विषय कायम सुख वा दु:ख देणारे नसल्याने अर्जुना तू ते येतील तसे सहन कर
अध्याय दुसरा
आपल्या हातून आपले नातेवाईक मारले जाणार म्हणून युद्ध टाळावे असे अर्जुनाचे मत होते. आपल्या हातून आपल्या नातेवाईकांचा मृत्यू होणार असे त्याला वाटत असले तरी त्यांचे मृत्यू घडवून आणणारी शक्ती वेगळी आहे हे सांगताना भगवंत म्हणाले, येथे कुणीच कर्ता नसून सर्वांचे जन्म, मृत्य त्या शक्तीच्या मर्जीवर अवलंबून आहेत. मायेमुळे, देहाचा जन्म आणि मृत्यू अनुभवाला येतो. देहाला बालपण, तरुणपण आणि वृद्धावस्था ह्या अवस्था प्राप्त होतात व आयुर्मान संपले की मृत्यू येतो पण शरीरातील आत्मा मात्र अमर असून तो सध्याचा देह नाश पावल्यावर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हे जो जाणतो त्याला तात्पुरते अस्तित्व असलेल्या देहाचा नाश झाल्यास दु:ख होत नाही. मात्र मायेच्या पाशात गुरफटलेल्या अज्ञानी माणसाला डोळे जे दाखवतायत तेच खरे वाटत असते.
भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, माणसाच्या अंत:करणावर राज्य करणाऱ्या इंद्रियांचा विषयांशी संबंध आला की, तो आनंदाच्या प्रसंगी सुखी होतो तर दु:खाच्या प्रसंगी त्याला वाईट वाटते पण सुखदु:खाचे प्रसंग माणसाच्या वाट्याला येतात तसे जातात म्हणून हे भारता! त्यांना तू सहन केले पाहिजेस.
शीतोष्ण विषय-स्पर्श सुख-दु:खात घालिती । करी सहन तू सारे येती जाती अनित्य ते ।। 14 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला असे म्हणाले की, इंद्रियांच्या मार्फत मनुष्य विषयांचे सेवन करतो, आत्मा अंत:करणाशी एकरूप झालेला असल्याने उत्पन्न होणारी सुखदु:खे त्याला ग्रासून टाकतात. ह्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, ते कधी दु:ख व कधी सुख देतात. मनुष्य समोर दिसणारे जग खरे आहे असे समजून वाट्याला येणाऱ्या सुखदु:खांचे कर्तृत्व स्वत:कडे घेतो.
भगवंत पुढे म्हणतात, निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कानांनी जर स्तुती ऐकली तर आनंद मिळतो पण, निंदा ऐकताच निंदा करणाऱ्याचा मनुष्य द्वेष करू लागतो. मृदूता आणि कठीणता, हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत. ते त्वचेच्या ठिकाणी भासल्याने संतोषाला आणि खेदाला कारण होतात. तसेच, भेसूर आणि सुरेख ही दोन लक्षणे रूपाविषयी आहेत. ती नेत्राद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात. सुगंध व दुर्गंध हे नाकामुळे सुखदु:ख उत्पन्न करतात. त्याचप्रमाणे कडू व गोड दोन प्रकारचा रस असतो. एकातून नावड आणि एकातून आवड निर्माण होते. म्हणून विषयांची संगती मानवाला अधोगतीला नेणारी आहे. अज्ञानी मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात गेल्याने आवडीनावडीचा अनुभव घेतो आणि सुखदु:खाच्या चक्रात सापडतो. ज्ञानेंद्रियांनी सुचवलेल्या आवडीच्या विषयांचे मनुष्य सेवन करतो. सेवन करताना त्याला आनंद होत असतो तर मिळणारे सुख संपले की, त्याला दु:ख होते. विषयांच्या सेवनामुळे उत्पन्न होणारी सुखदु:खे त्याचे अंत:करण ग्रासून टाकतात. सुखदु:खे जाणवण्याचे कारण असे की, मनुष्य समोर दिसणारे जग खरे आहे असे समजून त्याचे कर्तृत्व स्वत:कडे घेतो आणि सुखदायक गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेन्द्राrयांना विषयावाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही. ती माणसाच्या मनावर राज्य करत असल्याने मनुष्यही विषयात गुंतत जातो. ज्या विषयात मनुष्य गुंतत जातो ते विषय कायम सुख वा दु:ख देणारे नसल्याने आभासी आहेत. म्हणून अर्जुना तू ते येतील तसे सहन कर कारण त्यांचा मनावर होणारा परिणाम तात्पुरता असतो.
क्रमश: