अर्जुना, चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेऊन सर्व कर्मे मला समर्पण कर
अध्याय तिसरा
भगवंत अर्जुनाला म्हणाले, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक केलेल्या कर्मातून आपल्याला हवे ते फळ मिळेल ह्या आशेने जीव ओतून कर्मे करतात त्याप्रमाणेच लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने ज्ञानी पुरुषाने कर्मे करावीत. जो गुणांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा स्वत:कडे घेतो, तो कर्मामध्ये बध्द होऊन राहतो. अशा अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद ज्ञानी माणसाने करू नये. आपल्या वागणुकीने त्यांच्यापुढे आदर्श कर्मपद्धती ठेवावी. त्यांच्या सत्कार्याची स्तुती करावी. सत्पुरुषाने केलेली कर्मे लोकांच्या कल्याणासाठी असल्याने त्याला कर्माचे बंधन लागत नाही. सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांकडून केली जातात. आपण आत्मस्वरूप असून गुण व कर्म हे आपल्याहून भिन्न आहेत, असे आत्मज्ञानी पुरुष जाणत असल्याने तो हे जाणून असतो की, त्रिगुण आपापल्या वैशिष्ट्यांनुसार शरीराला कर्म करण्यास भाग पाडत आहेत, त्यामुळे तो फळाची अपेक्षा करत नाही.
फळाची अपेक्षा करून आपला भक्त जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकू नये असे भगवंतांना वाटते. मी कर्म करतो ह्या गैरसमजातून फळाच्या अपेक्षेने माणसाने कर्मात बद्ध होऊन त्याने पुढील जन्माची बेगमी करू नये म्हणून त्यावर करायचा उपाय ते पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेऊन सर्व कर्मे मला समर्पण करून आशारहित, ममतारहित आणि शोकरहित होऊन युद्ध कर.
मज अध्यात्म-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी । फलाशा ममता सर्व सोडुनी झुंज तू सुखे ।। 30।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी असं सांगितलंय की, सर्व विहित कर्म उत्तम प्रकारे करून ती मला अर्पण कर आणि चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी स्थिर कर. कर्म करत असताना ‘मी या कर्माचा कर्ता आहे’ असा अभिमान कदाचित तुला वाटेल. त्यामुळे अमुक एक कारणासाठी किंवा अमुक एक फळ मिळण्यासाठी मी हे कर्म करत आहे, असा विचार तुझ्या मनात येईल. हा विचार तुला शरीराबद्दल वाटत असलेल्या प्रेमामुळे तुझ्या मनात येऊ शकतो. ह्या शरीराच्या बळावर आपण काय वाटेल ते करू शकतो ह्या खात्रीने तू कर्ता आहेस असे तुला वाटत असेल परंतु ते चुकीचे आहे म्हणून मी कर्ता आहे ह्या गैरसमजात राहू नकोस. ह्या गैरसमजामुळे तू तुझ्या शरीराच्या स्वाधीन होतोस. हे शरीराच्या आहारी जाणे घातक असते म्हणून ते टाळ. त्यासाठी सर्व इच्छांचा त्याग कर आणि प्रारब्धानुसार जे भोग वाट्याला येतील त्यांचा उपभोग घे. आता तू आपल्या हातात धनुष्य घे, रथावर आरूढ हो आणि समाधानाने विरवृत्तीचा स्वीकार कर. या जगामध्ये तू आपली कीर्ती वाढव, स्वधर्माचा मान वाढव आणि या पृथ्वीला दुष्टांच्या भारापासून सोडव. हे अर्जुना! आता तू सर्व प्रकारचे संशय टाकून या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस. जरी अर्जुनाला भगवंतांनी हा उपदेश केलेला असला तरी आपणा सर्वांनाही तो लागू आहे.
भगवंतांनी अर्जुनाला चित्त माझ्या ठिकाणी ठेव आणि कोणतीही आशा अपेक्षा न ठेवता तुझे कर्तव्य कर असे सांगितले तरी पण समोरच्याने सांगावे आणि माणसाने त्याप्रमाणे वागावे असे क्वचितच घडते. उलट हा कोण मला सांगणार? मी काय चुकीचे करतोय का? असे त्याच्या मनात आल्याशिवाय रहात नाही किंबहुना असे सांगणाऱ्याचा मत्सर किंवा द्वेष करायला लोक कमी करत नाहीत. भगवंतांना मनुष्य स्वभावाची चांगलीच जाण असल्याने पुढील श्लोकात ते म्हणतात, जे माझा मत्सर न करता माझ्यावर श्रद्धा ठेवतील आणि मी सांगितल्याप्रमाणे आचरण करतील, ते कर्माच्या बंधनापासून मुक्त होतील.
क्रमश: