अर्जुना बाह्य गोष्टींचे आकर्षण सोड आणि अंतर्मुख हो
अध्याय नववा
निर्गुण जाणल्यावर भक्त देवात मिसळून जातो. अनन्य भक्तांनी ही गुह्य गोष्ट ओळखली असल्याने ते निर्गुणाची ओळख पटल्यावर सगुणाची उपासना सुरू ठेवणेच पसंत करतात कारण जर निर्गुण स्वरुपात मिसळून गेले तर मग त्यांना देवाची भक्ती करायची संधी कशी मिळणार? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मुक्ती आणि संपदा आम्हाला नको तसेच आम्ही गर्भवासाचे दु:खही आनंदाने सोसायला तयार आहोत. भक्तांच्या भक्तीचे देवाला ओझे वाटते व त्यांचे ऋण फेडावे ह्या उद्देशाने, तसेच त्यांना भक्तीत मग्न होता यावे म्हणून तो जगजेठी स्वत: त्यांची कामे करू लागतो. असे भक्ताचे आणि भगवंतांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम असते.
असे हे भगवंत आणि त्यांचे अनन्य भक्त एकमेकांना खूप ओळखून असतात. अर्थात ज्याच्यावर भगवंत त्यांचा जीव ओवाळून टाकतात असा अनन्यतेने त्यांची भक्ती करणारा भक्त लाखो करोडोमध्ये एखादाच असतो, बाकी सगळे त्यांच्याशी देवघेव करत असतात आणि व्यवहाराने वागत असतात. म्हणून पुढील श्लोकात ते म्हणतात, माझे विश्वचालक स्वरूप न जाणणारे मूढ, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण सध्या मानवदेहात वावरणाऱ्या मला मनुष्य समजून, माझी अवहेलना करतात. मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती । नेणूनि थोरले रूप जे माझे विश्व-चालक ।।11 ।।
परमेश्वराचे आत्तापर्यंत पृथ्वीवर आठ अवतार झालेले आहेत. त्या प्रत्येक अवतारातील चरित्रावरून असे लक्षात येते की, जेव्हा जेव्हा ईश्वरी अवतार झालेले आहेत तेव्हा तेव्हा एखादा सन्माननीय अपवाद वगळता इतर लोकांनी समोर वावरणारे मानवी देहातले व्यक्तिमत्व हा सगुण रूपातला ईश्वर आहे हे न समजल्याने ते देवांना आपल्यापैकीच एक समजतात. त्यांच्या विकारी स्वभावानुसार त्यांच्याशी वर्तणूक करतात प्रसंगी त्यांना हिणवत असतात. कृष्णावतारातही भगवंतांना सुदामा, अक्रूर, उद्धव, भीष्म, द्रौपदी अशा हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या अनन्य भक्तांना सोडल्यास इतरांनी त्यांना गवळ्याचा पोर, रणछोडदास अशी शेलकी विशेषणे लावून त्यांची निर्भत्सना केलेली आहे.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी त्यांच्या भक्तांना सांगितले की, जर तुम्ही या संसारात पुन:पुन्हा होणाऱ्या जन्म-मरणाला भीत असाल आणि जर माझ्या स्वरूपप्राप्तीची तुम्हाला खरोखर इच्छा असेल तर मी सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा. बाह्य गोष्टींचे आकर्षण सोडा आणि अंर्तमुख व्हा. नाहीतर ज्याप्रमाणे काविळीने व्यापलेली दृष्टी चांदण्यालाही पिवळे समजते त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पहाल अथवा तापाने बिघडलेले तोंड दुधाला कडू विष म्हणेल.
पुढे ते अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, पुन्हा तुला एकवार बजावतो की, तू कदाचित मी सांगितलेल्या माझ्या स्वरूपज्ञानाला विसरशील तर तसे विसरू नकोस. मला बघितल्यावर तुला माझ्यात स्वरूप दिसेल असे तुला वाटत असेल तर ते शक्य नाही कारण माणसाच्या दृष्टीला ते दिसणे अशक्य आहे. त्यामुळे मला तुमच्यातीलच एक मानण्याची चूक तुही करशील.
क्रमश:
