लष्करी वाहन दुर्घटनेत चार जवानांना हौतात्म्य
दोघे गंभीर : जम्मू काश्मीरमध्ये ट्रक दरीत कोसळला
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा जिह्यात शनिवारी दुपारी लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळला. या अपघातात 4 जवान हुतात्मा झाले. तसेच अन्य दोन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेबाबत लष्कराने एक निवेदन जारी केले. खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी असल्याने ट्रक रस्त्यावरून दरीत कोसळल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे सुरक्षा दल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अपघातावेळी सदर वाहनात 6 सैनिक होते. बांदीपोरा जिह्यातील एसके पायीन भागात हा अपघात झाला. घाटीतील एका अवघड वळणावर ट्रक रस्त्यावरून थेट दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार चार जवानांना या अपघातात हौतात्म्य पत्करावे लागले.
24 डिसेंबर रोजी 5 जवान हुतात्मा
यापूर्वी 24 डिसेंबर रोजी पुंछ जिह्यात लष्कराची व्हॅन 350 फूट खोल दरीत कोसळली होती. व्हॅनमध्ये 18 सैनिक होते. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला होता. हे सर्व जवान 11 मराठा रेजिमेंटचे होते. लष्करी ताफ्यातील 6 वाहने पूंछ जिह्याजवळील ऑपरेशनल ट्रॅकवरून बनोई भागाकडे जात होती. याचदरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक व्हॅन दरीत कोसळली होती.