डिस्कळ येथे शेततळ्यातून सुमारे १२०० माशांची चोरी
पुसेगाव :
डिस्कळ (ता. खटाव) येथील शौर्य अॅकॅडमी लगत असलेल्या कंबळज नावाच्या शेत शिवारातील सुनील तानाजी ठोंबरे या युवा शेतकऱ्याच्या शेततळ्यातून सुमारे बाराशे मासे चोरीला गेले आहेत. प्रचंड नुकसानामुळे सदर युवक हताश झाला आहे. याबाबत डिस्कळचे पोलीस पाटील यांना कल्पना देण्यात आली आहे.
सुनील ठोंबरे हे पनवेल येथे बजाज फायनान्स कंपनीचे रिकव्हरी अधिकारी म्हणून काम पाहत होते. दरम्यान कोरोना काळात गावी आल्याने मुंबईपेक्षा गावाकडे काहीतरी व्यवसाय करावा या उद्देशाने त्यांनी कुठलेही शासकीय अनुदान न घेता स्वखर्चाने सुमारे ४ लाख रुपयांचे शेततळे काढले. स्वतःच्याच पाण्याची सोय त्यांनी केली. त्यात मत्स्यपालन, उत्पादन आणि विक्री व्यवसाय सुरु केला होता. सुरुवातीला अनुभव नसल्याने थोडाफार तोटा सहन करावा लागला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून व्यवसायात चांगला जम बसवण्यात तो यशस्वी ठरला होता. ठोंबरे यांचे कुटुंब माशांची सुमारे दीडशे रूपये किलो प्रमाणे विक्री करत होते. चालू वर्षी तर माशांची उत्तम वाढ झाल्याने तसेच ओढे, नदीपेक्षा शेततळ्यातील माशांना उत्तम चव असल्याने इतरांच्या पेक्षा किलोला ५० रुपये अधिक भाव त्याच्या माशांना मिळत होता. महिन्याभरात सुमारे १०० किलो मालाची त्यांची विक्री होत होती.
मंगळवार ८ रोजी या कुटुंबाने तळ्यातील मासे काढले, त्यासाठी लागणारी जाळी व इतर साहित्य शेततळ्याजवळ ठेवले. त्या दिवशी मालाची विक्रीही केली. दुसऱ्या दिवशी माल काढण्यास गेले असता माशांची चोरी झाल्याचे लक्षात आले.
- पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी
मुंबईसारख्या ठिकाणी १५, २० हजारांच्या नोकरीपेक्षा गावात एखादा व्यवसाय करून, स्वप्न पाहून ते यशस्वी करायची, मात्र चोरट्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढायच्या. त्यामुळे नव्याने एखाद्या व्यवसायात उत्तरलेल्या युवकाची उमेद संपत आहे. एखादी गोष्ट करावी का नकोच ? अशी अवस्था युवकांची होत आहे. लाखो रुपयांचे नुकसान कसे भरून काढायचे? त्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत तात्काळ कारवाई करावी.
- सुनील तानाजी ठोंबरे, डिस्कळ (ता. खटाव)