For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जुना तू योगी हो

06:13 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
अर्जुना तू योगी हो
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

मरणकाळी अर्चिरादिमार्ग वाट्याला येतो की धूम्रमार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे, असं भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुन खिन्न झाला. त्याची खिन्नता घालवण्यासाठी भगवंत म्हणाले, अर्चिरादिमार्गाने ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात. व्यवहारातल्या किंवा प्रपंचातल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्या मिळणे न मिळणे हे दैवाधीन असते परंतु ब्रह्मप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न वाया जात नाहीत कारण आपले मूळ स्वरूप ब्रह्माचे असून आत्मा हीच आपली खरी ओळख आहे. जन्माला आल्यावर त्यावर देहाचे आवरण चढलेले असते. त्यामुळे देह असो अथवा जावो, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत ही खुणगाठ मनाशी बांधावी.

देहात असतानाच ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना देहात असतानाच त्यांच्या मूळ स्वरूपाचे दर्शन झालेले असल्याने त्यांच्यासाठी सूर्यमार्ग ठेवलेलाच असतो. ज्या योग्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचे दर्शन झालेले असते ते काळावर मात करतात. मूळ स्वरूप त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या दृष्टीने चालू जीवनातल्या नाव, आडनाव ह्या ओळखीला काहीही महत्त्व राहिलेले नसते. अशा लोकांना काळाची कसलीच भीती वाटत नसते कारण त्यांचा देह पडला तरी त्यांची मूळ ओळख काळ मिटवू शकत नाही. हे सर्व लक्षात घेऊन अर्जुना तू योगी हो म्हणजे सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असल्याची अनुभूती तुला येईल ह्या अर्थाचा

Advertisement

असे हे मार्ग जाणूनी योगी मोह न पावतो । म्हणूनि सर्वदा राहे योगाने जडिला चि तू ।। 27 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.

माउली पुढे म्हणतात भगवंताच्या सांगण्यानुसार एकदा योगी व्हायचे ठरवले आणि त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असल्याची प्रचिती आल्याने अर्चिरादि अथवा धूम्रमार्ग हा विषयच रहात नाही कारण स्वत:च ब्रह्म झाल्याने योग्याला कुठे जाण्याची गरजच पडत नाही. माठ फुटल्यावर त्यातील आकाश हे महदाकाशाला मिळणार ह्याबद्दल काहीच शंका नसते, आपल्याला वाटते की, माठ फुटल्यामुळे त्याचा आकार नाहीसा झाला पण त्यामुळे त्यातील आकाशाला काहीच फरक पडत नाही त्याप्रमाणे योग्याचा देह पडला तरी त्याच्यातील आत्म्याला काहीही फरक न पडता तो सरळ त्याच्या मूळ स्वरुपात जाऊन मिसळतो ह्यात शंका नाही.

एवढ्याने स्वत:च्या ठिकाणी सर्वकाळ स्वरूपसाम्यता होईल. मग वाटेल तेथे, वाटेल तेव्हा, देहाचा पाश असो अथवा जावो, बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही. त्यामुळे तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही किंवा कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही व मधल्या स्थितीत स्वर्ग व संसार यांच्या मोहाने तो फसत नाही. संसारातील कर्तव्ये निभावून तो निरासक्तपणे त्यातून बाजूला होतो आणि आत्मस्वरूपाला येतो. अर्जुना, इंद्रादिक देवांचे सर्वस्व म्हणून स्वर्गादि राज्ये प्रसिद्ध आहेत पण त्याला त्यांचे काय कौतुक? कारण त्याने सर्वोच्च सुखाची चव चाखलेली असते. त्या चवीपुढे अगदी स्वर्गसुखसुद्धा फिके पडते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.