For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जुन व संजय ही श्रीकृष्णाच्या खास प्रेमातली माणसे होती

06:27 AM Aug 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
अर्जुन व संजय ही श्रीकृष्णाच्या खास प्रेमातली माणसे होती
Advertisement

भगवंतांनी आत्तापर्यंत केलेला उपदेश ऐकून अर्जुन भारावून गेला. भगवंतांचे बोल म्हणजे अर्थरूपी रसाने भरलेली फळे होती व त्यांचा भक्तिरूप सुवास चोहींकडे पसरला होता. कृष्णकृपारूप मंद वाऱ्याने, ती अर्जुनाच्या श्रवणरूप ओटीत सहज येऊन पडली. आत्मज्ञानाची गुरुकिल्ली हातात पडल्याने अर्जुन मुक्त होऊन कायम सुखात डुंबत राहणार होता. आत्तापर्यंत त्याने फक्त त्या फळांचे बाह्य स्वरूप पाहिले होते. त्या फळांची चव घेण्याची जिभेला इच्छा उत्पन्न झाली. म्हणून त्याने देवांना विनंती केली की, देवा, शेवटी तुम्ही ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, आधिदैव, अधियज्ञ आणि अंतकालचे प्रयाण ह्या सात पदांचा उल्लेख केलात परंतु मला त्यातले काहीही कळले नाही. तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले तरी कळण्यास सहजसोपे नसते आणि माझ्या लक्ष देण्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे तुमच्या सिद्धांतांचे महत्त्व माझ्या लक्षात येणे शक्य नाही. तुमचे बोलणे कांही साधारण नव्हे. तुम्ही बोलत असताना कानांनी ते मी ऐकत होतो खरे परंतु ते ऐकून मी आश्चर्यचकित झाल्याने माझी बुद्धी चालेनाशी झाली. त्यामुळे तुमच्या बोलण्याच्या मतितार्थाकडे माझे लक्षच गेले नाही. त्या सात शब्दांचा अर्थ समजून घेण्याची मला फार इच्छा आहे. त्याची मला इतकी उत्सुकता लागून राहिली आहे की, ह्याला होणारा उशीर मला सहन होत नाही. म्हणून, देवा लवकर सांगा. वरील सात शब्दांचा अर्थ समजून घ्यायला अर्जुन अगदी उतावीळ झाला होता परंतु आपण शिष्य असून श्रीकृष्ण आपले सद्गुरू आहेत ह्याचे भान त्याला होते. म्हणून मर्यादेचे उल्लंघन न करता श्रीकृष्णाच्या ह्रदयातली गोष्ट जाणून घेण्यास तो सज्ज झाला. अहो, श्रीगुरूंना ज्या वेळेस पुसावयाचे, त्या वेळेस अशाच मर्यादेने पुसावे लागते. त्यांची मर्यादा कायम ठेवून कसे पुसावे हे फक्त एक अर्जुनच जाणतो. आता अर्जुनाच्या प्रश्नावर सर्वज्ञ श्रीहरिचे काय उत्तर असेल हे जाणून घेण्यासाठी संजयाची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती. त्याच्या मनात श्रीकृष्णाबद्दल अत्यंत आदर होता आणि तितकेच त्याचे त्यांच्यावर प्रेमही होते. त्यातून अर्जुन, संजय ही श्रीकृष्णाच्या खास प्रेमातली माणसे होती. पुढील अध्यायात भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. त्यामध्ये नित्य असणाऱ्या ब्रह्माबद्दल सांगणार असून त्याचा योग कसा साधायचा ह्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून माउली श्रोत्यांना विनंती करतात की, मी सांगतो त्याकडे इतके नीट लक्ष द्या, माझे बोलणे कानांनी ऐकण्याच्या अगोदर नुसत्या माझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून तुम्हाला त्यातील अर्थ दिसेल, बुद्धिरूप जिभेने त्या शब्दांचा रस न चाखता अक्षरांच्या शोभेने इंद्रिये तगतील. मालतीच्या कळ्यांचा स्वाद नाकाला येईल, परंतु त्याच्या बाहेरील सुरेखपणाने डोळ्यांना सुख होणार नाही का? त्याचप्रमाणे, मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिये सुखाचे राज्य करतील.

Advertisement

          सातवा अध्याय समाप्त

Advertisement
Advertisement
Tags :

.