अर्जुनाचे श्रीकृष्णावर अमर्याद प्रेम असल्याने त्याच्या इच्छा सफल होत असत
अध्याय आठवा
भगवंत म्हणाले, ज्यांना ब्रह्म आणि अध्यात्मकर्म म्हणजे काय हे समजलेले असते ते जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेले असतात हे ऐकून त्याबद्दल जाणून घ्यायची अर्जुनाची उत्सुकता वाढली म्हणून तो भगवंतांना म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म कशाला म्हणतात? कर्म म्हणजे काय व अधिभूत कशाला म्हणतात? अधिदैव कशाला म्हणतात? अधियज्ञ म्हणजे काय? आणि येथून प्रयाण करताना कोणते लोक तुम्हाला ओळखतात? हे मला सविस्तर उलगडून सांगा. ह्या अर्थाचे
ब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ।। 1 ।। अधि-यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे । प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती ।। 2 ।। हे दोन श्लोक आपण अभ्यासत आहोत.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने भगवंतांना विनंती केली की, देवा मी विचारलेल्या प्रश्नांचे कृपया उत्तर द्या कारण काही एक अंदाज करून हे समजून घ्यावे असा मी विचार केला पण मला तर काहीच उलगडत नाही. विशेष म्हणजे ज्या पुरुषांनी आपले अंत:करण स्वाधीन करून घेतले आहे, ते पुरुष त्यांच्या प्रयाणकाळी तुम्हाला कसे जाणतात हे समजून घेण्याची मला फार उत्सुकता आहे. ते मला सांगा.
येथे अर्जुनाचे भाग्य आपल्या नजरेस आणण्यासाठी माउली सांगतात, एखादा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल तर त्याचे बरळणेसुद्धा व्यर्थ जात नाही. येथे तर अर्जुन पूर्णपणे जागा झालेला होता म्हणून अर्जुनाने विचारल्याबरोबर श्रीकृष्ण सांगू लागले, म्हणाले, अरे, तू जे विचारलेस त्याबद्दल सांगतो.
माऊली पुढे म्हणतात, स्वर्गातील कामधेनु ज्याला जे हवे असेल ते देते आणि अर्जुन हा तर कामधेनूचा बछडा आहे, असे म्हणण्याचे कारण म्हणजे श्रीकृष्णाने त्याला आपला मानले आहे. त्यामुळे तो कल्पतरूच्या मांडवाखाली उभा आहे. म्हणून त्याचे मनोरथ सिद्धीस गेल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतात त्याला सुद्धा ब्रह्माचा साक्षात्कार होतो, मग ज्याला कृपेने उपदेश करतील त्याला ब्रह्मसाक्षात्कार का होणार नाही? ही गोष्ट लक्षात घेऊन आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे म्हणजे आपले अंत:करण कृष्णमय होते आणि आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबू लागतात. अर्जुनाच्या इच्छा सफल होण्यामागे अर्जुनाचे श्रीकृष्णावर असलेले अमर्याद प्रेम कारणीभूत आहे.
अर्जुन आता ब्रह्माबद्दल जाणून घेण्यास पात्र झाला आहे हे भगवंतांच्या लक्षात आले. त्याला ब्रह्मांडाच्या प्रपंचाची माहिती झाली होती आणि त्याव्यतिरिक्त असलेल्या परमेश्वराची म्हणजे परब्रह्माबद्दल जाणून घेण्यास तो उत्सुक आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यामुळे अर्जुनाने विचारल्याबरोबर ते अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. अर्जुनाचे श्रीकृष्णावर अमर्याद प्रेम असल्याने त्याच्या इच्छा सफल होत होत्या. नुसत्याच सफल होत होत्या असे नाही तर तो काय विचारेल हे आधीच ओळखून त्याबाबतची माहिती भगवंत त्याला लगेच देत होते.
क्रमश: