लष्कराला मिळाले 106 कामिकाझे ड्रोन
180 किमी पल्ला : 450 किमी प्रतितास वेग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय लष्कराची हल्ला करण्याची क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, स्वदेशी संरक्षण कंपनी एसएमपीपीने लष्कराला 106 टर्बोजेट-शक्तीवर चालणारे ‘कामिकाझे’ ड्रोन सुपूर्द केले आहेत. ‘पीसकीपर (अग्निवेग)’ असे नाव असलेले हे ड्रोन 180 किमीपर्यंत हल्ला करताना 450 किमी प्रतितास वेग गाठू शकतात. या हल्ल्यादरम्यान त्यांच्यावर जॅमिंगचा परिणाम होणार नाही, तसेच स्पूफिंगद्वारे त्यांना त्यांच्या लक्ष्यापासून विचलित करता येणार नाही. हे ड्रोन बेलारूसमधील केबी इंडेला या कंपनीच्या मदतीने विकसित करण्यात आले आहेत.
‘कामिकाझे’ ड्रोन म्हणजे असे ड्रोन जे लक्ष्यावर आदळल्यावर स्वत:चा नाश करतात. त्यांना ‘लोइटरिंग म्युनिशन्स’ असेही म्हटले जाते. ‘कामिकाझे’ हे नाव दुसऱ्या महायुद्धातील ‘कामिकाझे’ हल्ल्यांवरून आले आहे. या प्रणालीमध्ये जपानी वैमानिक आपली विमाने शत्रूच्या जहाजांवर आदळून आत्मघाती हल्ले करत असत. कंपनीने तूर्तास लष्कराला 100 ऑपरेशनल आणि 6 प्रशिक्षण ड्रोन सुपूर्द केले आहेत. ही तैनाती भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता आणि मानवरहित युद्धतंत्रातील एक मैलाचा दगड मानली जात आहे.
