महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लष्कराला मिळाले पहिले ‘आत्मघाती ड्रोन’

06:50 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चीन-पाक सीमेवर स्थापित होणार : 30 किलोमीटरचा पल्ला, मोठी मारकशक्ती

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पूर्णत: भारतनिर्मित ‘नागस्त्र-1’ हे आत्मघाती ड्रोन भारताच्या लष्करात समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय भूसेनेला या ड्रोनचा प्रथम संच शुक्रवारी सुपूर्द करण्यात आला. या ड्रोनची निर्मिती महाराष्ट्रातील नागपूरच्या सौरऊर्जा कंपनीच्या इकॉनॉमिक एक्स्प्लोसिव्हज् लिमिटेड या उत्पादन केंद्रात करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने अशा 480 ड्रोन्सची मागणी केली होती. त्यांच्यापैकी 120 ड्रोन्स सेनेला देण्यात आली आहेत. या ड्रोनमधून 2 किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजनाची स्फोटके नेली जाऊ शकतात. हे ड्रोन एखाद्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राप्रमाणे पूर्वनिर्धारित लक्ष्यावर अचूक मारा करून त्याचा नाश करते.

या साधनाचा उपयोग शत्रूप्रदेशातील प्रशिक्षण केंद्रे, दहशतवाद्यांची आश्रयस्थाने, दहशतवादी किंवा शत्रूसैन्याचे स्फोटक साठे, लाँचिंग पॅड, छोटे विमानतळ, रणगाडे आदी लक्ष्यांचा सहज आणि वेगवान पद्धतीने भेद करण्यासाठी केला जाऊ शकतो. या ड्रोन्सवर सेना आपल्या केंद्रांमधून नियंत्रण ठेवू शकते. ही ड्रोन्स आपल्या लक्ष्याच्या आसपास आकाशात उडत राहतात आणि संधी सापडताच लक्ष्यावर तुटून पडतात. आकाशात दिशा परिवर्तन करण्याची त्यांची क्षमता असल्याने ती कोठे आदळणार आहेत, याचा शत्रूला आधी पत्ता लागत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या ड्रोन्सची नियंत्रण यंत्रणा अत्याधुनिक पद्धतीची आहे.

आकाशस्थ शस्त्रप्रणाली

या साधनाची तांत्रिक संज्ञा ‘लॉईटरींग म्युनिशन एरियल वीपन सिस्टिम’ असे आहे. या ड्रोनमध्ये अतिशय संवेदनशील असे सेन्सर्स बसविलेले असतात. हे सेन्सर्स आपल्या लक्ष्यांचा अचूक वेध घेतात. लक्ष्यांवर नेमका कोणत्या वेळी हल्ला केला पाहिजे याचाही निर्णय घेतात आणि लक्ष्यावर आदळतात. या ड्रोनमध्ये असणाऱ्या अत्याधुनिक स्फोटकांचा स्फोट होतो आणि लक्ष्याचा पूर्ण नाश होतो. अशी या साधनाची कार्यपद्धती आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

ध्वनिरहित पद्धतीने काम

ही ड्रोन्स उडत असताना त्यांचा आवाज येत नाही. ती 1,200 मीटर इतक्या कमी ऊंचीवरुन उडतात. त्यामुळे रडारच्या साहाय्याने त्यांचा शोध घेणे अशक्य आहे. ती ध्वनिरहित असल्याने ध्वनीचा मागोवा घेऊन त्यांना नष्ट करणेही अशक्य असते, असे प्रतिपादन त्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने केले आहे. या ड्रोन्सचे वजनही अवघे 12 किलो असल्याने ती अत्यंत वेगवान पद्धतीने काम करतात.

एक तास उड्डाण शक्य

ही ड्रोन्स आकाशात एक तासपर्यंत (60 मिनिटे) उडत राहू शकतात. या कालावधीत लक्ष्य न सापडल्यास त्यांना परत बोलाविले जाऊ शकते. नंतर योग्य वेळी पुन्हा त्यांना उडविले जाणे शक्य असते. पॅराशूटच्या साहाय्याने या ड्रोन्सना हळूवार खाली उतरविले (सॉफ्ट लँडिंग) जाऊ शकते. ही ड्रोन्स पूर्णत: भारत निर्मित असल्याने कितीही संख्येने त्यांचे उत्पादन करता येणे शक्य आहे. तसेच त्यांचा निर्मितीव्ययही अशा प्रकारच्या आयात ड्रोन्सच्या तुलनेत बराच कमी आहे. अशी ड्रोन्स फार कमी देशांकडे आहेत. त्यांची स्वदेशनिर्मिती भारताने यशस्वीरित्या केल्याने ही एक फार मोठी तंत्रवैज्ञानिक उपलब्धी मानण्यात येत आहे.

अमेरिकेकडून मिळणार एमक्यू-9 बी ड्रोन्स

भारताने अमेरिकेकडून अत्याधुनिक एमक्यू-9 बी ड्रोन्स खरेदी करण्याचा करार चार महिन्यांपूर्वी केला आहे. हा 33,000 कोटी रुपयांचा करार आहे. त्यानुसार भारताला अशी 31 ड्रोन्स मिळणार आहेत. ही ड्रोन्स चीनला लागून असलेल्या सीमेवर क्रियान्वित करण्यात येणार आहेत. तसेच भारताच्या सागरी सीमेवरही त्यांचा वावर असेल. चिनी सेनेच्या किंवा नौसेनेच्या अत्यंत सूक्ष्म हालचालीही टिपण्याची या ड्रोन्सची क्षमता असून त्यामुळे भारतीय सैन्य किंवा नौसेनाही आपल्या हालचाली निर्धारित करू शकणार आहे. ही ड्रोन्स शत्रूवर लक्ष ठेवणे आणि शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ले चढविणे अशी दोन्ही कामे करू शकणार असल्याने भारतीय सैन्यदलांचे सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हेरगिरी, देखरेख, माहिती संकलन, एअर सपोर्ट बंद करणे, आपत्कालीन साहाय्यता करणे आदी कामेही ही ड्रोन्स करू शकतात, असे प्रतिपादन अमेरिकेच्या जनरल अॅटोमिक्स कंपनीने केले.

भारताची मोठी कामगिरी

आत्मघाती ड्रोन्सची स्वदेशी निर्मिती ही भारताची मोठी कामगिरी

दोन किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजनाची स्फोटके नेण्यास सक्षम

कमी ऊंचीवरुन उडण्याच्या क्षमतेमुळे शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा

लक्ष्यावर अचूक आणि वेगवान मारा करण्याची या ड्रोन्सची क्षमता

चीन आणि पाकिस्तानलगतच्या सीमेवर स्थापित करण्याची योजना

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article