अर्जुना हा कर्मयोग म्हणजे माझ्या हृदयातील विशेष ठेवा आहे
अध्याय चौथा
भगवंत अर्जुनाला म्हणाले, कर्मयोग सृष्टीच्या आरंभी मी सूर्याला सांगितला, सूर्याने तो मनूला सांगितला आणि मनूने त्याच्या मुलाला, राजा इक्ष्वाकूला सांगितला परंतु काळ जसजसा पुढे सरकला तसतसे कर्मयोगाचे महात्म्य कमी होऊन तो पुढे लुप्त झाला. कारण प्राणिमात्रांचा सगळा भर “काम” या विषयावर होता. हा देह म्हणजेच मी असे वाटून ते देहावरच प्रेम करत असल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. त्यामुळे बहुतेक समाज ह्या योगपरंपरेपासून दूर गेल्याने हा निष्काम कर्मयोग लुप्त झाला. भगवंत पुढील श्लोकात म्हणाले, अर्जुना तू माझा भक्त व सखा आहेस, म्हणून तोच पुरातन योग, मी तुला सांगितला आहे.
तो चि हा बोलिलो आज तुज योग पुरातन । जीवीचे गूज हे थोर तू हि भक्त सखा तसा ।।3 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, हे कुंतीसुता ! तोच योग मी तुला सविस्तर सांगतोय. याविषयी मनात कोणत्याही प्रकारचा संशय बाळगू नकोस. हा कर्मयोग म्हणजे माझ्या हृदयातील विशेष ठेवा आहे पण तू माझा जवळचा मित्र आणि भक्त असल्यामुळे तुझ्यापासून हा योग कसा बरे चोरून ठेऊ? लाडक्या अर्जुना! तुझा आणि माझा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे तुझ्यापासून काही लपवून ठेवता येईल काय? तरी काही काळ हा युद्धाचा प्रसंग बाजूला ठेव. माझे प्रथम कर्तव्य तुझे अज्ञान घालवून तुला आत्मस्वरुपाची जाणीव करून देणे हे आहे. ह्यावरून लक्षात येते की, जर आपण देवाची भक्ती करत असताना त्याच्याशी मित्रत्वाचे नाते जोडले तर तेही आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देतील.
अर्जुनाने भगवंताचे बोलणे ऐकले परंतु भगवंतानी पूर्वी कधीतरी हा कर्मयोग सूर्याला सांगितला ह्या त्यांच्या बोलण्यावर त्याचा चटकन विश्वास बसला नाही. देव हे काहीतरीच बोलत आहेत असे वाटून पुढील श्लोकात त्याने विचारले, हे देवा ! आपल्या दोघांचा जन्म हा अलीकडचा, आणि सूर्याचा जन्म आपल्या फार पूर्वीचा आहे मग तू सुरुवातीला हा योग त्याला सांगितलास, ह्यावर मी कसा विश्वास ठेवू?
ह्या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन । तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे ।। 4 ।।
एकीकडे अर्जुन भगवंताना देव म्हणत आहे आणि दुसरीकडे तो देवांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवत आहे हे कसे? असे आपल्याला वाटते. अर्जुन भगवंताना देव, देव असे जरी म्हणत असला तरी त्यांच्यातले नाते मित्रत्वाचे होते. अर्जुनाला ते मित्र म्हणून अत्यंत जवळचे होते आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला काहीही म्हणू शकतो, विचारू शकतो. ह्या नात्याने त्याने भगवंताच्या बोलण्यावर अविश्वास दाखवून वरील प्रश्न विचारला आहे. ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते की, कुणाच्या ना कुणाच्या रुपात देव जरी समोर उभा राहिला तरी माणूस त्याला लगेच ओळखू शकेलच असे नाही.
आता अर्जुनाचेच पहा ना भगवंताशी त्याचा नित्य संबंध येत असे. त्यांनी ह्यापूर्वी केलेल्या कित्येक लीला, चमत्कार त्याने प्रत्यक्ष पाहिले होते तरीही त्याने भगवंताच्या बोलण्यावर अविश्वास दाखवला. पुढे गीता सांगत सांगत त्यांनी त्याला आत्मस्वरुपाची जाणीव करून दिल्यावर मात्र तो सावध झाला आणि नंतर भगवंतानी त्याला विश्वरूप दाखवल्यानंतर तो चकित तर झालाच पण आपले त्यांच्याबरोबरचे अनादराचे वागणेबोलणे आठवून तो खजीलही झाला. तो सर्व कथाभाग आपण अकराव्या अध्यायात पाहणार आहोतच.
क्रमश: