For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आर्जव, तेज, अभय, अहिंसा, क्षमा, शौच, अमानिता

06:33 AM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आर्जव  तेज  अभय  अहिंसा  क्षमा  शौच  अमानिता
Advertisement

अध्याय दहावा

Advertisement

पूर्वकर्मानुसार उपलब्ध स्वभावातील रज, तम गुण ओळखून ते सत्वगुणात बदलण्यासाठी आपण दैवी संपत्ती बाळगून असलेल्या माणसाचा स्वभाव कसा असतो त्याचा अभ्यास करत आहोत. जेणेकरून आपण कुठं कमी पडतोय हे हेरून आपल्या स्वभावात सुधारणा करता येईल. दैवी स्वभावाच्या माणसात अपैशुन्य, दया, अक्रोध, अचापल्य, धृती हे गुण काय चमत्कार घडवून आणतात ते आपण बघितले. आता बाप्पांनी सांगितलेल्या दैवी बारा गुणांपैकी उर्वरित आर्जव, तेज, अभय, अहिंसा, क्षमा, शौच आणि अमानिता ह्या गुणांचा आपण अभ्यास करू. साधकाने हे सर्व गुण त्याच्या स्वभावात जागृत करण्याच्या उद्देशाने साधना करत रहावे. त्याच्यातील उणिवा भगवतकृपेने नाहीशा होतात. उणीव जसजशी नाहीशी होते तसतसा साधकाचा उत्साह वाढू लागतो. काही गुण पूर्वसंस्कारानेही जागृत होतात. बाप्पा त्याच्याकडून साधना करवून घेतात आणि त्याचा उद्धार करतात.

आर्जव : मनाच्या सरळपणाला आर्जव असं म्हणतात. दैवी स्वभावाचा मनुष्य ज्या प्रमाणे बोलतो त्याप्रमाणे वागतो.

Advertisement

तेज : दैवी स्वभावाच्या मनुष्याच्या सहवासात आलेला मनुष्य दुर्गुण, दुराचारांचा त्याग करून सद्गुण, सदाचाराला लागतो. त्याच्या या शक्तीलाच तेज म्हणतात.

अभय : पुढे येणाऱ्या संकटाच्या कल्पनेनं सामान्य मनुष्य भीत असतो पण दैवी स्वभावाचा मनुष्य मात्र निर्भय असतो. या त्याच्या गुणाला अभय असं म्हणतात. भय दोन प्रकारचे असते. पहिल्या प्रकारात बाहेरच्या गोष्टींपासून भीती वाटत असते. त्यात चोर, डाकू तसेच प्राणी यांच्यापासून वाटणाऱ्या भीतीचा समावेश होतो पण दैवी मनुष्य हे जाणून असतो की, या शरीरासकट जे जे काही प्राप्त झालेलं आहे ते ते सर्व ईश्वराचं असून ते त्यानं आपल्याला वापरायला दिलेलं आहे. त्याची इच्छा आहे तोपर्यंत ते कुणीही कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे बाह्य गोष्टींपासून भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही.

मनुष्य जेव्हा पाप, अन्याय, अनाचार करत असतो तेव्हा तो वरकरणी आपण कुणाला भीत नाही, असे दाखवत असतो पण त्याला मनातून भीती वाटत असते. माणसाला मानसन्मान, पैसा, शरीरभोग इत्यादी गोष्टी हव्या असतात. त्या जास्तीतजास्त मिळवण्यासाठी तो निषिद्ध आचरण करायला मागे पुढे पहात नाही पण त्याच्या परिणामांचे त्याला भय वाटत असते. साधक भगवंतांवर जितका जास्त विश्वास टाकतो तितका तो अधिकाधिक निर्भय होत जातो त्याचं आचरण पवित्र होत जातं.

अहिंसा : शरीर, मन, वाणीद्वारा कोणालाही दु:ख न देणे, त्याला न दुखावणे याला अहिंसा म्हणतात. माणसाचे मन ही ईश्वराची विभूती आहे. कुणाचे मन दुखावणे हे ईश्वराला दुखवण्यासारखेच आहे.

क्षमा : एखाद्या अपराध्याला दंड देण्याची क्षमता असूनही त्याला माफ करणे ह्याला क्षमा म्हणतात. एखाद्या अपराध्याकडे तो आपले नुकसान करेल म्हणून कानाडोळा करणे ही क्षमा नव्हे.

शौच : शौच म्हणजे पवित्रता. यात बाह्यशुद्धी व आंतरशुद्धी यांचा समावेश होतो. बाह्यशुद्धीत पुढील गोष्टी येतात. शरीरशुद्धी, वाचाशुद्धी म्हणजे सत्य, प्रिय आणि हितकारक बोलणे. कौटुंबिक शुद्धी म्हणजे कुटूंबाबाबत आवश्यक त्या गोष्टी जबाबदारीने पार पाडणे. आर्थिकशुद्धी म्हणजे उत्तम व्यवहार करून धन मिळवणे व योग्य कारणासाठी खर्च करणे. अशी बाह्यशुद्धी करत गेल्यास आंतरशुद्धी आपोआप होते.

अमानिता : मानिता म्हणजे मनाने अपेक्षा करणे. ही अपेक्षा दोन प्रकारची असते. पहिलीला संसारिक मानिता असे म्हणतात. धन, विद्या, गुण, बुद्धी, योग्यता, अधिकार यामुळे आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत असे समजून मानसन्मानाची अपेक्षा करणे ही झाली संसारिक मानिता. दुसऱ्या प्रकारात पारमार्थिक मानितेचा समावेश होतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.