अमेरिकेकडून इस्रायलला शस्त्रविक्री
सौदी अरेबियालाही देणार शस्त्रे. ट्रंप यांचा आदेश
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
इस्रायल आणि सौदी अरेबिया या देशांना मोठी शस्त्रविक्री करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. ही विक्री एकंदर 16 अब्ज डॉलर्सची होणार आहे. त्यांच्यापैकी इस्रायलला 6.67 अब्ज डॉलर्स आणि सौदी अरेबियाला 9 अब्ज डॉलर्सची शस्त्रे विकली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या शस्त्रविक्री निर्णयाला गाझा शांतता प्रक्रिया आणि अमेरिकेचा इराणला हल्ल्याचा इशारा यांची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे.
इस्रालयला विकण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्ये 30 अत्याधुनिक अॅपेचे हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. तसेच अनेक रॉकेट लाँचर्स, 3,250 हलकी युद्ध वाहने, सैनिकांची वाहतूक करणारी चिलखती वाहने, तसेच हलकी बहुउपयोगी हेलिकॉप्टर्स यांचा समावेश आहे. इस्रायलच्या मागणीवरुन ही शस्त्रे त्या देशाला देण्यात येत आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
इस्रालयच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व
इस्रायलला ही शस्त्रे त्याच्या सीमांच्या संरक्षणासाठी देण्यात येणार आहेत. इस्रायलच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व प्रामुख्याने अमेरिकेचे आहे. सीमांची सुरक्षा, सुरक्षेसंबंधीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती आणि इस्रायली जनसमूहांचे संरक्षण यांच्यासाठी देण्यात येत आहेत, असे व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले.
सौदी अरेबियाला पेट्रीऑट क्षेपणास्त्रे
सौदी अरेबियाला अमेरिकेकडून 730 पेट्रिऑट क्षेपणास्त्रे देण्यात येणार आहेत. याशिवाय काही युद्ध विमाने आणि इतर सामरिक सामग्रीही विकण्यात येणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध झाले तर इराणने सौदी अरेबियावर हल्ला करु नये, यासाठी ही शस्त्रविक्री करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन करण्यात आले.
परस्परविरोधी संकेत
इराणवर हल्ला करण्यासाठी सौदी अरेबिया अमेरिकेला आपल्या वायूक्षेत्राचा उपयोग करु देणार नाही, अशी घोषणा सौदी अरेबियाने प्रथम केली होती. तरीही अमेरिकेने या देशाला शस्त्रे विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गूढ वाढले आहे. सौदी अरेबियाला इराणविरुद्धच्या संघर्षात आपल्या बाजूने ठेवण्याचा हा अमेरिकेचा प्रयत्न आहे, असाही याचा अर्थ काही तज्ञांकडून लावला जात आहे.
सौदी अरेबियाच्या भूमीकेत परिवर्तन
गेल्या काही दिवसांमध्ये सौदी अरेबियाने इराणविषयीच्या आपल्या भूमिकेत परिवर्तन केल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेने इराणला धडा शिकवला नाही, तर इराणच्या प्रशासनाला अधिकच चेव येईल आणि त्यामुळे मध्यपूर्वेत मोठे संकट निर्माण होईल, असे प्रतिपादन सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकेत केले होते. त्यामुळे इराणच्या विरोधात सौदी अरेबिया अमेरिकेकडे झुकू लागला आहे, असा याचा अर्थ आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लावला जात आहे. यासंबंधीचे खरे चित्र येत्या काही आठवड्यांमध्ये स्पष्ट होईल, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.