सेनादलाचे मुष्टीयुद्ध स्पर्धेवर पूर्ण वर्चस्व
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे खेळविण्यात आलेल्या सहाव्या कनिष्ठ मुलांच्या व मुलींच्या 17 वर्षांखालील वयोगटातील मुष्टीयुद्ध स्पर्धेत सेनादलाच्या मुष्टीयोद्ध्यांनी आपले पूर्ण वर्चस्व राखताना या दोन्ही गटातील सर्वंकष जेतेपद पटकाविले. सेनादलाच्या स्पर्धकांनी मुले आणि मुलींच्या सांघिक गटात सुवर्णपदकांची कमाई केली.
सेनादलाच्या स्पर्धकांनी मुलांच्या विभागातील सांघिक जेतेपद पुन्हा हस्तगत करताना विद्यमान विजेत्या हरियाणाचा पराभव केला. तसेच मुलींच्या विभागातही सेनादलाने हरियाणावर मात केली. या स्पर्धेत विद्यमान विजेत्या हरियाणाला दोन्ही गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत सेनादलाच्या स्पर्धकांनी प्रत्येक विभागात 9 पदकांची कमाई करताना 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदक घेतले. सेनादलाच्या मुलींच्या संघाने 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळविले. मुलींच्या विभागात मणिपूरने तिसरे स्थान तर मुलांच्या विभागात महाराष्ट्राने तिसरे स्थान मिळविले.