For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जुनाला मोहाच्या लहरीने पुन्हा व्यापले

06:39 AM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
अर्जुनाला मोहाच्या लहरीने पुन्हा व्यापले
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

अर्जुन श्रीकृष्णांना शरण जाऊन म्हणाला, माझे मन कमकुवत झाल्याने मला धर्म-अधर्म कळेनासा झाला आहे, माझे चित्त मोहित झालेले आहे म्हणून ज्यात माझं भलं आहे ते मला सांगा. मी तुमचा शिष्य आहे. मला आपण उपदेश करा. ह्या अर्थाचा

दैन्याने ती मारिली वृत्ति माझी । धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे? कैसे माझे श्रेय होईल सांगा । पायांपाशी पातलो शिष्य-भावे ।। 7 ।।

Advertisement

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार अर्जुन भगवंतांना असे म्हणाला की, आमच्यासाठी सखा, गुरु, बंधु, पिता, इष्ट देवता आणि संकटात आम्हाला तारणारे तुम्हीच आहात. युद्ध न करण्याविषयी माझे बोलणे तुम्हाला पटत नसेल तर जे धर्माला उचित आहे ते मला सांगा. हे सर्व नातेवाईक पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुमच्या उपदेशावाचून दुसऱ्या कशानेही शमणार नाही. माझ्या मोहित झालेल्या या बुध्दीला सरळ करण्यासाठी राज्यभोग, समृद्धी याचा मूळीच उपयोग होणार नाही. हे कृपानिधे! तुमच्या कृपेचा जिव्हाळाच मला उपयोगी पडेल. तुमची कृपाच मला आधार देईल. मी तुम्हाला शरण आलेलो आहे.

माउली पुढे म्हणतात, आम्ही काय करणे उचित आहे हे तुम्हीच आम्हाला सांगा इत्यादि अर्जुन जोपर्यंत बोलत होता तोपर्यंत अर्जुनाची भ्रांती दूर झाली होती पण लगेच त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले. हा मनुष्य स्वभाव आहे. देवळातील देवदर्शनाने जरा कुठे माणसाचे मन सात्विक होत असते तेव्हढ्यात आत्मस्वरूपाचा विसर पडून तो मोहग्रस्त होतो. म्हणून पुढील श्लोकात तो श्रीकृष्णांना म्हणतो, युद्ध करून निष्कंटक राज्य किंवा स्वर्गातले इंद्रासन जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना सुकवणारा शोक कमी होणार नाही.

मिळेल निष्कंटक राज्य येथे । लाभेल इंद्रासन देव-लोकी? शमेल त्याने न तथापि शोक । जो इंद्रियांते सुकवीत माझ्या ।। 8 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुन भगवंतांना असे म्हणाला की, या वेळी संपूर्ण पृथ्वी जरी हाती आली, किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने रोग बरा होणार नाही. त्याप्रमाणे माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी उत्तेजन देऊ शकत नाही.

संजय हे सर्व पहात होताच. त्याने घडलेला सर्व वृतांत राजाला सांगितला. पुढील श्लोकात तो म्हणाला, ह्याप्रमाणे अर्जुनाचे शोक करणे चालूच होते. वर सांगितलेले सर्व बोलून झाल्यावर मी हे युद्ध करणार नाही असे निर्वाणीचे सांगून तो पुढे काहीही न बोलता गप्प उभा राहिला.

असे अर्जुन तो वीर हृषीकेशास बोलुनी । शेवटी मी न झुंजे चि ह्या शब्दे स्तब्ध राहिला ।। 9 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, संजयाने धृतराष्ट्राला असे सांगितले की, अर्जुनाने मी तुम्हाला शरण आलो आहे असे भगवंतांना सांगितले होते पण तेव्हढ्यात पुन्हा आलेल्या मोहाच्या लहरीमुळे खिन्न होऊन तो भगवंतांना म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी लढणार नाही. असे बोलून स्तब्ध होऊन बसलेल्या अर्जुनाला पाहून भगवंतांना विस्मय वाटला. ते मनात म्हणाले, ह्याला मुळीच काही कळत नाही, आता काय करावे? ह्याची समजूत कशी घालावी? कशाने हा धीर धरेल? ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो किंवा असाध्य रोग पाहून वैद्य अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो त्याप्रमाणे कोणत्या उपायाने अर्जुनाला मोहातून मुक्त करता येईल याचा श्रीकृष्ण विचार करत होते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.