अर्जुन वेई यीकडून पराभूत, भारतीय आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था/पणजी
ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीला बुधवारी येथे टायब्रेकर सामन्यांच्या पहिल्या संचात चीनच्या वेई यीकडून 1.5-2.5 असा पराभव पत्करावा लागल्याने तो फिडे बुद्धिबळ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. अर्जुनसाठी हा धक्कादायक निकाल होता. कारण रॅपिड टायब्रेकर सामन्यात पहिल्या गेममध्ये चिनी खेळाडूने दबाव आणला, पण अखेर बरोबरी साधली, तर दुसऱ्या गेममध्ये अर्जुनने नियंत्रण गमावले आणि त्याला घरी परतावे लागले.
क्लासिकल बुद्धिबळचे दोन्ही गेम अनिर्णित ठेवल्यानंतर अर्जुन रॅपिडच्या पहिल्या गेममध्ये काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळला आणि त्याने फ्रेंच बचावाचा वापर केला. तथापि, अर्जुन लवकरच बॅकफूटवर गेल्याने तो एक उत्तम पर्याय ठरला नाही. संगणकांनुसार वेई यीला मोठी अनुकूल परिस्थिती होती. परंतु अर्जुनने कमी ताकद असूनही चिनी खेळाडूला कठोर प्रतिकार केला. अखेर वेई यी शेवटच्या टप्प्यात गडबडला आणि अर्जुनने बरोबरी साधली.
दुसऱ्या रॅपिड गेममध्ये पांढऱ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळत असूनही भारतीय खेळाडू नशीबवान ठरला नाही. मधल्या गेममध्ये येईला ठोस स्थान मिळाले आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. शेवटच्या टप्प्यात गुंतागुंत कायम राहिली असली, तरी वेई यीने तांत्रिक बाबी त्याच्या बाजूने वळविल्या. अर्जुनला शेवटी चेकमेट करण्यात आले. दुसरीकडे, आंद्रे एसिपेन्कोने अमेरिकेच्या सॅम
शँकलँडचा 4-2 असा पराभव केला. पहिल्या संचामध्ये दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक विजय मिळविल्यानंतर टायब्रेकरच्या दुसऱ्या संचात शेकलँडने दोन्ही गेम गमावले. दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये जावोखिर सिंदारोव्हने जोस एदुआर्दो मार्टिनेझ अलकांतराचा 3.5-2.5 असा पराभव केल्यानंतर तो नोदिरबेक याकुबबोएव्हनंतर उपांत्य फेरी गाठणारा दुसरा उझबेक बनला. सेमीफायनलमध्ये आता एसिपेन्को वेई यीशी लढेल, तर याकुबबोएव्ह सिंदारोव्हशी लढेल. अर्जुनच्या पराभवाचा अर्थ असा आहे की, कँडिडेट स्पर्धेत आर. प्रज्ञानंद हा फक्त एकच भारतीय झळकू शकतो. तो या वर्षभरातील त्याच्या उत्तम कामगिरीमुळे सदर स्पर्धेत स्थान मिळवू शकेल.