स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाच्या वतीने आर्मी जवानांचा सत्कार
मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त ‘सन्मान देशभक्ताचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्यातील सुभेदार हितेश कुमार (गुजरात) व सीएचएम बलवंत सिंग (राजस्थान) या दोन वीर जवानांचा तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व PSI वासुदेव वरवडेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी NCC विभागाचे असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनानंतर ईशस्तवन झाले. त्यानंतर कार्याधिक साईनाथ चव्हाण कोषाध्यक्ष नंदन देसाई सहकार्यवाह संदेश कोयंडे आदी मान्यवरांच्या हस्ते आर्मी ऑफिसर आणि माजी विद्यार्थी PSI वासुदेव वरवडेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी NCC कॅडेट्सची रँक सेरेमनी देखील उत्साहात पार पडली.
PSI वासुदेव वरवडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञान व विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा सकारात्मक वापर यांच्या माध्यमातून यश संपादन करण्याचा जीवनमंत्र दिला. प्राचार्य के. के. राबते यांनी आपल्या भाषणातून NCC कॅडेट्सच्या शिस्त, समर्पण व कार्याचे कौतुक करत आर्मी ऑफिसर्सच्या देशसेवेबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या आर्मी ऑफिसर्सच्या मुलाखतीत सुभेदार हितेश कुमार व सीएचएम बलवंत सिंग यांनी विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. सीमेवरील सुरक्षा व्यवस्था, सैनिकांचे दैनंदिन जीवन, आव्हाने, देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली शिस्त व कर्तव्यभावना याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. सर्व लोक मुलाखत तल्लीन होऊन ऐकत होते .ही प्रभावी मुलाखत प्रा. हंबीरराव चौगुले यांनी घेतली.
संस्थेच्या कोषाध्यक्ष नंदन देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणातून NCC कॅडेट्सच्या कार्याचे तसेच असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. सैनिकांचा सन्मान करण्याचे भाग्य महाविद्यालयाला मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंचावर संस्थेचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सहकार्यवाह संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी, समाजसेविका नेत्या शिल्पा खोत, नगरसेविका खानोलकर मॅडम, शिरपुटे मॅडम, अन्वेषा अचरेकर, मेघा सावंत, सुनीता जाधव, नगरसेवक ललित चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. राबते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, ग्रंथालय कर्मचारी, रोटरी क्लब व लायन्स क्लबचे पदाधिकारी, आंबा व्यावसायिक बांदेकर, आपदा मित्र कमलेश चव्हाण, माजी विद्यार्थी शुभांगी सुकी, पत्रकार परेश राऊत, सानिका वायंगणकर, माजी जी.एस., माजी NCC सिनियर्स, सध्याचे NCC कॅडेट्स, महाविद्यालयातील विद्यार्थी, रत्नाकर कोलंबर मालवण मधील नागरिक आदी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये JUO हर्ष कदम, CQMS मधुरा घाटगे, CSM श्रीराज परब, SGT वेदांत हिंदळेकर, SGT श्रेया पालव, SGT विनय खोब्रेकर, CPL अदिती आचरेकर, CPL ओंकार चौघुले आणि L-CPL हर्षद देवलकर या NCC सिनियर्सनी लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांच्या नेतृत्वाखाली विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांनी उपस्थित मान्यवर, आर्मी ऑफिसर्स, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, NCC कॅडेट्स व नागरिकांचे आभार मानले.
यानंतर ‘राष्ट्रीय एकता, राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी’ भव्य मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले. NCC कॅडेट्सच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि हातातील प्रज्वलित मशालींनी परिसरात राष्ट्रभक्तीचा उत्साह निर्माण केला. सैनिकांच्या त्यागाला सलाम करत काढण्यात आलेली ही मशाल फेरी कार्यक्रमाचा भावनिक व प्रेरणादायी समारोप ठरली. देशासाठी जगणाऱ्या वीरांचा सन्मान आणि देशसेवेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.