भंडारी समाज सभेत वादावादी, धक्काबुक्की
अशोक नाईक गटाने घेतला काढता पाय : गावकर गटाने नाईक गटाचे निर्णय केले रद्द
वास्को : गोमंतक भंडारी समाजाच्या सर्वसाधारण सभेत अपेक्षानुसार दोन गटांमध्ये गदारोळ माजला. शाब्दिक चकमक, तणाव आणि काही वेळा धक्काबुक्कीही झाली. अखेर समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक गटाने सभेतून काढता पाय घेतला आणि सभेवर विरोधी गटाने कब्जा केला. नाईक गटाचे सर्व निर्णय बेकायदा व रद्द ठरवून या सभेने समाजाची कार्यवाहू समिती घोषित केली. यात बारा तालुक्यातील प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने समाजाची निवडणूक येत्या 17 नोव्हेंबर रोजी घेण्याचे या सभेत जाहीर केले आहे. वास्को मांगोरहिल येथील कोमुनिदाद हॉलमध्ये गोमंतक भंडारी समाजाची सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. मुरगावसह गोव्यातील बहुतेक तालुक्यातील समाजबांधव या सभेला उपस्थित होते. मात्र, संख्या मर्यादीत होती. सभेला अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष देवानंद नाईक यांच्यासह त्यांचे पदाधिकारी तसेच गुरूनाथ नाईक, उपेंद्र गावकर, नितीन चोपडेकर, दीपक नाईक, सुधीर कांदोळकर, काशिनाथ मयेकर, विनोद किनळेकर, तारक आरोलकर उपस्थित होते.
नाईक गटाने सोडली सभा
भंडारी समाजाच्या आजी, माजी आमदरांपैकी किंवा मंत्र्यांपैकी कुणीही या सभेला उपस्थित नव्हते. सभा अपेक्षेप्रमाणे वादळीच ठरली. भंडारी समाजातील दोन गटांमध्ये धुमसणाऱ्या वादाचे पडसाद या सभेत उमटले. मात्र, काही वेळानंतर सभा एकाच गटाच्या हाती आल्याने वातावरण निवळले. सभेच्या प्रारंभीच अध्यक्ष अशोक नाईक व त्यांचा गट सभा सोडून निघून गेला.
नवरात्रोत्सवात सभा बोलाविल्याने नाराजी
या सर्वसाधारण सभेत ज्या काही चुकीच्या घटना घडल्या त्याला अशोक नाईक व त्यांचा गट जबाबदार असल्याचे स्पष्ट करून दुसऱ्या गटाने त्यांच्या कृतीचा निषेध केला आहे. समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी ही सर्वसाधारण सभा वास्कोत बोलावली होती. ऐन नवरात्रौत्सवाच्या दिवसात ही सभा बोलावल्यामुळे विरोधी गटातील नाराजीत अधिकच भर पडली होती.
पंधरा मिनिटांत आटोपली सभा
समाजाचे आराध्य दैवत श्रीरूद्रेश्वराचे स्मरण करून या सभेची सुरूवात करण्यात आली. सचिवांनी वार्षिक अहवाल व जमाखर्च सादर केला. त्यानंतर अध्यक्ष अशोक नाईक यांनी समाजाची निवडणूक येत्या नोव्हेंबर 17 रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. उपाध्यक्ष देवानंद नाईक यांनी सर्वांचे आभार मानले. पंधरा मिनिटांच्या आत सभा गुंडाळण्यात आली. त्यानंतर वाद वाढला आणि सभेत गदारोळ माजला. एका गटाने सभेतील ठराव व निवडणूक जाहीर करण्याला जोरदार विरोध केला. सभा झटपट आटोपती घेतल्याने उपस्थित विरोधी गटाने जोरदार आक्षेप घेतला.
गोंधळ, धक्काबुक्कीचे प्रकार
गदारोळ माजल्याने कोणी तरी पोलिसांना पाचारण केले. पोलीस येताच वाद अधिकच भडकला. पोलिसांना सभागृह सोडण्यास उपस्थितांनी भाग पाडले. गोंधळात धक्काबुक्कीचे प्रकारही घडले. या गदारोळात अध्यक्ष अशोक नाईक व त्यांच्या गटाने सभेतून काढता पाय घेतला. त्यांना बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न काहींनी केला. मात्र, पोलीस संरक्षणात ते बाहेर पडले. त्यानंतर या सभेचा ताबा विरोधी गटाने घेतला व त्यांनी ही सभा पुढे चालू ठेवली. दुसऱ्या गटाचे नेते व्यासपीठावर आरूढ झाले. या नेत्यांनी अशोक नाईक व त्यांच्या गटाच्या कृतीचा निषेध केला. समाजाच्या विविध नेत्यांनी यावेळी विचार मांडले. यावेळी विविध ठराव मांडण्यात आले व ते संमत करण्यात आले. मागच्या सहा वर्षात अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चुकीचे निर्णय घेतलेले असल्याची माहिती देऊन असे निर्णय या सभेत रद्द ठरवण्यात येत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या सभेत या गटाने समाजाची कार्यवाहू समिती निवडली आहे. त्यात बाराही तालुक्यातील प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत.
निवडणूक 17 नोव्हेंबर रोजी
अध्यक्ष अशोक नाईक यांच्या गटाने दुपारी पत्रकार परिषदेत भंडारी समाजाची घेण्यात आलेली सर्वसाधारण सभा ही समाजाच्या घटनेचे पालन करूनच घेण्यात आल्याचे स्पष्ट करून दुसऱ्या गटाने घेतलेल्या सभेला मान्यता नसल्याचा दावा केला आणि त्यांच्या कृतीचा निषेध केला. त्या गटाने सभेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायद्यांतर्गतच समाजाची निवडणूक 17 नोव्हेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. ही निवडणूक प्रक्रिया रामदास पेडणेकर, अॅड. सुरेश नाईक, शिवानंद तलकर, अॅड. केदार शिरगावकर व वामन वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी आपल्या समितीवरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
अशोक नाईक यांचे निर्णय, कारभार, बेकायदा : गावकर
दुसऱ्या गटानेही सभा संपल्यानंतर पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. अशोक नाईक यांच्या समितीने नियमांचे उल्लंघन करून सर्वसाधारण सभा घेतल्याचे समाजाचे नेते उपेंद्र्र गावकर यांनी सांगितले. समितीने जाहीर केलेल्या सभेला आपण आव्हान दिलेले आहे. आज घेण्यात आलेली सभा केवळ सात मिनिटांत गुंडाळण्यात आलेली आहे. अशोक नाईक यांची समिती बेकायदेशीर आहे. त्यांची आजची सभाही बेकायदा आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले ठरावही बेकायदा आहेत. आम्ही कार्यवाहू समिती निवडलेली आहे. पुढील प्रक्रिया या समितीमार्फत होईल. सर्वांना घेऊन पुढे जाणार आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत 50 हजार सदस्य नोंदणी केली जाईल, असे गावकर यांनी सांगितले. त्या समितीने घेतलेले निर्णय बेकायदा आहेत. ते सर्वजण सभेतून पळून गेल्याचा आरोप गावकर यांनी केला.