गुकेश नाकामुराकडून पराभूत, अर्जुनचे विजयासह पुनरागमन
वृत्तसंस्था/स्टॅव्हेंजर (नॉर्वे)
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने जागतिक विजेता डी. गुकेशच्या क्लासिकल चेसमधील विजयांची मालिका मोडून काढली आणि भारतीय खेळाडूला सर्वसमावेशकपणे हरवून तीन पूर्ण गुण मिळवले, तर अर्जुन एरिगेसीने फॅबियानो काऊआनाविऊद्ध विजय मिळवून पुन्हा एकदा शर्यतीत पुनरागमन केले. या प्रतिष्ठित स्पर्धेच्या आठव्या फेरीत भारताच्या एरिगेसीने त्याचा प्रतिस्पर्धी काऊआनाला वेळेच्या अडचणीत अडकविले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि माजी नॉर्वे बुद्धिबळ विजेत्या नाकामुराने पांढऱ्या सोंगट्यांसह सुऊवातीच्या आघाडीवर जोरावर मुसंडी मारली आणि त्याच्या 19 वर्षीय प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले. नाकामुराने अतिशय सहज विजय मिळवला आणि भारतीय खेळाडूविऊद्धच्या तिसऱ्या फेरीतील पराभवाचा बदला घेतला. स्पर्धेतील निराशाजनक सुऊवातीनंतर अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस
कार्लसन आणि एरिगेसी यांना हरवून गुकेशने पुन्हा एकदा आपली लय मिळवली होती. जवळजवळ चार तास चाललेल्या या लढतीत नाकामुराने त्याला जराही संधी दिली नाही. आणखी दोन फेऱ्या बाकी असताना गुकेश 11.5 गुणांसह नाकामुरासमवेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर अमेरिकन ग्रँडमास्टर काऊआना एरिगेसीविऊद्ध पराभव पत्करूनही 12.5 गुणांसह आघाडीवर आहे. आर्मागेडन टायब्रेकमध्ये चीनच्या वेई यीकडून पराभूत झालेला कार्लसन 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर एरिगेसी 10.5 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. 2023 च्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत गुकेश तिसऱ्या स्थानावर राहिला होता. त्या स्पर्धेत जेतेपद मिळविणारा 37 वर्षीय नाकामुरा सामन्यानंतर म्हणाला की, सध्याचा विश्वविजेता प्याद्यांच्या रचनेबद्दल अस्वस्थ होता, ज्यामुळे कदाचित त्याच्यावर वेळेत चाली करण्याचा दबाव आला आणि त्याने अमेरिकन खेळाडूला सहज विजय मिळवू दिला.
15 वर्षांचा असताना सर्वांत तऊण अमेरिकन ग्रँडमास्टर बनलेल्या नाकामुराने तिसऱ्या फेरीत गुकेशकडून झालेला पराभव हा आपल्याला आलेल्या सुस्तीमुळे झाला होता, असे सांगितले. मी बरोबरी साधल्यानंतर पूर्णपणे आरामात राहिलो. मी फक्त एक ते दोन चालींसाठी सुस्त झालो आणि लगेचच मी खूप अडचणीत आलो. त्यातून मी सावरू शकलो नाही, असे तो पुढे म्हणाला. नाकामुराने स्पर्धेत आतापर्यंत गुकेशने केलेल्या खेळाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले की, तो अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या फेरीत कार्लसन आणि एरिगेसीच्या हातून वाचला हे त्याचे भाग्य आहे.
दरम्यान, महिला विभागात दोन वेळची जागतिक रॅपिड
चॅम्पियन भारताची कोनेरू हम्पी दोन फेऱ्या बाकी असताना पुन्हा आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. दिवसातील एकमेव क्लासिकल विजयात तिने स्पॅनिश इंटरनॅशनल मास्टर सारा खादेमला हरवले. 13.5 गुणांसह हम्पी सध्याची जागतिक विजेती चीनच्या जू वेनजुनपेक्षा एक गुणाने पुढे आहे. जूची सहा सामन्यांची विजयी मालिका पाचव्या स्थानावर असलेल्या आर. वैशालीने खंडित करताना आर्मागेडन टायब्रेकमध्ये विजय मिळविला.
बुद्धिबळाच्या विश्वात भारत हा नवा सोविएत युनियन : नाकामुरा
नाकामुराने यावेळी जोरदार संकेत दिले की, हा त्याचा नॉर्वे बुद्धिबळातील शेवटचा सहभाग असू शकतो आणि तो कदाचित कार्लसनविऊद्ध त्याचा शेवटचा क्लासिकल सामना खेळलेला असू शकतो. बुद्धिबळाचे भविष्य भारतात आहे. बुद्धिबळाच्या बाबतीत भारत हा नवीन सोविएत युनियन आहे. त्यांच्याकडे गुकेश आहे, अर्जुन आहे, प्रज्ञानंद आहे, मला वाटते की, अरविंद (चिदंबरम) नुकताच आघाडीच्या 10 खेळाडूंमध्ये आला आहे. पुढील 5-10 वर्षांचा विचार केल्यास भारतीय बुद्धिबळात वर्चस्व गाजवतील यात काही शंका नाही, असे मत नाकामुराने व्यक्त केले.