बाजारपेठेत रात्रीही कचरावाहू वाहनांची व्यवस्था
ओला कचरा थेट वाहनात जमा करण्यासाठी प्रयत्न : भाजीविक्रेत्यांकडून सहकार्याची अपेक्षा
बेळगाव : बाजारपेठेतील कचऱ्याची उचल करणे सोपे व्हावे यासाठी महानगरपालिकेकडून नरगुंदकर भावे चौक आणि कडोलकर गल्लीत रात्रीच्या वेळीही कचरावाहू वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी ओला कचरा कोठेही न टाकता थेट कचरावाहू वाहनात टाकावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण काही भाजीविक्रेत्यांकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. शहर व उपनगरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. कचऱ्याची उचल करण्यासाठी महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.
पण अद्यापही कचरा समस्या सोडविण्यात मनपाला यश आलेले नाही. नागरिकांकडून जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा फेकून दिला जात आहे. परिणामी जिकडे तिकडे ब्लॅकस्पॉट तयार होत आहेत. शहराच्या दक्षिण भागात भूमिगत डस्टबिन बसविण्यात आले आहेत. पण त्यामध्ये कचरा टाकण्याऐवजी नागरिक बाहेर फेकून देत आहेत. दररोज ओला, सुका व प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. महापालिकेकडून घंटागाडीद्वारे घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल केली जात असली तरी कचऱ्याचे वर्गीकरण म्हणावे तसे होताना दिसत नाही.
...तर सफाई कर्मचाऱ्यांचे श्रम वाचतील
विशेष म्हणजे बाजारपेठेत ओला कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. दिवसभर व्यापार करून भाजीविक्रते रात्रीच्यावेळी कडोलकर गल्ली किंवा नरगुंदकर भावे चौकात व इतर ठिकाणी कचरा फेकून देत आहेत. त्यामुळे सकाळच्यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना सदर ओला कचरा पुन्हा वाहनात भरावा लागत आहे. त्यामुळे हे श्रम कमी व्हावेत, यासाठी महानगरपालिकेकडून नरगुंदकर भावे चौकात व कडोलकर गल्लीत रात्रीच्या वेळीही कचरावाहू वाहने उभी केली जात आहेत. भाजीविक्रेत्यांनी थेट वाहनात कचरा टाकल्यास सफाई कर्मचाऱ्यांचे वाया जाणारे श्रम वाचण्यास मदत होणार आहे.