आर्मांद कुलासोंना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार
हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले गोमंतकीय
मडगाव : गोव्याचे राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलक्षेत्रात सर्वांत यशस्वी प्रशिक्षक म्हणून ख्याती असलेल्या आर्मांद कुलासो यांना देशातील प्रतिष्ठेचा ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत आर्मांद यांना ‘लाईफ टाईम’ विभागात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रतिष्ठेचा ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार मिळविणारे आर्मांद कुलासो हे पहिले गोमंतकीय ठरले आहेत. गोव्याच्या आणि राष्ट्रीय फुटबॉलमध्ये आर्मांद कुलासोने प्रथम फुटबॉलपटू आणि नंतर प्रशिक्षक म्हणून आपली जबरदस्त छाप पाडली आहे. धेंपो स्पोर्ट्स क्लबचे मीडफिल्डर म्हणून खेळलेल्या आर्मांद यांनी संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतही गोव्याचे प्रतिनिधीत्व केले. मागील तीन दशके आर्मांद कुलासो यांनी विविध क्लबांना प्रशिक्षण दिले आहे. संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतही आर्मांदने गोव्याच्या संघाला प्रशिक्षण दिले आहे.
धेंपो स्पोर्ट्स क्लबला प्रशिक्षण देताना आर्मांद कुलासोनी त्यांना विक्रमी पाचव्यांदा राष्ट्रीय फुटबॉल लीगचे जेतेपद मिळवून दिले होते. गेल्या सप्टेंबर महिन्यात कुलासोचे नाव या पुरस्कारासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने निश्चित केले होते आणि कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी मिळाल्यानंतर ते क्रीडा मंत्रालयाकडे पाठविले होते. धेंपो क्लबचे प्रशिक्षक असताना आर्मांद कुलासो यांनी क्लबला राष्ट्रीय फुटबॉल लीग (एनएफएल), आय-लीग तसेच देशात विविध ठिकाणी होणाऱ्या फुटबॉल स्पर्धांत जेतेपदे मिळवून दिली आहेत. 2004 ते 2012 या प्रशिक्षण काळात त्यांच्या नावावर कित्येक जेतेपदे आहेत. आशियाई फुटबॉलच्या ‘सेकंड टियर’च्या एएफसी कपमध्ये धेंपो स्पोर्ट्स क्लबला त्यांनी उपान्त्य फेरीपर्यंत नेण्याची किमया साधली होती व असे करणारे ते पहिले भारतीय फुटबॉल प्रशिक्षक आहेत.
धेंपोचे प्रशिक्षक असताना आर्मांदो कुलासोच्या प्रशिक्षक कामावर प्रभावित होऊन अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने 2011 मध्ये त्यांच्याकडे भारतीय सीनियर फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद बहाल केले. मात्र कराराच्या कारणास्तव त्यांची ही प्रशिक्षकपदाची कारकीर्द केवळ चारच महिने टिकली. त्यांच्या मते त्यांना तीन वर्षांचा करार हवा होता, मात्र अखिल भारतीय महासंघाने त्यांचा करार फक्त एकच वर्ष केल्याने कुलासोनी भारतीय सीनियर फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद सोडले. धेंपो स्पोर्ट्स क्लब, सालसेत फुटबॉल क्लब, सेसा गोवा फुटबॉल क्लब तसेच कोलकाताच्या ईस्ट बंगाल संघालाही आर्मांद कुलासोनी प्रशिक्षण दिले असून 71 वर्षीय कुलासो सध्या गोव्याच्या स्पोर्टिंग क्लुब दी गोवाचे प्रशिक्षक आहेत. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवानात कुलासो यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.