयी आणि धार्मिक परंपरांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हिंदू रक्षा महाआघाडीने कुडचडे पोलिसस्थानकात दोन व्यक्तींविऊद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे. भगवान राम, सीता, भगवान परशुराम, भगवान महादेव आणि श्री लईराई देवीच्या धोंडांविषयी अपमानकारक शब्द वापरल्याचा आरोप या तक्रारीत नोंद करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दिगंबर नाईक यांनी दिली आहे.
या संबंधित हिंदू रक्षा महाआघाडीचे (केपे) समिती सदस्य शिवानंद राऊत देसाई यांनी माहिती देताना सांगितले आहे की, सध्या राज्यात हिंदू देवतांचा विविध प्रकारे लिखाण करून जो अपमान होत आहे त्या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करत आहे. या अनुषंगाने फेसबुकवरील एका व्हायरल पोस्टमध्ये फर्नांडिस आणि चेल्सी रॉड्रिग्स या व्यक्तींनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले होते.
या टिप्पण्यांमुळे संपूर्ण गोव्यातील भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तीव्र संताप निर्माण झालेला आहे. त्यासाठी या दोन व्यक्तींना ताबडतोब अटक करून त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपूर्वी गौतम खट्टर या व्यक्तीने ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर भाष्य केले. त्यातून ख्रिती बांधवांच्या भावना दुखावल्या असेल. पण त्यांनी त्याचा राग हिंदूंच्या देवतांवर काढून मनात येईल ते लिहणे चुकीचे आहे.
खट्टर यांनी जे सांगितले आहे त्यात कोणतीच गोष्ट असत्य नाही. हे सर्वाना माहिती आहे. हिंदू समाज हा सोसून घेणारा समाज आहे. पण त्याचा फायदा घेत वाटेल त्या दृष्टीकोनातून हिंदू देवतांवर किंवा हिंदू समाजावर लिहून हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. जर हिंदू दुखावले आणि ते चवताळले तर त्यांना रोखणे कठीण होईल. त्यासाठी आमचे पोलिसांना निवेदन आहे की त्यांनी ताबडतोब या दोन व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी,असे शिवानंद राऊत देसाई म्हणाले.
यावेळी उपस्थित वैशाली जोशी यांनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की, सध्या हिंदू धर्माबद्दल विनाकारण खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याचा आपण निषेध करते. बोलताना चुका ह्या कोणाच्याही होऊ शकतात, पण त्याचा अशा प्रकारे दुसऱ्या मार्गाने व दुसऱ्या धर्मावर वाटेल ते बोलणे व त्यांच्या देवतांवर टिप्पणी करणे हा दुष्टपणाचा प्रकार आहे. ज्यांनी हा प्रकार चालविला आहे, त्यांच्यावरही कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.