For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहाजहान शेखला त्वरित अटक करा

06:45 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहाजहान शेखला त्वरित अटक करा
Advertisement

संदेशखाली अत्याचार प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाची पश्चिम बंगाल सरकारला फटकार

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचे लैंगिक शोषण आणि जमीन बळकाविण्याची प्रकरणे, यांच्या संदर्भातील प्रमुख सूत्रधार आणि राज्यात सत्ताधारी असणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता शहाजहान शेख याला त्वरित अटक करा, असा स्पष्ट आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यासंदर्भात पश्चिम बंगाल सरकारवर पुन्हा ताशेरे झाडले आहेत. शहाजहान शेख याच्या अटकेला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरणही उच्च न्यायालयाने दिले होते.

Advertisement

शहाजहान शेख याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात एफआयआरही नोंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याला त्वरित अटक होणे आवश्यक आहे. त्याच्या अटकेवर कोणताही स्थगिती आदेश नाही. त्याच्या चौकशीला अंतरिम स्थगिती देण्यात आली असली, तर त्याचा अर्थ त्याला अटक करण्यालाही स्थगिती दिली आहे, असा होत नाही. त्यामुळे विनाविलंब त्याला अटक करण्यात यावी, असेही उच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

वृत्तपत्रांमध्ये नोटीस द्या

शहाजहान शेख हा बेपत्ता असल्याचे प्रशासनाकडून प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी मोठी वृत्तपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांवर जाहीरात देण्यात यावी. त्याला शरण येण्याचा इशारा देण्यात यावा. अटक टाळण्यासाठी कोणतेही कारण देण्यात येऊ नये, असे कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य प्रशासनाला सुनावले आहे. आता प्रशासनाला कृती करणे भाग आहे.

राज्यपालांची प्रतिक्रिया

लोकशाहीच्या राज्यव्यवस्थेत न्यायालयांचे स्थान महत्वाचे आहे. त्यामुळे न्यायालयाने जर काही आदेश दिला असेल तर त्याचे तंतोतंत पालन करण्याचे उत्तरदायित्व राज्य सरकारवर आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये ताशेरे झाडल्यानंतर तरी आता राज्य सरकारने जागे व्हावे, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी प्रगट केली आहे.

काय आहे प्रकरण

पश्चिम बंगालमधील 24 परगाणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे अनेक महिन्यांपासून दलित, मागसवर्गीय आणि आदीवासी तरुण महिलांवर अनन्वित अत्याचार होत असून त्यांचे लैंगिक शोषण पेले जात आहे. यासाठी त्यांना धाक दाखविला जात आहे. तसेच अशा समाजघटकांमधील लोकांच्या अनेक जमीनी स्थानिक तृणमूल नेते बळकावित आहेत. त्यांचा सूत्रधार शहाजहान शेख हा आहे. या अन्यायाच्या विरोधात अनेक महिला गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलक करीत आहेत. तथापि, प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या दबावात असल्याने ते या अत्याचारांकडे दुर्लक्ष करीत आहे. भारतीय जनता पक्षाने या अत्याचारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन चालविले असून राज्य सरकारला तज्ञांनीही धारेवर धरले आहे.

Advertisement
Tags :

.