विविध कंपन्या देणार लाभांश, इंडिया मोटर पार्ट्स देणार 10 रुपये लाभांश
नवी दिल्ली :
शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष हे नियमित उत्पन्नावर असते. यामध्ये कंपन्यांच्या लाभांशाचा विचारही प्रामुख्याने अनेक गुंतवणूकदार करत असतात. येणाऱ्या काळात अनेक कंपन्या आपल्या समभागधारकांना लाभांश देणार आहेत. लाभांशाचे वितरण करण्यासाठी समभागधारकांची पात्रता ठरवण्यासाठी कंपन्यांची 29 जानेवारी ही रेकॉर्ड डेट असणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना जर लाभांशाचा फायदा उठवायचा असेल तर 29 जानेवारी ही शेवटची तारीख असणार आहे.
कोणत्या कंपन्या देणार आहेत लाभांश ते पाहुया-
येणाऱ्या काळामध्ये अनेक कंपन्या आपला लाभांश समभागधारकांना देणार आहेत. यामध्ये ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा, आयआयएफएल फायनान्स, इंडिया मोटर पार्ट्स अँड अॅक्सेसरीज, जिंदल स्टेनलेस, ओरिएंट इलेक्ट्रिक, शांती गिअर्स आणि जेनसर टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी समभागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 29 जानेवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की जर का गुंतवणूकदारांना या लाभांशाचा लाभ घ्यायचा असेल तर या तारखेच्या आत कंपनीचे समभाग खरेदी करावे लागतील. या तारखेनंतर समभाग खरेदी करणाऱ्यांना लाभांशाचा लाभ मिळणार नाही.
कोण किती देणार लाभांश
त्यामध्ये इंडिया मोटर पार्ट्स अँड अॅक्सेसरीज यांनी 10 रुपये प्रति समभाग हा सर्वाधिक अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. या पाठोपाठ आटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा यांनी 5 रुपये प्रति समभाग आणि आयआयएफएल फायनान्स यांनी 4 रुपये प्रति समभाग अंतरिम लाभांश देण्याचे घोषित केले आहे. शांती गिअर्स यांनी प्रति समभाग 3 रुपये अंतरीम लाभांश तर जेनसर टेक्नॉलॉजीज यांनी प्रति समभाग 2.40 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर जिंदाल स्टेनलेस यांनी 1 रुपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला असून ओरियंट इलेक्ट्रिक यांनी प्रतिसमभाग 0.75 रुपये अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केलेली आहे.