अर्णव क्लब, मराठा इलेव्हन वजयी
एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा : अक्षित, पुरुषोत्तम जकबाळ यांना सामनावीर पुरस्कार
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ आयोजित एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातील अर्णव क्रिकेट क्लबने प्रमोद पालेकर क्रिकेट क्लबचा 5 गड्यांनी तर मराठा इलेव्हनने बालाजी स्पोर्टसचा 8 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अक्षित, पुरुषोत्तम जकबाळ यांना सामनावीर तर फैजानला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात प्रमोद पालेकर अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 167 धावा केल्या. आकाश असलकरने 2 षटकार, 3 चौकारांसह 54, फैजानने 2 षटकार, 4 चौकारांसह 40, संतोष जाधवने 6 चौकारांसह 32 तर अनिकेत भोसलेने 3 चौकारांसह 14 धावा केल्या. अर्णवतर्फे बसवंतने 25 धावात 2, देवने 32 धावात 2 तर रघू नाईक व अक्षित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्णव क्रिकेट क्लबने 20 षटकात 5 गडी बाद 168 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. गणेशने 2 षटकार, 5 चौकारांसह 55, अक्षितने 2 षटकार, 4 चौकारांसह 52, बसवंतने 1 षटकार, 4 चौकारांसह 23 तर देवने 10 धावा केल्या. प्रमोद पालेकरतर्फे भूषणने 37 धावात 3 तर आकाश व प्रमोद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात बालाजी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 13 षटकात सर्वगडी बाद 74 धावा केल्या. राहुल नाईकने 4 चौकारांसह 26 तर मिलिंद चव्हाणने 1 षटकार, 2 चौकारांसह 14 धावा केल्या. मराठातर्फे पुरुषोत्तम जकबाळने 15 धावात 6 गडी बाद केले. त्याला आनंद मुतकेकरने 13 धावात 2 तर दीपक राक्षेने 1 गडी बाद करत सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा इलेव्हनने 7.5 षटकात 2 गडी बाद 76 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. रोहित दोडवाडने 7 चौकारांसह 34, शुभम यादवने 4 चौकारांसह 19 तर शिवलिंगने 11 धावा केल्या. बालाजीतर्फे दीपक व शुभम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.