For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गौतम खट्टरसह आयोजकांना अटक करा

02:54 PM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
गौतम खट्टरसह आयोजकांना अटक करा
Advertisement

वास्को पोलिसस्थानकावर मोर्चा : भर उन्हात सुमारे चार  तास मांडले ठाण; पोलिस अधिकाऱ्यांशी काही नागरिकांनी केली चर्चा

Advertisement

वास्को : सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अवमान करणाऱ्या गौतम खट्टर यांच्यासह भगवान परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनाही अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने वास्को पोलिसस्थानकावर जमाव केला. जोपर्यंत त्यांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. दुपारच्या रखरखत्या उन्हात पोलिसस्थानकासमोरच सुमारे चार तास ठाण मांडले.

गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मुरगाव तालुक्यासह इतर भागातील नागरिक वास्कोतील टिळक मैदानाजवळ एकत्र आले व त्यांनी पोलिसस्थानकापर्यंत मोर्चा नेला. गौतम खट्टर व त्या सोहळ्याच्या आयोजकांना त्वरित अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी त्यांनी घोषणा देत लावून धरली. कडक पोलिस सुरक्षाही यावेळी ठेवण्यात आली होती. वास्कोतील पोलिस अधिकाऱ्यांशी त्यांच्यापैकी काहींनी यावेळी चर्चा केली. पोलिसांनी त्यांना या प्रकरणात वास्को पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती दिली. सध्या हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभाग हाताळत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जमाव व त्यांच्या नेत्यांचे समाधान झाले नाही.

Advertisement

यावेळी त्यांनी गौतम खट्टर आणि आयोजकांना अटक करण्याची मागणी कायम ठेवली. या मागणीसाठी सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी अडिच वाजेपर्यंत लोकांचा जमाव पोलिसस्थानकासमोर होता. वास्कोतील मासे विक्रेत्या महिला मासे विक्री बंद ठेवून या निदर्शकांमध्ये सहभागी झाल्या होत्या. खासदार विरियातो फर्नांडिस या लोकांमध्ये सहभागी झाले होते. माजीमंत्री जुझे फिलिप डिसोजा यांच्यासह समाज कार्यकर्ते फिडॉल परेरा, रामा काणकोणकर, शंकर पोळजी, जयेश शेटगावकर, मारियानो, टॅक्सी युनियनचे चेतन कामत, काँग्रेसचे सावियो डिसिल्वा, नंदादीप राऊत, पिटर डिसोजा अशा अनेक जणांसह शेकडोंच्या संख्येने लोक यात सहभागी झाले होते.

भाऊ नको, गौतम खट्टरच हवा

जमावाने आम्हाला गौतम खट्टर हवा त्याचा भाऊ नको, तसेच आयोजकही या गुन्ह्याला जबाबदार असून त्यांना वक्त्यांची पार्श्वभूमी माहीत असूनही जाणूनबुजून त्यांना बोलावले होते, असा आरोप केला. समाजकार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री माविन गुदिन्हो यांच्यावर व सरकारवर आरोप केले. तसेच पोलिसांनीही या प्रकरणात निष्काळजीपणा केला व त्यामुळेच लोकांना रस्त्यावर उतरावे लागल्याचा दावा त्यांनी केला. काही नेत्यांनी यावेळी माविन गुदिन्हो यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गोंयच्या सायबाचा अवमान करण्याचा प्रयत्न पुढे कोणी केल्यास कायदा हातात घेतला जाईल, असा इशारा फिडॉल परेरा यांनी दिला.

खासदार विरियातोंची पोलिसांशी चर्चा

खासदार विरियातो फर्नांडिस यांनीही या प्रश्नावर पोलिस अधीक्षक गुरूदास कदम यांच्याशी चर्चा केली व काही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले. पोलिस अधीक्षकांनी त्यांना तपासाविषयी माहिती दिली तसेच पुढील तपास गुन्हा अन्वेषण विभाग करीत असल्याचे स्पष्ट केले. पोलिस स्थानकासमोर जमलेल्या लोकांच्या ज्या काही मागण्या असतील. त्या वरीष्ठांपर्यंत पोहोचवण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी जमावाला दिले.

कसलाच सोहळा होऊ देणार नाही

दरम्यान, जोपर्यंत गौतम खट्टर व आयोजकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत वास्कोत व परिसरात कोणताही जाहीर कार्यक्रम होऊ दिला जाणार नसल्याचा इशारा काही समाज कार्यकत्यांनी यावेळी दिला. विशेषता उद्या शनिवारपासून हेडलॅण्ड सडा भागात पर्यटन विकास महामंडळाच्या उन्हाळी महोत्सवाला प्रारंभ होत असून हा महोत्सव रोखण्यात येईल, असे यावेळी ठणकावण्यात आले.

Advertisement
Tags :

.