For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भक्तराज अर्जुनाचा सगळ्यात मोठा गुण समाधानी असणे हा होता

06:37 AM May 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
भक्तराज अर्जुनाचा सगळ्यात मोठा गुण समाधानी असणे हा होता
Advertisement

साधके चित्त बांधूनि इच्छा संग्रह सोडुनी । आत्म्यास नित्य जोडावे

Advertisement

 एकांती एकलेपणे ।। 10 ।।

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार ब्राम्ही स्थिती प्राप्त झालेला योगी परब्रह्माशी एकरूप झालेला असल्याने सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असल्याचा अनुभव घेत असतो. योगेश्वर भगवंत अर्जुनाला तो अनुभव द्यायला उत्सुक होते परंतु तो अनुभव घेऊन त्यांच्याशी एकरूप झाला असता आणि असे झाले की, मग जिवाभावाच्या गोष्टी कुणाशी करायच्या ह्या विचाराने त्यांनी त्याला ह्या गोष्टी स्वत:चा अनुभव म्हणून न सांगता योग्यांना असा अनुभव येत असतो असे सांगितले आणि त्यांच्यात आणि अर्जुनाच्यामध्ये असलेला द्वैताचा पातळ पडदा आहे तसाच ठेऊन द्वैताचे नाटक त्यांनी चालू ठेवले. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणाले, इकडे लक्ष द्या आणि पुढील कथाभाग ऐका. पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे कारण कृष्णाने त्यांच्यावर अद्भुत कृपा केली आहे. अशी कृपा व्हावी म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा वेळ पाहून विनंती करावी, एवढेही श्रम त्या भाग्यवान अर्जुनास करावे लागले नाहीत. देवकीने त्याला वाढवले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला. आता श्रोत्यांना दम धरवेना कारण त्यांना पुढील कथाभाग ऐकायची विलक्षण उत्सुकता लागली होती. ते म्हणाले, ज्ञानोबा, लवकर चालू विषय सांग.

Advertisement

श्रोत्यांच्या म्हणण्याला मान देऊन माउलींनी पुढे विवेचन चालू केले. ते म्हणाले, योग्याची लक्षणे ऐकून अर्जुन भगवंतांना विनम्रतेने म्हणाला, कृष्णा, ही योग्याची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत. या लक्षणांचा विचार केला तर ती अंगी बाणवायला मी खरोखर फारच अपुरा आहे परंतु तुमच्या उपदेशाने माझ्या अंगात ती लक्षणे रुजतील. म्हणून तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. ब्रह्म होण्यासाठी तुम्ही सांगाल तो अभ्यास मी करीन. अहो देवा, आपण कोणत्या योगीराज महाराजांच्याबद्दल बोलताय हे मला कळत नाही परंतु त्यांचे महात्म्य ऐकून मला ते अत्यंत स्तुत्य वाटत आहेत. अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील, त्यांचे महत्त्व किती असेल बरे? मलाही त्यांच्यासारखे व्हायचे आहे. हे प्रभु मी आपला आहे, असे समजून आपण माझ्यावर कृपा करावी. त्यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले, असे तुझे म्हणणे आहे का? मग तसे करू. देव अर्जुनाला किती अनुकूल आहेत पहा. त्याने नुसती त्याच्या मनातली इच्छा बोलून दाखवायचा अवकाश भगवंतानी तत्परतेने पूर्ण करायची तयारी दाखवली. म्हणूनच अर्जुनाला भक्तराज म्हणतात.

भक्तराज अर्जुनाचा सगळ्यात मोठा गुण समाधानी असणे हा होता. समाधानी होण्याला किती महत्त्व आहे हे येथे लक्षात येते. मनुष्य आहे त्या परिस्थितीत समाधानी असला की, मग त्याच्या सुखाला काही कमी नसते. समाधानी अर्जुन सर्वशक्तिमान सर्वेश्वराचा सेवक आहे. त्याच्या भक्तीच्या जोरावर भगवंत त्याला फलद्रूप झाले आहेत. इंद्रादिकांनी हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्मीळ तो समाधानी अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला आहे! दोघेही मनाने एकरूप झालेले होते. ह्यावरून लक्षात येते की, जर आपण समाधानी राहू शकलो तर आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो. अर्जुन भगवंताशी एकरूप झालेला असल्याने, मनकवड्यांचे राजे भगवंत अर्जुनाच्या मनातले सहज ओळखत असत.

Advertisement
Tags :

.