अर्जुनवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अतिवाड स्मशानभूमीत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना : गावावर शोककळा
वार्ताहर/उचगाव
अतिवाड येथील भारतीय सेनेतील जवान सुभेदार अर्जुन भावकू पाटील याला अतिवाड स्मशानभूमीत मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. अर्जुनचा तिरंग्यात लपटलेला मृतदेह पाहून जनसमुदायांच्या डोळ्यातून अश्रू आले. पार्थिवाचे अंतिम दर्शन त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील अनेक नागरिकांनी घेतले. ‘अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे’ च्या घोषणा देऊन हुतात्मा अर्जुन पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अर्जुन याची प्रकृती बिघडल्याने त्याला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचे मंगळवारी सकाळी आठच्या सुमाराला निधन झाले. ते सीएमई पुणे येथे सुभेदार पदावर कार्यरत होते. तीस वर्षे प्रदीर्घ सेवा बजावून एप्रिल 2025 मध्ये तो निवृत्त होणार होता. कारगिल युद्धात त्याने भाग घेतला होता. उत्कृष्ट कामगिरीही त्याने बजावलेले होती. भारताच्या पूर्वोत्तर जम्मू-काश्मीर तसेच देशात विविध भागात सेवा बजावली आहे. सध्या तो पुणे येथे सेवा बजावत होता. निवृत्तीसाठी पाच महिने असताना त्याचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी अतिवाड स्मशानभूमी मध्ये त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, दोन भाऊ, दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.