अर्जुन देवांचे सांगणे हृदयात जपून ठेवत होता
भगवंत अर्जुनाला म्हणाले, जीव व परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी योग्याचे मन गुंतलेले असते. तो जरी देहधारी असला तरी त्याचा महिमा मोठा असतो. सगळ्यांना अशा पद्धतीने चिकाटीने ध्यानसाधना करणे शक्य नसते किंवा त्याची मनापासून आवडही नसते, अशा साधकांना ईश्वराची भक्ती करून कैवल्यसाक्षात्कार होऊ शकतो. म्हणून पौरूषप्रयत्नाने करत असलेल्या योगसाधनेला साधकाने ईश्वरस्मरणाची जोड द्यावी म्हणजे त्याचा योगाभ्यास जलद पूर्ण होतो. जे योगाभ्यासाबरोबर ईश्वराशी भक्तीने जोडले गेलेले आहेत ते योगी ईश्वराला थोर वाटतात.
भक्त आणि भगवंत ह्यांच्या एकमेकांवरील प्रेमाची तऱ्हाच वेगळी असते असे समज. ते स्वत:ला विसरून एकमेकांसाठी जीव टाकत असतात. सर्वांच्या शरीरात मी आत्मस्वरूपात वास करून असतो पण ज्याला सर्वत्र माझ्याच रूपाचे दर्शन होत असते त्याच्यासाठी मी त्याचा देह असून तो माझा आत्मा झालेला असतो.
भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुन अतिशय भारावला. आधीच तो त्यांचे बोलणे आतुर होऊन ऐकत होता. त्यांनी आणखीन आणखीन आपल्याला सांगावे अशी त्याची इच्छा पहिल्यापेक्षा दुप्पट झाली. भगवंताना हे समजले त्यामुळे त्यांनाही संतोष वाटला. आपले बोलणे दुसऱ्याने लक्षपूर्वक ऐकावे असे प्रत्येकालाच वाटत असते आणि येथे तर अर्जुन जीवाचे कान करून देवांचे बोलणे ऐकत होता. आरसा ज्याप्रमाणे त्याच्यात डोकावून बघणाऱ्याचे प्रत्येक वैशिष्ट्या टिपतो, त्याप्रमाणे अर्जुन देवांचे सांगणे हृदयात जपून ठेवत होता. ज्याप्रमाणे समोर बसलेला श्रोता आपले बोलणे लक्षपूर्वक ऐकत आहे हे समजल्यावर वक्त्यालाही बोलण्याचे आणखी स्फुरण येते. त्याप्रमाणे अंत:करण प्रफुल्लित झालेले श्रीकृष्ण आता पुढील उपदेश सविस्तर करतील. त्या प्रसंगात शांत रस स्पष्ट दिसेल. भगवंताच्या मनात असलेले उपदेशरुपी बीज श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल. पेरणी करण्यापूर्वी शेतातील मातीची ढेकळे फोडून त्याचे मऊ मातीत रुपांतर करावे लागते त्याप्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांनी माझ्या मनातील भ्रमाची किंवा गैरसमजाची ढेकळे फोडली आहेत त्यामुळे माझ्या चित्ताचे वाफे सहज तयार झाले. म्हणून श्रीनिवृत्तीनाथांना पेरण्याची इच्छा झाली. त्यांनी कौतुकाने मला बोलते केले व माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि उघड उघड कृपा केली. म्हणून या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल.
माउलींच्या ह्या बोलण्यावर, भगवंतांचे बोल ऐकायला आतुर झालेले श्रोते म्हणाले, हे रूपक राहू दे. श्रीकृष्ण परमात्मा जे काही म्हणाले ते तू सत्वर सांग.
त्यांची उत्सुकता ओळखून माउली म्हणाले, भगवंतांचे बोल तुम्ही कसे ऐकले म्हणजे तुमचे भले होईल ते सांगतो. तुम्ही ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजेत. माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत. म्हणजे ते बुद्धीला समाधान देतील. आत्महिताला स्थिर करतील. पूर्ण अवस्थेला जागवतील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतील. आता अर्जुनाशी श्रीकृष्ण मोठ्या कौतुकाने जे बोलले ते मी ओवी छंदाने सांगेन.
श्री ज्ञानेश्वरी अध्याय
सहावा समाप्त