अर्जुना भलत्यावेळी तुला हे पाप कुठून सुचले?
अध्याय दुसरा
कौरवांच्याबरोबर युद्धाला उभे ठाकल्यावर अर्जुनाच्या लक्षात आले की, आपल्याला जवळच्या नातेवाईकांशी युद्ध करून त्यांना ठार मारावे लागणार आहे. वास्तविक पाहता ही गोष्ट त्याला माहित नव्हती असे नाही पण प्रत्यक्षात त्यांना समोर बघितल्यावर त्याचे त्यांच्याबद्दलचे प्रेम उफाळून आले.
समोर दिसणाऱ्या सगळ्यांना मारून राज्य मिळाले तरी ते त्याला नकोसे झाले. त्यांच्या मरणाच्या कल्पनेने तो दु:खसागरात बुडून गेला. मी हे युद्ध करणार नाही असे म्हणू लागला, त्यावर भगवंतांनी त्याच्या कलाकलाने घेत युद्ध करणे कसे आवश्यक आहे हे त्याला पटवून देण्यास सुरुवात केली. ह्या अध्यायाचे नाव सांख्ययोग असे असून ह्यात आत्मा अमर आहे आणि प्रत्येकाने नेमून दिलेले कार्य करायला हवे ह्या मुद्यावर भर आहे. अध्यायाच्या सुरवातीला करुणाग्रस्त अवस्थेत हातातील धनुष्यबाण टाकून रथात स्वस्थ बसून राहिलेल्या अर्जुनाला बघून संजय राजाला म्हणाला, असा तो करूणा-ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ।। 1 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाची अवस्था बघून संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐका महाराज, अर्जुन शोकाकुल होऊन रडू लागला आहे. आपल्या कुळातील सर्व नातेवाईकांना पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला. ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंगातले धैर्य नाहीसे होऊन त्याचे ह्रदय करुणेने द्रवले. दु:खाने व्याकुळ झालेला अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे कोमेजला आहे. तो महामोहाने जर्जर झाला आहे हे श्रीकृष्णाला अजिबात आवडले नाही. तो काहीशा उपहासाने
पुढील श्लोकात त्याला म्हणाला, कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ।। 2।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला असे म्हणाले की, हे अर्जुना! श्रेष्ठ लोकांना अमान्य असलेला, स्वर्गप्राप्तीच्या आड येणारा, असलेली किर्ती नाहीशी करणारा हा मोह तुझ्या मनात ह्यावेळी कोठून उद्भवला? अर्जुना, तू असे करणे योग्य आहे का? तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा विचार कर. तुला झाले आहे तरी काय? हा खेद कशाकरता? आत्तापर्यंत तू कधीही धीर सोडलेला नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयश तोंड काळे करते. शूरवृत्ती म्हणजे जणू काही तुझे दुसरे नाव होय. तू क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवातकवचाचा मागमूस नाहीसा केलास. तू गंधर्वांना पराभूत केलेस. तुझ्या पराक्रमाच्या मानाने हे त्रैलोक्यही तुच्छ आहे पण तू या वेळी आपला वीरपणा टाकून, खाली मान घालून, रडत बसला आहेस. तू श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन असूनही करूणेने दीन झाला आहेस! हे पाहून मला आश्चर्य वाटते कारण तुझ्याबाबतीत असे घडणे शक्यच नाही.
ज्याप्रमाणे पुढे सांगितलेल्या श्रेष्ठ गोष्टी कधीही घडू शकणार नाहीत त्याप्रमाणे अर्जुना, मी युद्ध करणार नाही असे तू म्हणणे शक्य नाही. अरे, अंधाराने सूर्याला गिळलंय असं कधी झालंय का? अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय? किंवा अमृताला मरण येईल का? लाकूड कधी अग्नीला गिळून टाकील काय? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल काय? किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय? कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय? असे अघटित कधीही घडणे शक्य नाही त्याचप्रमाणे तुझ्यासारखा शूरवीर असा रडतराउतपणा करणे शक्य नाही.
क्रमश: