For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गीतेच्या उपदेशाने अर्जुनाची कायम समाधी लागली होती

06:30 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
गीतेच्या उपदेशाने अर्जुनाची कायम समाधी लागली होती

अध्याय एकतिसावा

Advertisement

श्रीकृष्णाच्या वियोगावर अर्जुन कशा पद्धतीने विचार करत होता ते शुकमुनी परीक्षित राजाला सांगत आहेत. ते म्हणाले, अर्जुनाच्या मनात असा विचार आला की, सर्व मूर्ती कृष्णरूपच आहेत कारण माठाचे निरनिराळे आकार जरी दिसत असले तरी ते सगळे मातीपासूनच तयार झालेले असतात. त्यामुळे ते मातीपासून वेगळे नसतात किंवा ज्याप्रमाणे निरनिराळ्या रंगांनी रंगवलेले धागे कधी वस्त्रापासून वेगळे असू शकत नाहीत, त्याप्रमाणे सर्व माणसे कृष्णापासून वेगळी असू शकत नाहीत. बरं कृष्णवियोग झालाय असं जिथं मी म्हणेन तिथेही श्रीकृष्णनाथाचे अस्तित्व आहेच. म्हणून श्रीकृष्णाचा वियोग झाला आहे असे जो म्हणेल तो केवळ भ्रांत आणि अतिमूर्ख समजावा. कायम, सर्वगामी, परिपूर्ण असलेला श्रीकृष्ण अखंड अस्तित्वात असल्याने तो आणि मी एकच आहोत. ‘न जायते म्रियते’ हे त्याने गीतेत सांगितलेले वचन आहे. आत्मा जन्मत नाही किंवा मरतही नाही असे सांगणाऱ्या कृष्णाला जन्ममरण आहे असे समजणारे लोक मूर्खच म्हणायला हवेत. ‘अक्षरं ब्रह्म परमं’ म्हणजे ब्रह्म हे अक्षर असल्याने ते कायम टिकणारे आहे असेही कृष्णाने सांगितले आहे आणि तो ब्रह्मरूप कृष्ण जन्ममरणाच्या पलीकडे आहे. असे जर आहे तर त्याला जन्ममरण आहे असे म्हणणे वेडेपणाचे होईल. जो ‘क्षराक्षरातीत’ म्हणजे नाश पावणाऱ्या आणि कायम टिकणाऱ्या वस्तूंच्याही पलीकडला ‘उत्तमपुरुष’ आहे. असा श्रीकृष्णनाथ जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडेलच कसा? हे शक्यच नाही म्हणून त्याला मरण आले असे म्हणणे ही एक भ्रांतच आहे हे नक्की. तेव्हा कृष्ण म्हणून कुणी माझ्यापेक्षा वेगळा आहे ह्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. जो कुणी गीतेचा योग्य अर्थ ध्यानात घेईल तो स्वत:ला श्रीकृष्णापेक्षा वेगळे समजूच शकणार नाही कारण त्याला स्वत:तील कृष्णाचे अस्तित्व जाणवेल. त्यामुळे तो स्वत:ला परिपूर्ण समजेल. मलाही माझ्यातील श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत असून ते नुसतेच जाणवत आहे असे नाही तर माझे अस्तित्व लोप पावून माझ्यामधील कृष्णच क्रियाशील आहे अशी मला बालंबाल खात्री आहे. त्याचा परिणाम म्हणून मला असे वाटत आहे की, मी अजन्मा, आद्य, अचल असून नित्य निर्मल आहे. त्रैलोक्य हा माझाच खेळ आहे. जगाचे नियमन मी वेदाच्या मार्फत करत असून वेद हे माझेच निश्वास आहेत. मी आनंद, परमानंद असून स्वानंदकंद आहे. मी अप्रूप असून प्रकृतिपुरुषाचा बाप आहे. मी स्वत: कृष्णरूप आहे. हाच माझा सत्यसंकल्प आहे. मला माझ्या स्वरुपाची जाणीव श्रीकृष्णाने गीतेतील तत्वज्ञानाने करून दिलेली आहे. त्यामुळे मला माझ्या सत्य स्वरूपाचे ज्ञान झाले आहे. त्या माझ्या सत्य स्वरूपाचा आधार घेऊन मीच कृष्ण असून, मीच कृष्णरूप अवतार घेतलेला आहे असे मी ठामपणाने सांगू शकतो. अनेक लीला करून, अनेक रुपात मी माझे चरित्र तयार केले असून शेवटी माझ्या स्वरुपात मी सामावलेलो आहे. माझ्या नीजस्वरूपाच्या माध्यमातून मीच कृष्णरूपाचा खेळ खेळलो आणि शेवटी माझ्यात मी सामावून गेलो. मी नर, तो नारायण असे दिसताना वेगवेगळे दिसत असलो तरी मी अर्जुन स्वत:ला परिपूर्ण समजतो. श्रीकृष्णाचे माझ्यावर किती उपकार आहेत त्याला काही सीमा नाही. बाप कृपाळु कृपानिधी असलेल्या श्रीकृष्णाने भारतीय युद्धाच्यावेळी मला उपदेश करून जी समाधीअवस्था प्राप्त करून दिली ती कोणत्याही परिस्थितीत कल्पांतापर्यंत उतरणार नाही. त्यांनी माझी जी स्थितप्रज्ञ अवस्था साधून दिली ती एकदा प्राप्त झाली की, कायम टिकून राहते असे त्यांनीच सांगितले आहे म्हणून मी असे म्हणत आहे. त्याचा प्रत्यय मला युद्धाच्याप्रसंगी पुरेपूर आला. रणवाद्ये वाजत होती, रथांचे खडखडात चालू होते, शस्त्रांचे कडकडाट होत होते, त्याही वातावरणात माझी परमार्थनिष्ठा यत्किंचितही ढळली नाही.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.