For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताने इस्रायलला पुरविली शस्त्रास्त्र

06:21 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताने इस्रायलला पुरविली शस्त्रास्त्र
Advertisement

1500 किलो स्फोटकांचा पुरवठा : चेन्नईहून इस्रायलच्या किनाऱ्यावर पोहोचले शस्त्रास्त्रांनी भरलेले जहाज

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

भारताने हमासच्या विरोधातील युद्धादरम्यान इस्रायलला शस्त्रास्त्रांची निर्यात केली आहे. कतारमधील प्रसारमाध्यम समूह अलजजीराने स्वत:च्या अहवालात यासंबंधी दावा केला आहे. यानुसार भारताने इस्रायलला 20 टन रॉकेट इंजिन, 12.5 टन विस्फोटक चार्जयुक्त रॉकेट्स, 1500 किलो स्फोटक सामग्री आणि 740 किलो दारूगोळा पुरविला आहे. इस्रायलने भारताला कारगिल युद्धादरम्यान शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला होता. इस्रायलकडून मिळालेल्या मदतीमुळे भारताला कारगिल युद्धात विजय मिळविण्यास मदत झाली होती.

Advertisement

15 मे रोजी बोरकम नावाचे एक मालवाहू जहाज स्पेनच्या किनाऱ्यावर पोहोचले हेते. तेथे काही निदर्शकांनी पॅलेस्टिनी ध्वज झळकवत अधिकाऱ्यांकडे जहाजाची तपासणी करण्याची मागणी केली होती. तर युरोपीय संसदेतील डाव्या विचारसरणीच्या खासदारांनी स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेज यांनी जहाजाला स्पेनच्या बंदरावर नांगर टाकण्याची अनुमती देऊ नये असे आवाहन केले होते. तर स्पेनकडून निर्णय घेतला जाण्यापूर्वीच बोरकम जहाज तेथून स्लोवेनियाच्या कोपर बंदरावर पोहोचले हेते.

चेन्नईहून अश्दोद बंदरावर पोहोचले जहाज

जहाजात इस्रायलसाठी शस्त्रास्त्रs होती असा दावा स्पेनमधील डाव्या विचारसरणीचा पक्ष समर पार्टीने केला होता. आता अलजजीराने या दाव्यांची पुष्टी दिली आहे. हे जहाज 2 एप्रिल रोजी चेन्नईच्या किनाऱ्यावरून रवाना झाले होते, जे इस्रायलच्या अश्दोद बंदराच्या दिशेने प्रवास करत होते. हे बंदर गाझापट्टीपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. जहाजाने इस्रायलला पोहोचण्यासाठी लाल समुद्राचा मार्ग अवलंबिला नाही, कारण तेथे हुती बंडखोरांकडून हल्ले होण्याचा धोका होता.

इस्रायलचा उल्लेख न करण्याचा आदेश

जहाजावरील चालक दलाच्या सदस्यांसोबत सर्व कर्मचारी आणि निर्यातीशी निगडित अधिकाऱ्यांनी चौकशी झाल्यास कुठल्याही स्थितीत इस्रायल किंवा तेथील सर्वात मोठी शस्त्रास्त्र कंपनी आयएमआय सिस्टीम्सचा उल्लेख न करण्याचा आदेश देण्यात आला होता. यानंतर 21 मे रोजी देखील भारताच्या एका मालवाहू जहाजाला स्पेनच्या कार्टाजीना बंदरावर थांबण्याची अनुमती मिळाली नव्हती. मॅरिएन डैनिका नावाचे जहाज 27 टनांच्या स्फोटक सामग्रीसह इस्रायलच्या हैफा बंदरासाठी रवाना झाले होते.

भारतात निर्मित क्षेपणास्त्रांचा वापर

भारताकडून येणाऱ्या जहाजात इस्रायलसाठी सैन्यसामग्री असल्याने त्याला बंदरावर थांबण्याची अनुमती नाकारल्याची पुष्टी स्पेनचे विदेशमंत्री होजे मॅन्युएल अल्बारेज यांनी दिली आहे. 6 जून रोजी गाझाच्या नुसीरत कॅम्पवर इस्रायलकडून झालेल्या बॉम्बवर्षावादरम्यान पॅलेस्टिनी प्रसारमाध्यम कुद्स न्यूज नेटवर्कने एक व्हिडिओ जारी केला होता. यात इस्रायलकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचा हिस्सा दिसून येत होता. या हिस्स्यावर ‘मेड इन इंडिया’चे लेबल होते. इस्रायलने भारताकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करत गाझावर हल्ला केल्याचा दावा कुद्स न्यूज नेटवर्कने केला होता. स्वीडनमधील थिंक टँक सिप्रीनुसार भारतीय कंपनी प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड रॉकेट मोटरच्या पार्ट्सची निर्मिती करते. याचा वापर एमआरएसएएम आणि एलआरएसएएम क्षेपणास्त्रांमध्ये केला जातो. कंपनीचे कार्यकारी संचालक टी. चौधरी यांनी इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचे मान्य केल्याचा दावा सिप्रीने केला आहे.

Advertisement
Tags :

.