लष्करप्रमुखांनी वाढवले सैनिकांचे मनोबल
जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल केले कौतुक
वृत्तसंस्था/श्रीनगर
भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये पोहोचत श्रीनगर, उरी आणि उंची बासी येथील अग्रेषित चौक्यांवर सैनिकांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी ऑपरेशनमध्ये सहभागी सैनिकांशी वैयक्तिक संवाद साधला. अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या सैनिकांचे वैयक्तिकरित्या अभिनंदन करत त्यांनी जवानांना प्रोत्साहन दिले. या काळात, जनरल द्विवेदी यांनी लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या डॅगर डिव्हिजनसह इतर अनेक लष्करी तळांना भेट दिली. याप्रसंगी पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांना आणि चिथावणीला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले त्याबद्दल सर्व सैनिक कौतुकास पात्र आहेत, असे लष्करप्रमुखांनी सैनिकांना सांगितले.
नागरिकांना मदत करण्यात लष्कराची मानवतावादी भूमिका
पाकिस्तानी सैन्याच्या नापाक आणि भ्याड गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना मदत करण्याच्या भारतीय सैनिकांच्या मानवतावादी भूमिकेचेही लष्करप्रमुखांनी कौतुक केले. भारतीय सैन्य केवळ सीमांचे रक्षण करत नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी नेहमीच तयार असते, असेही लष्करप्रमुख म्हणाले.