For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जुना तू समदृष्टी ठेव

06:41 AM Jun 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
अर्जुना तू समदृष्टी ठेव
Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले, मीच सर्व विश्व व्यापलेले आहे हे ज्याच्या लक्षात येते तो जरी नामरूपाने माझ्यापेक्षा वेगळा असला तरी मत्स्वरूप झालेला असतो. त्याला स्वत:सह सर्व माणसे ईश्वराची रूपे आहेत असे जाणवत असल्याने त्यांची सुखदु:खे, पापपुण्ये त्याला स्वत:ची वाटू लागतात. तो सर्व व्यवहार करत असला तरी आतून तो परब्रह्माशी एकरूप झालेला असल्याने तो स्वत:च्या देहाकडे त्रयस्थपणे पाहू शकतो.

Advertisement

भगवंतांनी अर्जुनाला तू साम्याची उपासना कर म्हणजे तू परब्रह्म होशील असे सांगितले. साम्याची उपासना कशी करायची ह्याचा उलगडा नाथबाबांच्या लागो छंद गोविंद, नित्य गोविंद हा अभंगातून आपल्याला झाला. त्यांनी घेतलेल्या अनुभूतीनुसार, त्यांना बाह्य गोष्टींचे आकर्षण वाटायचे बंद झाले, आधी म्हणजे मनाचे आजार आणि व्याधी म्हणजे देहाचे आजार गोविंदाने नाहीसे केले, शेवटी जनी, वनी गोविंदाचे दर्शन होऊ लागले. म्हणून प्रत्येकाने गोविंदाकडे त्याचा छंद लागावा अशी प्रेमाने करुणा भाकावी म्हणजे पुढच्या गोष्टी तो आपोआपच घडवून आणतो.

भगवंत पुढे म्हणाले, अर्जुना तू समदृष्टी ठेव, असे मी पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो कारण त्याच्यासारखा ह्या जगात दुसरा लाभ नाही. भगवंतांनी अर्जुनाला योगमार्गाचे सविस्तर कथन केले ज्यांना तो अवघड वाटेल त्यांना त्यांच्याठायी मन एकरूप करण्यास सांगितले.

Advertisement

अर्जुनाने हे सगळे काळजीपूर्वक ऐकले. त्यातून त्याच्या हे लक्षात आले की, मन भगवंतांशी एकरूप होण्यासाठी मनाला सतावणाऱ्या सर्व काळज्या मागे टाकून ईश्वर माझा पाठीराखा असून माझ्या हिताचे सर्व घडवून आणणारा आहे हा विचार दृढ करावा, मन जर भरकटले तर त्याला तेथून काढून भगवंतांच्या चरणी लावावे, तरीही जर मनाने ऐकले नाही तर त्याला भरकटू द्यावे. कालांतराने ते पुन्हा भगवंतांच्या चरणी लीन होईल असे उपाय सांगितले.

हे उपाय वापरून भगवंतांच्या चरणी क्षण दोन क्षण मन एकाग्र होऊ शकेल पण साम्यदृष्टी प्राप्त होण्यासाठी ते कायम भगवंतांच्या चरणी एकाग्र राहिले पाहिजे. मनाच्या चंचल स्वभावामुळे हे कठीण असल्याने तो भगवंतांना म्हणाला,

हे मधुसूदना, मनाचा निग्रह करणे दुरापास्त आहे. म्हणून तू सांगितलेला समदर्शनाचा योग चंचल मनामुळे साध्य होईल असे मला वाटत नाही.

तू बोलिलास जो आता साम्य-योग जनार्दना । न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे ।। 33 ।।

मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे। धावे वार्यावरी त्याचा दिसे निग्रह

दुष्कर ।। 34।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुन देवांना म्हणाला, तुम्ही आमच्या विषयीच्या कळकळीने सांगत आहात, परंतु महाराज, या मनापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे व केवढे आहे, ह्याचा काही अंदाज येत नाही. त्याच्या अवाढव्य आकारामुळे याला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. त्याला पकडून तुमच्या ठायी स्थिर करणे म्हणजे माकडाला समाधी लावायला सांगितल्यासारखे

आहे किंवा सोसाट्याच्या वाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.