मनपा उपायुक्त वैभव साबळेंच्या अटकेने दोडामार्गात चर्चांना उधाण
दोडामार्ग – वार्ताहर
इमारतीचा बांधकाम परवाना देण्यासाठी सात लाखांची लाच मागितलेल्या सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्या अटकेचे वृत्त पसरताच संपूर्ण दोडामार्ग शहरात एकच खळबळ उडाल्याचे पहावयास मिळाले. कारण श्री. साबळे यांनी कसई दोडामार्ग नगरपंचायतचे पहिले मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. ती त्यांच्या सेवेची खरी सुरुवात होती. सन २०१५ मध्ये कसई -दोडामार्ग नगरपंचायतीची निर्मिती झाल्यानंतर सुरुवातीचा कार्यकाळ हा प्रशासन तसेच तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली होता. दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजी कसई- दोडामार्ग नगरपंचायतचे पहिले मुख्याधिकारी म्हणून याच वैभव साबळे यांची थेट नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे आपल्या सेवेची सुरुवात करणाऱ्या वैभव साबळे यांची जेव्हा नगरपंचायत मध्ये पहिली एन्ट्री झाली तेव्हा त्यांनी नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावरील पायरीला हात लावून नमस्कार केला होता. त्यानंतर नगरपंचायतमध्ये जाऊन त्यांनी अधिकृतपणे आपला कार्यभार स्वीकारला होता. नगरपंचायतचे पहिले मुख्याधिकारी म्हणून संपूर्ण दोडामार्ग शहरात त्यांच्याविषयी उत्सुकता होती. अल्पावधीतच त्यांनी संपूर्ण शहरवासीयांशी आपला संपर्क वाढवला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सांगली येथे सध्या नियुक्ती असलेल्या या वैभव साबळेंवर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी संपूर्ण दोडामार्ग शहरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री. साबळे यांचे कारनामे सर्वत्र पसरले. त्यांच्यावरील या कारवाईच्या बातमीने नगरपंचायत व नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. वैभव साबळे हे दिनांक १४ ऑक्टोबर २०१८ रोजी दोडामार्ग मधून कार्यमुक्त झाले व अन्यत्र त्यांची बदली झाली.