अर्जुन एरिगेसीला ‘डब्ल्यूआर चेस मास्टर्स’चे जेतेपद
‘लाईव्ह एलो रेटिंग’ पोहोचले 2800 च्या उंबरठ्यावर
वृत्तसंस्था/ लंडन
झपाट्याने प्रगती करणारा भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी याने येथील अंतिम फेरीत क्लासिकल बुद्धिबळातील दोन सामने अनिर्णित राहिल्यानंतर आर्मागेडॉन गेममध्ये फ्रान्सच्या मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्हचा पराभव करून डब्ल्यूआर चेस मास्टर्सचे विजेतेपद पटकावले.
नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिलेल्या अर्जुनने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्म आणि अचूकता दाखवून विजेत्यासाठीचे 20,000 युरोचे इनाम पटकावले. यासह अर्जुनचे लाइव्ह एलो रेटिंग 2796 वर पोहोचले आहे, ज्यामुळे तो प्रतिष्ठित 2800 अंकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. 20 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या युरोपियन चषकात तो हा टप्पा पार करण्याचा प्रयत्न करेल.
या 21 वर्षीय तऊणाने त्याचा मित्र आर. प्रज्ञानंदचा या बाद पद्धतीने खेळविण्यात आलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव केला होता आणि अखेरीस वॅचियर-लॅग्रेव्हवर विजय मिळवला. अर्जुनने त्याच्या व्यवस्थापन संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नव्या स्वरुपाशी मी चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकलो आणि स्पर्धा जिंकू शकलो याचा मला आनंद आहे.
16 खेळाडूंच्या या स्पर्धेत अर्जुनने इंग्लंडच्या नऊ वर्षे वयाच्या बोधना शिवनंदनवर 2-0 असा विजय मिळवला होता. बोधना ही इंग्लंडतर्फे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खेळणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली होती. अर्जुनने त्याचा सहकारी ग्रँडमास्टर विदित गुजराथीलाही पराभूत केले. दोन लढतींपैकी दुसरा सामना जिंकून त्याने 1.5-0.5 फरकाने ही लढत जिंकली.
उपांत्य फेरीत प्रज्ञानंदविरुद्ध अर्जुनने पहिला सामना पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळताना जिंकून लवकर आघाडी घेतली आणि दुसरा सामना बरोबरीत राखून लढत 1.5-0.5 अशी जिंकली. फायनलमध्ये वॅचियर-लॅग्रेव्हने भारतीय खेळाडूचा जोरदार प्रतिकार केला, परंतु अखेरीस आर्मागेडॉनमध्ये त्यांचा पराभव झाला. पहिला गेम अर्जुनने काळ्या सोंगट्या घेऊन खेळताना सहज बरोबरीत संपविला. दुसऱ्या सामन्यात तो पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळला. पण त्यातही बरोबरीवर समाधान मानावे लागले. आर्मागेडॉनमध्ये वॅचियर-लॅग्रेव्हने आक्रमक खेळ केला. परंतु अर्जुन सावध राहिला आणि 69 चालींपर्यंत वॅचियर लॅग्रेव्हने दिलेला लढा शेवटी व्यर्थ ठरला.