भारत-चीन सीमेवर लष्कराची गस्त सुरू
लडाखमध्ये ‘एलएसी’वर साडेचार वर्षांनंतर पेट्रोलिंग : सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात
वृत्तसंस्था/ लडाख, नवी दिल्ली
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीन या दोन देशांसाठी दिवाळीचा सण आशेचा नवा किरण घेऊन आला आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी लडाखमधील आपापले सैन्य माघारी घेतल्यानंतर आता एलएसीवरील परिस्थिती सामान्य बनत आहे. डेमचोक आणि देपसांगमधील माघारीनंतर आता सीमेवर सैनिकांची गस्त सुरू करण्यात आली आहे. या तडजोडीसाठी काही अटी ठेवण्यात आल्या असून त्याची पूर्तताही टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.
साडेचार वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये एलएसीवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली होती. गलवान व्हॅली परिसरात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने या भागात गस्त घालणे बंद केले होते. या संघर्षाच्या घटनेनंतर भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला होता. सीमावादाने गंभीर स्वरूप धारण केले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी चर्चेची फेरी सुरू केली. चार वर्षांहून अधिक काळानंतर एलएसीवरील परिस्थिती आता सामान्य होत आहे.
2020 मध्ये भारत आणि चीनमध्ये एलएसीवर वाद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध अधिकच ताणले गेले. मात्र, आता बदलत्या जागतिक परिस्थितीत चीनने भारतासोबतचे संबंध सुधारणे योग्य मानले. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा ऊळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. भारत हा पूर्वीपासूनच सीमेवर शांतता आणि सौहार्दाचा समर्थक आहे. काही आठवड्यांपूर्वीच परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दोन्ही देशांमधील 75 टक्के वाद मिटल्याचा दावा केला होता. यानंतर, कझानमध्ये ब्रिक्स परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सध्या सुरू असलेल्या सीमा विवादाच्या निराकरणाबद्दल आनंद व्यक्त केला होता.
एलएसीवरील गस्तीबाबत अट
भारत आणि चीनच्या सैन्याने एलएसीवर गस्त घालण्यास सुऊवात केली आहे. सध्या केवळ डेमचोकमध्ये गस्त सुरू करण्यात आली आहे. देपसांगमध्ये लवकरच पेट्रोलिंग सुरू करण्यात येणार आहे. एलएसीवरील गस्तीबाबत अट घालण्यात आली आहे. दोन्ही देशांचे लष्कर फक्त दिवसा गस्त घालू शकतील. संध्याकाळ आणि रात्री गस्त राहणार नाही. डेमचोकमध्ये साडेचार वर्षांनंतर परिस्थिती सामान्य झाली आहे.
मिठाईची देवाण-घेवाण
दिवाळीनिमित्त एलएसीवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मिठाईची देवाण-घेवाण झाली. सर्व 5 बीपीएम व्यतिरिक्त, नव्याने स्थापन झालेल्या सहाव्या बीपीएम लिपुलेकमध्ये दोन्ही देशाच्या जवानांनी मिठाईचे वाटप केले. तसेच इतर सीमावर्ती भागातही मिठाईची देवाण-घेवाण झाली. पूर्व लडाखमधील डेमचोक आणि देपसांग येथील दोन केंद्रांवर दोन्ही देशांचे सैन्य मागे घेतल्यानंतर एक दिवस पारंपरिक सराव पाळण्यात आला. या करारामुळे चीन आणि भारत यांच्यातील तणाव कमी होऊन गोडवा निर्माण झाला आहे.